खारुताईच्या पिल्लाचं आणि नागेश यांचं अनोखं प्रेम ! पिल्लू खिशात बसून जाते शाळेलाही; गजभार कुटुंबाला सोडून राहात नाही एक क्षण 

Squirrel
Squirrel

वाळूज (सोलापूर) : खारुताईचं पिल्लू घरट्यातून खाली पडलं. सायकल खेळणाऱ्या लहान मुलाने त्याला उचलून कलाशिक्षक असलेल्या आपल्या वडिलांना दाखवलं. ते पिल्लू पाहून शिक्षकामधलं मातृत्व जागं झालं. सिरिंजने दूध पाजून गजभार कुटुंब त्याला जगवत आहे. आता या चिमुकल्या पिल्लाचा गजभार कुटुंबाला इतका लळा लागला, की एक क्षणभरही पिल्लूपासून गजभार कुटुंबीयांना व या कुटुंबीयांपासून पिल्लूलाही राहवत नाही. एवढंच नव्हे तर शिक्षक असलेले नागेश गजभार यांच्या खिशात बसून हे पिल्लू त्यांच्याबरोबर शाळेलाही जाते. प्राणी आणि मानवामधील हे अनोखे प्रेमाचे नाते पाहावयास मिळाले बार्शी शहरातील गजभार कुटुंबामध्ये. 

उत्कृष्ट कलाप्रेमी, सुंदर हस्ताक्षर असलेले, उत्तम चित्रकार, विविध कार्यक्रमांत सुंदर रांगोळी काढणारे नागेश गजभार (स्वामी) हे बार्शी शहरात राहतात. श्री शिपलागिरी महाराज प्राथमिक आश्रमशाळा, देगाव (वा), ता. मोहोळ येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. निसर्गचित्रे, पशू- पक्ष्यांची चित्रे, प्रतिकृती हबेहूब तयार करण्यात त्यांची ख्याती आहे. मोहोळ येथील शासकीय गोदाम येथे सोमवारी (ता. 11) ग्रामपंचायतीच्या दुसऱ्या प्रशिक्षण वर्गासाठी सकाळच्या सत्रात ते आले असताना त्यांची भेट झाली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि माझं लक्ष त्यांच्या शर्टच्या खिशाकडे गेले. खिशात काहीतरी वळवळ जाणवली म्हणून कुतूहलाने मी आत डोकावले, तर त्यांच्या खिशात एक छोटंसं खारुताईचं पिल्लू होतं. त्याच्यासाठी सगळा खिसा त्यांनी खाली ठेवला होता. 

मी विचारलं "सर हे कुठं सापडलं?' आणि हे खूप लहान आहे. म्हणजे त्याच्या अंगावर नुकतेच केस आणि काळे पांढरे पट्टे दिसू लागले होते. त्यावर ते म्हणाले, "आठ- दहा दिवसांपूर्वी बार्शी-लातूर रस्त्यावरील विठ्ठल नगरातील एका झाडाखाली हे पिल्लू पडले होते. माझा मुलगा अद्वैत गजभार (वय 6 वर्षे) हा सायकल खेळत असताना हे पिल्लू रस्त्याकडेच्या झाडाखाली पडलेलं दिसलं. लगेच त्याने ते उचलून जवळ पडलेल्या वहीच्या पुठ्ठ्यावर ठेवले व मला बोलावून घेतले. ते पिल्लू खारुताईचे असून जिवंत असल्याचे जाणवले. नंतर जवळपास झाडावर खारुताईच्या घरट्याचा व त्याच्या आईचा शोध घेतला. झाडाच्या शेंड्यावर एक ओबडधोबड घरटे दिसले पण तिथंपर्यंत मी पोचू शकत नव्हतो. मग त्याला घरी आणले. त्याला जगवायचे कसे, हा प्रश्न होता. 

खारुताई सस्तन प्राणी आहे, हे मी वाचलं होतं. म्हणजे याला दूध पाजले तर हे जगू शकते हे लक्षात आलं. तरी पण लगेच प्राणीमित्राशी संपर्क साधून माहिती घेऊन त्याला इंजेक्‍शनच्या सिरींजने दर दोन तासाला थोडे थोडे दूध द्यायला चालू केले. आता त्याच्या अंगावर केस दिसू लागले असून ते खेळू लागले, याचे समाधान आहे. त्याच्या संपूर्ण शरीरावर आता केस आले आहेत. ते एवढं लहान आहे की मी त्याला एकटं घरी पण ठेवू शकत नाही. म्हणून जिथं जाईल तिथं याला घेऊन फिरतो. गाडीत दुधाची बाटली आणि सिरींज ठेवली आहे. अधूनमधून त्याने दूध पाजतो. आता त्याचा एवढा लळा लागला आहे, की मला आणि माझ्या मुलांना त्याच्याशिवाय करमत नाही. एका जीवाला वाचवल्याचं आत्मिक समाधान मला मिळत आहे.' 

जेव्हा ते प्रशिक्षणाला मोहोळ येथे घेऊन आले आणि मी ते पाहिले तेव्हा त्या कोवळ्या मऊ लुसलुशीत जीवाला हातात घेतल्यावाचून मलाही राहावले नाही. म्हणून हातावर घेऊन त्याचा एक छान फोटो काढला. खूप छान वाटले. एका हळव्या मनाच्या कलाशिक्षकाला भेटल्याचा आनंद वाटला. 

सध्या हे खारीचे पिल्लू लहान असून, आता कुठे त्याच्या शरीरावर केस फुटत आहेत. आम्ही त्याच्यासाठी एक सुंदरसं घरटं तयार केलं आहे. ते स्वत: फिरू लागल्यावर माझ्या घरासमोरील बागेत झाडाझुडपांमध्ये खेळेल- बागडेल व माझ्या घरातही ये-जा करेल, याचा आम्हालाही आनंद वाटतो. 
- नागेश गजभार, शिक्षक 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com