#statebudget2020 "नमामि चंद्रभागे'चे स्वप्न कधी पूर्ण होणार? 

अभय जोशी
Friday, 28 February 2020

अभियानात समाविष्ट प्रमुख कामे 
चंद्रभागा नदीची पाण्याची पातळी कायम राहण्यासाठी बंधारे बांधणे, नदीचा किमान पर्यावरणीय प्रवाह अबाधित ठेवणे, यात्रेदरम्यान पालखी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी तसेच पंढरपुरात पुरेशा प्रमाणात सार्वजनिक स्नानगृहे आणि स्वच्छतागृहे उपलब्ध करणे, नदीच्या वरील भागातील नदीच्या उपनद्यांवरील नागरी वस्त्यांमधून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी यंत्रणा उभारणे, नागरी घनकचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे, नदीघाटाचे सौंदर्य वाढवणे आणि वनीकरण करणे आदी. 

पंढरपूर (जि. सोलापूर) : भाजप सरकारच्या काळात लाखो वारकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या नमामि चंद्रभागा अभियानाचा ढोल वाजविण्यात आला. ज्या चंद्रभागेत लाखो वारकरी मोठ्या श्रद्धेने स्नान करतात, ती चंद्रभागा स्वच्छ होईल असा लोकांचा समज झाला. परंतु दुर्दैवाने आवश्‍यक कामांसाठी भरीव तरतूद झाली नाही. त्यामुळे पंढरपूर येथील तुळशी वृंदावन उद्यानाच्या खेरीज कोणतीही ठोस कामे अद्याप होऊ शकलेली नाहीत. आता महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात या अभियानातील कामांसाठी भरीव तरतूद करण्याची मागणी वारकरी आणि भक्तांमधून होत आहे. 

हेही वाचा - मोहिते - पाटलांकडे सोलापूर भाजपची सुत्रे?

वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेली चंद्रभागा प्रदूषणमुक्त होऊन ती अविरत निर्मल व्हावी यासाठी मागील सरकारच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून नमामि चंद्रभागा अभियानाची घोषणा करण्यात आली. 1 जून 2016 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत खास परिषद घेण्यात आली. चंद्रभागेच्या उगमापासून संगमापर्यंत नदी स्वच्छ राहावी यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. परंतु चार वर्षे उलटून गेली तरी अद्याप चंद्रभागेत होणारे प्रदूषण फारसे कमी झालेले नाही. 
नमामि चंद्रभागा प्रकल्पातून पंढरपूर येथे यमाई तलावालगत वन विभागाच्या माध्यमातून तुळशी वृंदावन उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरच्या वैभवात निश्‍चितच मोठी भर पडली आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून चंद्रभागा नदीवरील येथील घाट जोडण्याचे काम प्रगतिपथावर आहे. शहरातील काही भागातील सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत होते. घाटालगतचे भुयारी गटाराचे काम झाल्यामुळे आता सांडपाणी थेट नदीपात्राकडे जाणे बंद झाले आहे. विविध माध्यमातून मिळून पंढरपुरात 27 हजार 292 स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. नदीघाटाचे सौंदर्य वाढवण्यासाठी 538 मीटर लांबीचे घाटजोडणीचे काम सुरू आहे. येत्या चार महिन्यांत हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. अभियानाच्या दृष्टीने ही महत्त्वाची कामे म्हणावी लागतील. आगामी अर्थसंकल्पात या अभियानातील अन्य कामांसाठी भरीव तरतूद होण्याची गरज आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will Namami Chandrabhagas dream come true