
सोलापूर : सध्या लॉकडाउन आहे, रस्त्यांवर वाहनांची आणि माणसांची गर्दी नाही. प्रदूषण जवळपास 70टक्केने कमी झालेले आहे. काही दिवसांनी लॉकडाउन संपणार आहे. पुन्हा सुरू होईल सारं काही. या परिस्थितीतून आपण काय शिकणार हेच महत्त्वाचं ! निसर्ग संवर्धनासाठी, सर्वच प्रकारचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि अशाप्रकारचा संसर्ग कमी होण्यासाठी नेमके काय करणे आवश्यक आहे या संदर्भात निसर्ग माझा सखा व्हॉट्सऍप ग्रुपने ऑनलाइन विचारमंथन केले. त्यावरील मान्यवर मंडळींचे विचार पुढीलप्रमाणे...
आहार, विहार, आचार, विचार ही चतुसूत्री
आहार-दररोज फक्त दोनदाच पुरेसा, पौष्टिक आहार घ्यावा. ज्यामध्ये एक धान्य, एक डाळ, कडधान्य, एक भाजी आणि एक फळ असलंच पाहिजे. विहार-दररोज किमान 20 मिनिटे शारीरिक आणि 10 मिनिटे श्वासाचे व्यायाम झालेच पाहिजेत. शक्य तेथे चालतच जावे. दहा मिनिटे श्वासाचे व्यायाम केलेच पाहिजेत.
आचार-बाहेरून घरात आल्यावर हातपाय स्वच्छ धुवून कपडे बदलणे. दारू, तंबाखूसारख्या व्यसनापासून दूर राहणे, कायमच खोकताना, शिंकताना रुमाल वापरणे, नेहमीच इतस्ततः थुंकणे, मलमूत्र विसर्जन, कचरा टाकणे बंद करणे, उगीचच बोलताना एकमेकांना टाळ्या देणे, पाठीवर थाप मारणे, मिठी मारणे टाळावे.
- डॉ. माधवी रायते, अधिष्ठाता, अश्विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी
हेही वाचा : सोलापूर महापालिका शाळांचे प्रवेशही ऑनलाइन
नाते निसर्गाशी...!
महिन्यातून एकदा प्रत्येक जिल्हा वेगवेगळ्या पद्धतीने टाळेबंदी करावा. आर्थिक विकासासाठी वर्क फ्रॉम होमचे नियोजन केले जावे. त्याच पद्धतीने एक दिवस वैयक्तिक वाहतूक बंद ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी. अति महत्त्वाचे यांना सवलत दिली जाते. आपण आपल्या सोसायटी, कॉलनी, अपार्टमेंटमध्ये एक दिवस स्वच्छता अभियान करावे. परिसरातील केरकचराही काढावा. वृक्षारोपण करून रोपे जगवावीत. फळांची, फुलांची, पशूपक्ष्यांना उपयोगी झाडे लावण्याकडे लक्ष द्यावे. पशूपक्षी संवर्धन करण्यासाठी मदत होईल. पर्यावरणपूरक खाद्य, निवारा पक्ष्यांना मिळेल. टाळेबंदी काळात कचरा रस्त्यावर, पाण्यात टाकताना कोण दिसले नाही व कचरामुक्त परिसर दिसला. तोच जर नेहमी कचराकुंडीत टाकावा. कचरा गाडीचा वापर केला जावा. ओला व सुका कचरा वेगळा ठेवला जावा. कचरा विल्हेवाटीसाठी लक्ष दिले पाहिजे. पशुसंवर्धनसाठी पशूपक्ष्यांना, प्राण्यांनाही पाणपोईची योजना सुरू करावी. आरोग्य संबंधित विचार केला तर घरात बसून आपण प्रतिकारशक्ती वाढण्यास प्रयत्न केला आहे, व्यायामास घरात प्राधान्य दिले, तेच पुढेही करावे. म्हणजे संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होईल. संसर्ग जास्त प्रमाणात वाढणार नाही. आपण आपल्यापासून नियम पाळूया, काळजी घेऊया, संवर्धनासाठी प्रेरित होऊन सुंदर जीवन जगूया.
- विद्या भगरे-भोसले, सचिवा, निसर्ग माझा सखा
परोपकाराय निसर्ग विभृतय..!!
डोळ्यांना न दिसणाऱ्या एका छोट्या विषाणूने परग्रहावर जीवसृष्टी शोधणाऱ्या अचाट बुद्धिमत्तेच्या मानवाच्या अहंकाराला एका झटक्यात संपवले आणि जाणीव करून दिली की मानव या पृथ्वीचा मालक नसून इथला पाहुणा आहे. या परिस्थितीतून बाहेर आल्यानंतर यातून काहीतरी शिकून आपल्यात बदल केला तर निसर्गाने दिलेल्या संधीचे आपण सोने केले असे म्हणता येईल. यासाठी पाश्चात्यांच्या जीवनशैलीचे अनुकरण न करता आपली प्राचीन भारतीय जीवनशैली अंगीकारावी. जसे लवकर झोपणे, लवकर उठणे, बाहेरील तळलेले पदार्थ न खाता घरचे साधे, सकस अन्न खाणे, श्रमप्रतिष्ठा इ. आपल्या गरजा खरोखर किती कमी आहेत आणि जगण्यासाठी खूप मर्यादित पैसे, वस्तू आदी लागतात हे कळले. चांगल्या दर्जाचे कपडे, वस्तू नसतील तरी चालतील पण भाजीपाला, अन्नधान्य गरजेचे आहे आणि हे पिकवणारा बळिराजा हाच जगाचा पोशिंदा आहे हे प्रकर्षाने जाणवले. लॉकडाउननंतर कोणाही शेतकऱ्याला भाजीपाला घेताना भाव पाडून मागणार नाही नक्की. त्याच्या कष्टाचे चीज खूप मोठे आहे जे आपण पैशामध्ये देऊ शकत नाही. या परिस्थितीनंतर लॉकडाउननंतर दर रविवारी घोषित करायला पाहिजे जेणेकरून पेट्रोल, वीज, इ.या सर्व गोष्टींची बचत होईल व वातावरण स्वच्छ राहण्यास मदत होईल. सामाजिक अंतर सर्वांनी इथून पुढे कायमचे पाळले पाहिजे.
-स्वप्नील चाबुकस्वार, निसर्गप्रेमी
पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा
मानवाखेरीज असलेल्या जीवसृष्टीच्या जतनाची नैतिक जबाबदारी मानवावरच आहे. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे खरे आहे. सृजनाचा विनाश करणारी कुबुद्धी फक्त मानवाला आहे. हे "भवताल' आपले नाहीच ते मानव खेरीज इतर जीवसृष्टीचे देखील आहे, म्हणून हे करूयात...
सकाळी व संध्याकाळी फक्त एक तास वाहने, कारखाने, भोंगा, कर्णे, प्रार्थना, मंदिर-घंटा, अजान, अगदी कुकरच्या शिट्ट्या होणार नाहीत असे पाहावे. प्रत्येक विद्यार्थ्याने एका शैक्षणिक वर्षात कमीत कमी पाच झाडे लावून मोठी करावीत, त्यांची पाहणी व गुणदान शिक्षकांनी करावे. स्वच्छतेच्या सवयी (ज्या आता लागल्या आहेत) त्या अंगी कायमच्या रुजाव्यात. यासाठी आकाशवाणीवरून त्याचे दृढीकरण करावे. आठवड्यातील एक दिवस फक्त चालण्याचा अथवा सायकल वापरण्याचा कायदा करावा. कुठल्याही शाखेच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांत प्राणी व वनस्पती संबंधित दोन संशोधने सादर करावीत व त्याचे गुणदान व्हावे. आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांचा व्यावसायिक प्रगतीचा निष्कर्ष त्यांनी केलेल्या जीवसृष्टी जतनाच्या प्रयत्नांवरून ठरवावा.
-अश्विनी मोरे-वाघमोडे, शिक्षिका
मानव व निसर्ग एकमेकांशी जोडलेले
माणसाला घरात बसवून निसर्ग स्वतःला दुरुस्त करून घेत आहे. हवा शुद्ध होत आहे. नद्या स्वच्छ होत आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट कानी पडत आहे. निर्मनुष्यतेचा फायदा घेत अनेक उद्यानातील पशुपक्षी रस्त्यावर आल्याच्या घटना आपण ऐकत आहोत. या घटनेवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की निसर्गाला माणूस नकोसा झाला आहे. काही कालावधीनंतर कोरोनाचा प्रभाव ओसरू लागेल, माणसाचे आयुष्य पुन्हा पूर्ववत सुरू होईल, मग स्वतःच्या विकासासाठी पुन्हा माणूस निसर्गाची, पर्यावरणाची हानी करेल काय? या सृष्टीवर त्याचा एकट्याचा अधिकार नाही तर इतर सजीवालाही जगण्याचा अधिकार आहे या मुद्द्यावर चिंतन करण्याची गरज आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा कमीतकमी वापर करणे, अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर करणे, प्रदूषण नियंत्रणसह विकास योजना राबवणे, अगदी आपल्या घरापासूनच आपण पर्यावरणाचे संवर्धन करू शकतो. कमी अंतराच्या कामासाठी गाडीचा वापर टाळणे गरज असतानाच गाडी वापरणे. यामुळे प्रदूषण टाळणे शक्य होईल.
मानव व निसर्ग हे एकमेकांशी जोडल्या गेलेल्या एकाच व्यवस्थेचा भाग आहेत. पक्षी सुरक्षित राहिले तर आपल्या सभोवतालची जैवविविधता वाचणार आहे. त्यांच्या रक्षणाची जबाबदारी माणसावर आहे.
-वैशाली रवींद्र डोंबाळे, शिक्षिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.