#valentinedayspecial : झोका घेता घेता फुलले या गोल्डन नगरसेविकेचे प्रेम

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

दोघांनीही आपला धर्म एकमेकावर लादण्याचा प्रयत्न केला नाही. दोघांमध्ये असलेला समंजसपणा हेच आमच्या सुखी जीवनाचे रहस्य आहे, असे फुलारे दांपत्य अभिमानाने सांगतात. 

सोलापूर : नागपंचमीच्या कालावधीत झोक्‍याचा आनंद लुटण्यासारखा महिलांना दुसरा आनंद नसतो. झोक्‍याचा आनंद लुटता लुटताच परिसरातील युवक जॉनबरोबर श्रीदेवी यांचे सूर जुळले आणि अनेक नाट्यमय घडामोडीनंतर त्यांचा विवाह झाला. अंगावरील सोन्याच्या दागिन्यांमुळे गोल्डन नगरसेविका हे बिरूद मिळवलेल्या श्रीदेवी फुलारे यांची ही लव्हस्टोरी....

धर्म वेगळे, मात्र मन एकच 
जॉन हे बिगाऱ्याचे काम करीत होते. ते ख्रिश्‍चन समाजातील तर श्रीदेवी या मोची समाजातील. दोघांचेही धर्म वेगळे. त्यामुळे आपल्या प्रेमाचे पुढे का होणार याची चिंता दोघांनाही लागलेली. श्रीदेवी यांना पोलिस उपनिरीक्षक पदावर असलेले स्थळ आले. त्यावेळी जॉन यांनी मन मोठे केले आणि श्रीदेवीचा मार्ग मोकळा केला. पण श्रीदेवी यांनी आपली भूमिका बदलली नाही. त्यांनी विवाह करणार तर जॉनशीच असे ठामपणे सांगितले. तसा निरोप त्यांच्यासाठी स्थळ घेऊन आलेल्या व्यक्तीलाही दिला. त्यामुळे संबंधित व्यक्ती हिरमुसली व निघून गेली. त्यानंतर श्रीदेवी व जॉन यांचा नोंदणी पद्धतीने विवाह झाला. लग्नानंतर नवदांपत्य घरी गेले, त्यावेळी जॉन यांच्या आईने त्यांना घरात घेतले नाही. विवाहाचा निर्णय तु घेतला, आता तूच निस्तार असे सांगितले.

घरचे दरवाजे झाले बंद 
घरचा दरवाजा बंद झाल्यामुळे ते पुन्हा श्रीदेवी यांच्या घराच्या परिसरात रहावयास आले आणि आपला संसास सुरु केला. त्यांच्या विवाहाला आजअखेर 22 वर्षे होऊन गेली. त्यांच्या संसारवेलीवर दोन मुलांच्या रुपाने फुले फुलली आहेत. श्रीदेवी या सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत, तर जॉन हे यशस्वी उद्योजक म्हणून प्रस्थापित झाले आहेत. आजही या कुटुंबामध्ये हिंदू आणि ख्रिश्‍चन धर्माच्या चालीरीतीनुसार सण साजरे करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: valentine day special corporator shreedevi fulare and jhon love of solapur