शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळणार तरी कधी?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 मे 2020

कोरोना संकटात उन्हाळी हंगामात शेतमालाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला, कांद्यासह अनेक पिके हातची गेली आहेत. बाजारात शेतमाल पोचविण्यात अजूनही अडचणी आहेत. एवढेच काय, अगदी गावठी आंबा देखील बाजारात आलाच नाही. शेतकऱ्यांजवळ कोणताच पैसा शिल्लक राहिलेला नाही. 

सोलापूरः कोरोनाच्या संकटात लॉकडाउनमुळे बॅंकांपर्यंत पोचण्यासाठी अडथळे येत असून त्यातच खरीप हंगामाची तयारी सुरू झाली आहे. मात्र, अजून तरी पीककर्ज वाटपाबाबत शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी पीककर्ज हाती येईल का, या चिंतेत शेतकरी आहेत. 

हेही वाचाः उजनी धरण मे च्या दुसऱ्या पंधरवड्यात वजा 10 टक्‍क्‍यावर 

कोरोना संकटात उन्हाळी हंगामात शेतमालाचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. भाजीपाला, कांद्यासह अनेक पिके हातची गेली आहेत. बाजारात शेतमाल पोचविण्यात अजूनही अडचणी आहेत. एवढेच काय, अगदी गावठी आंबा देखील बाजारात आलाच नाही. शेतकऱ्यांजवळ कोणताच पैसा शिल्लक राहिलेला नाही. 
अशा स्थितीत पीककर्ज वाटपाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. शासनाने शेतकरी सन्मान योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजना लागू केली आहे. या योजनेमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश आहे. या शेतकऱ्यांना शासनाने क्रेडिट कार्ड देऊन त्यांची पीककर्जाच्या चक्रातून सुटका केली आहे. या कार्डच्या आधारावर ते बियाणे व खतांची खरेदी करू शकतात. 

हेही वाचाः नाशिकच्या धर्तीवर महापालिका सभेची मागणी 

मात्र, योजनेबाहेर असलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाउनची मुदत वाढतच चालली आहे. मृग नक्षत्र हे 7 जूनला असून या वर्षी वेळेवर पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात आहे. आता त्यासाठी केवळ 11 दिवस शिल्लक राहिले आहेत. पावसाने वेळेवर सुरवात केली तर शेतकऱ्यांना पीककर्ज मिळणार कधी, त्यानंतर बियाणे व खतांची खरेदी कशी करायची, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 
ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःची शिल्लक रक्कम आहे, ते आताच बियाणे व खताच्या खरेदीच्या कामाला लागले आहेत. उर्वरित अर्ध्यापेक्षा अधिक शेतकऱ्यांची पीक कर्जाची गरज भागविण्याची अडचण झाली आहे. बॅंकांमध्ये कोरोना संकटामुळे कर्मचारी वर्ग आधीच अपुरा आहे. त्यात रोजच शासकीय योजनाच्या लाभार्थींच्या रांगाच रांगा लागत आहेत. त्यांना सेवा देताना बॅंक यंत्रणेच्या नाकीनऊ आले आहे. उर्वरित कामकाजासाठी वेळच शिल्लक राहत नाही. पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण होणे तर दूरच, पण निदान पाऊस सुरू होण्याआधी त्याची सुरवात तरी होईल का, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will farmers get crop loans?