ऑनलाइन व थेट विक्रीअभावी भाजीपाला उत्पादकांना बसतोय लाखोचा फटका 

bhajipala3.jpg
bhajipala3.jpg

सोलापूरः लॉकडाउनने मार्केट यार्ड बंद आहे. भाजी बाजारात चार तासाच्या वेळेचे बंधन असल्यामुळे नाशवंत असलेल्या भाजीपाल्यांच्या बाबतीत उत्पादकांना विक्रीपासून अडवण्याच्या प्रकाराने या भाजीपाला उत्पादकांना लाखोंचा फटका बसू लागला आहे. हे नुकसान टाळण्यासाठी दूध व खाद्य पदार्थाप्रमाणे भाजीपाल्यास ऑनलाइन व थेट विक्रीची परवानगी या उत्पादकांनी मागितली आहे. 

मागील चार महिन्यापासून शेतकऱ्यांना सोलापूर शहरात भाजी विक्रीसाठी मोठ्या अडचणी येत आहेत. खेड्यातून येऊन पोलिसांनी दिलेल्या वेळेत भाजीपाला बाजारात आणून विकता येत नाही. बाहेरील राज्यात माल विक्री व मार्केट यार्डातून देखील मोठ्या बाजारपेठाला माल जाण्याच्या लिंक विस्कळित झाल्या आहेत. त्याचा फटका थेट या भाजीपाला उत्पादकांना बसतो आहे. 

काशीनाथ भतगुणकी यांनी शेपू, पालक, वांगी, मेथी व कोथिंबीर अशा भाज्यांची लागवड केली. मात्र, लॉकडाउनमुळे सोलापूरमध्ये माल विकता येत नाही. भाजीपाला रोजच्या रोज विक्री करावा लागतो. शहरात ऑनलाईन सेवा सुरू आहेत. खाद्यपदार्थांना ऑनलाइन परवानगी आहे तर भाजीपाल्याला देखील द्यायला हवी असे त्यांचे म्हणणे आहे. 
कुमठे येथील बाबू भोसले यांनी भेंडी व वांग्याची लागवड केल्यानंतर मार्केट अभावी नुकसान झाले. दररोज निघणारी अडीचशे किलो भेंडी व दहा कॅरेट वांगे बाजाराअभावी फेकून देण्याची वेळ आली. त्यांचे दररोजचे नुकसान आठ ते दहा हजार रुपयांचे आहे. बोरामणीच्या अनिता खाडे यांनी टोमॅटो, दोडके, भेंडी, पालक व चुका हा भाजीपाला लावला. मात्र, चार महिन्यापासून विक्रीच नसल्याने नुकसान झाले. केवळ टोमॅटो विक्री न झाल्याने त्यांचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले. उत्तम सातपुते यांनी एक एकरात टोमाट्यांची दहा हजार रोपे लावली. त्याच्या पहिल्या तोड्याला 4 रुपये किलो भाव मिळाला. त्यांनी हैद्राबादला कांदा पाठवला तर त्याला पाच रुपये भाव मिळाला व त्यामध्ये तीन रुपये किलो वाहतूक खर्च लागला. 
सोलापूर शहरात दूध विक्रीला परवानगी दिलेली आहे. सरकारने सुरवातीपासून शेतीमाल विषयक वाहतूक व विक्रीला परवानगीचे धोरण जाहीर केले आहे. तरी देखील या उत्पादकांना चार महिन्यापासून कोरोना संकटामुळे विस्कळित झालेल्या बाजारपेठेचा फटका बसला आहे. पूणे, वाशी व इतर राज्यातील बाजाराची लींक मिळत नसल्याने या उत्पादकांची अडचण झाली आहे. त्यातच स्थानिक बाजारात देखील भाव पडल्याने सातत्याने नुकसान झेलावे लागत आहे. सोलापूर शहरामध्ये भाजी मंडीमध्ये केवळ चारच तासाचा कालावधी दिला आहे. ग्रामिण भागातून भाजी वाहनाने शहरात आणल्यानंतर त्याची थेट विक्री करण्यासाठी अनेक अडथळे आहेत. कोरोनाच्या संसर्गाची शक्‍यता देखील चिंताजनक आहे. 

भाजीपाला उत्पादकांना वेगळा न्याय का ?
सोलापूर ही भाजीपाला विक्रीचे मोठे मार्केट आहे. शहरात खाद्यपदार्थाची ऑनलाइन व थेट विक्री होत आहे. औषधी देखील मिळत आहे. दूधाच्या विक्रीला मान्यता दिली. पण चोविस तासात खराब होणाऱ्या नाशवंत भाजीपाल्याच्या विक्रीला परवानगी न देऊन उत्पादक सतत आर्थिक नुकसान सहन करत आहेत. 
- काशिनाथ भतगुणकी, भाजीपाला उत्पादक सोरेगाव 

भाजीपाल्याचे अर्थकारण फक्त काही तासाचे 
भाजीपाला उत्पादक भाजीपाला पिकवतात तेव्हा त्याची तोड सातत्याने करावी लागते. तोड केल्यानंतर हा भाजीपाला बाजारात लगेच न्यावा लागतो. काही तासात तो विकला नाही तर तो खराब होतो. वाहन व बाजाराअभावी तोड नाही केली तर पुढची तोड नुकसानीत येते. बाजारात माल पोहोचला नाही तर झाडावरून तोड करुन तो माल फेकून देण्याशिवाय पर्याय राहत नाही. उत्पादकांना नुकसानीशिवाय हाती काही लागत नाही. या बाबी समजून न घेताच विक्रीसाठी नियमाची आडकाठी केली जात आहे. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com