विधानपरिषदेच्या पदवीधर, शिक्षकच्या 5 जागांसाठी 1 डिसेंबरला मतदान 

प्रमोद बोडके
Monday, 2 November 2020

उमेदवारीबाबत उत्सुकता 
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर अधिक मतदार असलेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुका होत आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना या निवडणुकीत राहण्याची शक्‍यता असल्याने आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर : महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या शिक्षक व पदवीधर मतदार संघातील रिक्त झालेल्या पाच जागांसाठी केंद्रिय निवडणूक आयोगाने आज वेळापत्रक जाहीर केले आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर येथील पदवीधर व अमरावती आणि पुणे येथील शिक्षक मतदारसंघासाठी विधान परिषदेची ही निवडणूक होत आहे. 

या निवडणुकीची अधिसूचना 5 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. 12 नोव्हेंबर पर्यंत अर्ज स्वीकृती होणार आहे. प्राप्त अर्जांची छाननी 13 नोव्हेंबरला तर 17 नोव्हेंबरला अर्ज माघार घेण्याची मुदत देण्यात आली आहे. या पाचही जागांसाठी 1 डिसेंबरला सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान होणार आहे. 

3 डिसेंबर रोजी या पाचही जागांसाठी मतमोजणी होणार आहे. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण, नागपूर पदवीधरचे आमदार अनिल सोले, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे आणि पुणे शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत यांच्या सदस्यत्वाची मुदत संपल्याने या जागा रिक्त झाल्या आहेत. पुणे पदवीधर मतदारसंघाचे तत्कालिन आमदार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांची पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून विधानसभेत निवड झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Voting on December 1 for 5 seats of Legislative Council graduates, teachers