भोगावती-नागझरी संगमावरून धोकादायक प्रवास; वाळूजसह परिसरातील ग्रामस्थांची पुलाची मागणी 

रमेश दास 
Thursday, 8 October 2020

वाळूज (ता. मोहोळ) येथील भोगावती व नागझरी नद्यांच्या संगमावरील वाळूज-सोलापूर रस्त्यावर पूलच नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना जीव धोक्‍यात घालून नदी पार करावी लागत आहे. पावसाळ्यात आणि देगाव येथील बंधाऱ्याची दारे टाकून पाणी अडविल्यानंतर येथील महिला, शेतकरी, विद्यार्थी व जाधव वस्तीवरील शेकडो नागरिकांना नेहमीच होडीमधून आणि होडी नसेल तर पोहून नदी पार करावी लागते. 

वाळूज (सोलापूर) : वाळूज (ता. मोहोळ) येथील भोगावती व नागझरी नद्यांच्या संगमावरील वाळूज-सोलापूर रस्त्यावर पूलच नसल्याने शेतकरी व ग्रामस्थांना जीव धोक्‍यात घालून नदी पार करावी लागत आहे. पावसाळ्यात आणि देगाव येथील बंधाऱ्याची दारे टाकून पाणी अडविल्यानंतर येथील महिला, शेतकरी, विद्यार्थी व जाधव वस्तीवरील शेकडो नागरिकांना नेहमीच होडीमधून आणि होडी नसेल तर पोहून नदी पार करावी लागते. 

वाळूज हे गाव भोगावती व नागझरी नद्यांच्या संगमावर वसले आहे. यावर्षी मोहोळ तालुक्‍यात चांगला पाऊस झाला नसला तरी शेजारील बार्शी तालुक्‍यासह उस्मानाबाद आणि तुळजापूर परिसरात जोरदार पाऊस झाला असल्याने दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. संगमावर नदीचे पात्र मोठे असल्याने व खोल असल्याने येथे पाण्याचा प्रवाह वेगाने वाहतो. पावसाळ्यात सांगडीवर किंवा पोहूनच नदी पार करावी लागते. देगाव येथील बंधाऱ्याची दारे टाकून पाणी अडविल्यानंतर या ठिकाणी 15 ते 18 फुटांपर्यंत पाणी खोल असते. 

सध्या या रस्त्यावर नदी पार करून जाण्यासाठी दोन होड्या आहेत. दररोज 300 ते 400 शेतकरी, शेतमजूर, महिला व वाटसरू, जाधव वस्तीवरील ग्रामस्थ येथून सकाळी व संध्याकाळी ये-जा करतात. होड्या तुडूंब भरल्याने होडीतून प्रवास करणे कधी कधी धोकादायक होते. नावाडी रात्री आठ-नऊ वाजता आपापल्या घरी निघून जातात. तेव्हा येथून अंधारात रात्री-अपरात्री ये-जा करणाऱ्यांची पंचाईत होत आहे. 

आरोग्य व शिक्षणचे माजी सभापती सुशांत कादे यांनी सांगितले, की वाळूज परिसरातील लोकांना सोलापूरला जाण्यासाठी सोलापूर-वाळूज एसटी कळमणमार्गे (ता. उत्तर सोलापूर) आहे. मात्र नदीवर पूल नसल्याने पावसाळ्यात ही बस साखरेवाडीपर्यंतच असते. वाळूज, देगाव, भैरववाडी, मनगोळी (ता. मोहोळ), तडवळे, मुंगशी, दहिटणे (ता. बार्शी) तसेच माढा तालुक्‍यातील बुद्रूकवाडी, धानोरे, मानेगाव येथील प्रवाशांना हा मार्ग खूप जवळचा आहे. सोलापूरला जाण्यासाठी मोहोळ किंवा वैरागमार्गे दुप्पट अंतर व पैशांचा भुर्दंड लोकांना पावसाळ्यात सोसावा लागतो. म्हणून या ठिकाणी पूल होणे अत्यंत गरजेचे आहे. माजी आमदार राजन पाटील, आमदार यशवंत माने, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रश्नाकडे लक्ष घातले तर हा प्रश्न मार्गी लागणार आहे. सध्या नद्यांच्या संगमावर प्रत्येक व्यक्तीला 300 रुपयांत महिनाभर ने-आण केली जाते. एक वेळा जाण्यासाठी पाच रुपये घेतले जातात. 

याबाबत वाळूजच्या पोलिस पाटील अर्चना कादे म्हणाल्या, होडीमधून व्यक्तींची ने-आण करताना होडी चालकांनी मर्यादित संख्येची अट पाळावी. सर्वांना मास्कची सक्ती करावी. पाण्यातील या वाहतुकीबाबत मोहोळ पोलिस ठाण्याला कळविण्यात आले आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Waluj villagers continue their dangerous journey from Bhogawati-Nagzari confluence