धर्मवीर संभाजीराजे तलावातील पाणी तपासणी ! गुजरातच्या कंपनीसाठी मोजले 16 लाख 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 September 2020

ठळक बाबी... 
- श्री धर्मवीर संभाजीराजे तलावाच्या सुशोभिकरणासाठी साडेसात कोटींचा खर्च 
- तलावातील गाळ व पाण्याचे नमुने तपासणीसाठी अहमदाबाद गो- ग्रीन कंपनीची नियुक्‍ती 
- तीन वर्षांपर्यंत दर दोन महिन्याला होणार गाळ, पाण्याची तपासणी 
- तलावात ड्रेनेजचे पाणी येऊ न देण्याचे कंपनीने दिल्या सूचना; 15 ते 20 ठिकाणांवरील घेतले नमुने 

सोलापूर : कोल्हापुरातील रंकाळा तलावाच्या धर्तीवर सोलापुरातील श्री धर्मवीर संभाजीराजे तलावाचे सुशोभिकरण केले जात आहे. त्यासाठी साडेसात कोटींचा खर्च केला जाणार असून तमिळनाडूतील सेफ- वे कंपनीला काम दिले आहे. तलावातील गाळ आणि जलपर्णी काढल्यानंतर पुन्हा तलावात जलपर्णी येणार नाही. त्यासाठी अहमदाबाद (गुजरात) येथील गो- ग्रीन मेकॅनिझिम या कंपनीतर्फे गाळ आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. आज पहिली चाचणी पार पडली. 

हार्ट ऑफ सिटी म्हणून ओळख असलेला श्री धर्मवीर संभाजीराजे तलाव आता दोन वर्षांत पर्यटनासाठी खुला करण्याचे नियोजन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. दुसरीकडे स्मार्ट सिटीतून श्री सिध्देश्‍वर तलाव परिसर व तलावाचे सुशोभिकरण केले जाणार आहे. त्यातून महापालिकेला मोठे उत्पन्न अपेक्षित आहे. सोलापुरकरांना पर्यटनाची संधी उपलब्ध होणार आहे. विजयपूर रोडवरील तलावातील जलपर्णी काढण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र, त्याला म्हणावे तितके यश मिळाले नाही. "सकाळ'च्या माध्यमातून सातत्याने तलावाच्या सुशोभिकरणासाठी आवाज उठविण्यात आला. त्यानंतर माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मागणीनुसार तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी या तलावाचा समावेश राष्ट्रीय सरोवर संवर्धन योजनेत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव केंद्रीय पर्यावरण विभागाला पाठविला. त्यानुसार या तलावाचा समावेश झाला आणि केंद्र सरकारकडून त्यासाठी सात कोटी 32 लाखांचा निधी मिळाला. आता जलपर्णी काढण्याचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले असून कामाला सुरवात झाली आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water inspection in Dharmaveer Sambhaji Raje Lake! 16 lakh for Gujarat company