महापुरात वाहू लागला माणुसकीचा झरा ! देगाव येथील आपद्‌ग्रस्तांना केली युवकांसह विविध संस्थांनी मदत 

रमेश दास 
Saturday, 17 October 2020

देगाव (ता. मोहोळ) येथे भोगावती नदीच्या महापुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी माणुसकीचा झरा वाहू लागल्याची घटना अनुभवायला मिळाली. युवकांसह विविध सामाजिक संस्था महापुरात अडकलेल्या व मदतीची गरज असलेल्या लोकांना मदत केली. 

वाळूज (सोलापूर) : देगाव (ता. मोहोळ) येथे भोगावती नदीच्या महापुरात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी माणुसकीचा झरा वाहू लागल्याची घटना अनुभवायला मिळाली. युवकांसह विविध सामाजिक संस्था महापुरात अडकलेल्या व मदतीची गरज असलेल्या लोकांना मदत केली. 

अतिवृष्टीमुळे वाळूज व देगाव (वा.) येथील भोगावती नदी पात्राचे पाणी गावात शिरल्याने आंबेडकर वस्ती, मातंग वस्ती, चांभार गल्ली, आतकरेवाडा व कुंभारगल्ली येथील लोकांच्या घरांमध्ये पाणी येत असल्याचे पाहून येथील लोकांना तत्काळ सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. यामध्ये सुमारे 150 लोकांचे स्थलांतर करण्यात आल्याची माहिती नागेश पाटील यांनी दिली. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग खोल्या आठ (70 जण), जिल्हा परिषद आश्रमशाळा वर्ग खोल्या चार (50 जण), यशोधन विद्यालय वर्गखोल्या तीन (35 जण) व गावातील इतर नातेवाइकांच्या घरी सुरक्षित ठिकाणी पोचविण्यासाठी गावातील युवकांनी मदतकार्य करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले. 

सुरक्षित ठिकाणी पोचविण्यासाठी प्रकाश सुदाम आतकरे यांनी मोफत ट्रॅक्‍टर, सागर दगडे यांनी ओमिनी, ज्ञानेश्वर माळी यांनी टेम्पो, वसीम शेख यांनी ओमिनी ही आपापली वाहने देऊन व बाधित लोकांना सुरक्षित पोचवण्यास सहकार्य केले. तसेच श्रीराम बचत गटाकडून विस्थापितांसाठी चहा व नाश्‍त्याची सोय करण्यात आली. ग्रामपंचायतीने सर्व शाळांच्या वर्ग खोल्यांमध्ये विजेची व्यवस्था केली. या कामी गावातील राजकुमार पाटील, सदाशिव कांबळे, गणेश सिरसट, मुकुंद आतकरे, सत्यवान जौजट, शहाजी आतकरे यांनी परिश्रम घेतले. सिद्धनागेश उद्योग समूहमधील सर्व सदस्यांनी आपली वाहने देऊन व स्वतः सहकार्य केले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Various organizations including youth helped the disaster victims in Degaon