
डॉक्टर व्हायचे होते, पण झालो आयपीएस
लहानपणापासूनच शाळेत हुशार होतो. पुढे उच्चशिक्षण घेवून डॉक्टर बनण्याचे स्वप्न होते. परंतु डॉक्टर होता आले नाही. मग पुढे काय असा विचार आला. तरीही न डगमगता, हार न मानता, प्रशासकीय सेवेत जावून लोकांची सेवा करण्याचे ठरवले. त्यातूनच मग युपीसीचा अभ्यास सुरु केला. सलग तीन वर्षे अत्यंत मेहनत आणि कष्ट घेवून अभ्यास केला. दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळाले. परंतु, मला ते यश अपेक्षीत नव्हते. त्यानंतर पुन्हा जोमाने प्रयत्न केले. माझ्या प्रयत्नाला आणि आई आणि वडिलांच्या इच्छेला आज यश मिळाले. डॉक्टर होता आले नसले तरी आयपीएस झाल्याचे मोठे समाधान मिळाले आहे.
- अभयसिंह देशमुख, नूतन आयपीएस अधिकारी
पंढरपूर (सोलापूर) : शेतकरी कुटुंबात राहून देखील एका उच्च ध्येयाने प्रेरित होवून कासेगाव (ता. पंढरपूर) येथील अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवले आहे. लहानपणापासूनच डॉक्टर बनायचे स्वप्न होते, पण आयपीएस झालो. लोकांची सेवा करण्याबरोबरच पिडितांना न्याय देण्याचे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे अभियसिंह देशमुख यांनी आज सकाळशी बोलताना सांगितले.
आज केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये अभियसिंह देशमुख यांची आयपीएस म्हणून निवड झाली आहे. अभयसिंह हे लहानपणापासूनच शाळेत हुशार होते. दहावीपर्यंतचे शिक्षण येथील इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झाले. अकरावी व बारावी येथील के.बी.पी कॉलेजमध्ये झाले. त्यानंतर पुणे येथील कॉलेज आफ इंजिनिअरींगमधून सिव्हील इंजिनिअरींगची पदवी घेतली. इंजिनिअर झाल्यानंतर कुठेही मोठ्या पगाराची नोकरी मिळाली असती, परंतु, नोकरी न करता पुणे येथे राहून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास केला. तीन वर्षापासून ते प्रयत्न करत होतो. गेल्या वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळाले होते. मात्र रॅंकमध्ये 503 क्रमांक मिळाला होता. त्यांची इंडियन कॉर्पोरेटमध्ये निवड देखील झाली होती. परंतु, आयपीएसचे होण्याचे माझे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते, त्यानंतरही पुन्हा लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास सुरु केला. त्यामध्ये आयपीएसचे स्वप्न सत्यात उतरले. या परीक्षेत 151 व्या क्रमांकाने ते उतीर्ण झाले आहेत.
अभयसिंह यांचे वडील बाळासाहेब देशमुख हे कासेगाव येथे शेती करतात. डाळिंब आणि द्राक्ष शेतकरी म्हणून त्यांची परिसरात ओळख आहे. शेतकरी कुटुंबात राहून देखील अभयसिंह यांनी आयपीएस पदाला गवसणी घातली आहे. ग्रामीण भागात राहून त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांचे हे यश ग्रामीण भागातील अनेक तरुणांना आपल्या ध्येयापर्यंत पोचवण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणारे आहे.
अभयसिंह यांचे वडील बाळासाहेब देशमुख म्हणाले, की अभयसिंह गेल्या तीन वर्षापासून आयपीएससाठी प्रयत्न करत होता. आज शेवटी त्याच्या या कष्टाला यश आले. त्याची जिद्द, मेहनत आणि कष्ट करायची तयारी पाहुन आम्ही देखील थक्क हायचो. आम्ही शेतकरी असल्यामुळे तो सुट्टीला आला की गावात येवून शेती बद्दल विचारायचा. त्याचे शेतीवरचे प्रेम पाहून आम्हालाही त्याचा अभिमान वाटतो. आयपीएस होवून त्याने आमचे, गावाचे आणि तालुक्याचे नाव मोठे केले आहे.
संपादन : वैभव गाढवे