अख्खा महाराष्ट्र रेड झोनमध्येच ! विद्यापीठाची आगामी प्रश्‍नपत्रिकाही बहुपर्यायीच 

Exam
Exam

सोलापूर : सध्या महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे रेड झोनमध्ये असून राज्यातील ऍक्‍टिव्ह रुग्णांची संख्या आता 84 हजारांपर्यंत आहे. साडेअठरा लाख नागरिकांना आतापर्यंत कोरोनाची बाधा झाली असून, त्यातील 47 हजार 600 हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सोलापूर शहर-जिल्ह्यात दररोज सरासरी 130 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत, तर आता 15 डिसेंबरनंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली आहे. या पार्श्‍वभूमीवर आगामी सत्र परीक्षेची प्रश्‍नपत्रिकाही बहुपर्यायीच असणार आहे. ऑनलाइन-ऑफलाइन पद्धतीनेच परीक्षा घेतली जाणार असून, त्याचे नियोजन अभ्यास मंडळाकडून केले जात आहे. 

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठांतर्गत 108 महाविद्यालये आहेत. विद्यापीठासह विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये एकूण सुमारे दीड ते दोन लाख परीक्षार्थी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येच्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रांवर घेणे अशक्‍य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या परीक्षा देता येईल, अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे, तर ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाइनची साधने नाहीत, त्यांना ऑफलाइन परीक्षा देता येईल, असेही नियोजन केले जाणार आहे. 

तत्पूर्वी, प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नांची संख्या, त्यासाठी किती वेळ द्यावा, यासह अन्य बाबींवर संबंधित अभ्यासक्रमाचे अधिष्ठाता, परीक्षा व अभ्यास मंडळाचे संयुक्‍तपणे नियोजन सुरू आहे. डिसेंबरअखेर नियोजन पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याची माहिती दिली जाईल, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. दरम्यान, प्रॉक्‍टरिंगबद्दल (हालचाल टिपणारा कॅमेरा) अद्याप निर्णय झालेला नाही. 

सोशल डिस्टन्सिंगमुळे तीनपट लागेल सामग्री 
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यायची झाल्यास सध्या उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीच्या तुलनेत तीनपट सामग्री लागणार आहे. परीक्षा केंद्रांमध्ये वाढ करावी लागणार आहे, तर आगामी सत्र परीक्षेला प्रात्यक्षिक परीक्षाही नसल्याने ही परीक्षा ऑनलाइनद्वारेच घेतली जाणार आहे. प्रथम, द्वितीय व अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिका सोडविण्यासाठी दीड तासाचा वेळ दिला जाणार आहे. कोरोनाची स्थिती सावरल्यानंतर पुन्हा पूर्वीप्रमाणे परीक्षा घेतली जाईल, असे परीक्षा नियंत्रक कार्यालयाकडून सांगण्यात आले. 

"ग्रामीण'मध्ये कोरोना कमी झालेला नाही 
ग्रामीण भागात कोरोना वाढत असल्याने परीक्षा केंद्रांवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे शक्‍य वाटत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षेसंदर्भात नियोजन केले जात आहे. 
- श्रेणिक शहा, 
परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com