मोहिते-पाटलांकडे सोलापूर भाजपची सूत्र? 

प्रमोद बोडके
शुक्रवार, 28 फेब्रुवारी 2020

मोहिते-पाटलांचे काय? 
लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांना खासदार करण्यात मोहिते-पाटलांचा सिंहाचा वाटा आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत माळशिरसमधून भाजपच्या राम सातपुते यांना आमदार करण्यातही मोहिते-पाटलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपमध्ये गेलेल्या आणि भाजपला एक खासदार आणि एक आमदार देणाऱ्या मोहिते-पाटलांचे राजकीय पुनर्वसन कधी? हा प्रश्‍न अद्यापही अनुत्तरीत आहे. सुरवातीला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी गोव्याच्या राज्यपाल पदाबाबत जोरदार चर्चा झाली. प्रत्यक्षात मात्र काहीच घडले नाही. येत्या वर्षभरात राज्यपाल नियुक्त आणि विधानसभेतून विधानपरिषद सदस्यांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना संधी मिळेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सोलापूर : सत्तेत असताना सोलापूर भाजपची जेवढी चर्चा झाली नव्हती. तेवढी चर्चा विरोधी बाकावर बसल्यानंतर सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेतील पक्षनेत्याचा वाद असो की सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचा रद्द झालेला अनुसूचित जातीचा दाखला. यामुळे भाजप चर्चेत राहिली आहे. भाजपचे नवीन जिल्हाध्यक्ष कोण? याची देखील चर्चा रंगू लागली आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सहमतीने माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्ह्यातील भाजपच्या निर्णय प्रक्रियेत मोहिते-पाटलांचा सहभाग निर्णायक राहू लागला आहे. जिल्ह्यातील भाजपची सूत्र मोहिते-पाटील यांच्याकडे जातील अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

aschim-maharashtra-news/solapur/bjp-mp-mahaswamy-petitioned-high-court-266055">हेही वाचा - भाजपचे खासदार महास्वामी काय म्हणालेत याचिकेत जाणून घ्या... 
आमदार सुभाष देशमुख गटाचे शहाजी पवार यांच्याकडे सध्या भाजपच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा आहे. भाजपच्या शहराध्यक्षपदी आमदार विजयकुमार देशमुख गटाचे विक्रम देशमुख यांची नियुक्ती झाली असून या दोन देशमुखांशिवाय तिसरा पर्याय मोहिते-पाटील यांच्या माध्यमातून सोलापूर भाजपला मिळण्याची शक्‍यता आहे. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुतणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धैर्यशील मोहिते-पाटील यांची सोलापूर जिल्हा भाजपच्या अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शिवाय अक्कलकोटचे भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या देखील नावाची चाचपणी सुरू असल्याचे समजते. आमदार कल्याणशेट्टी हे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाचे मानले जातात. 
हेही वाचा - असाही निर्णय! प्रवासी नसल्यास जागेवर थांबणार लालपरी 
मार्चच्या पहिल्या आठवड्यात भाजपच्या नूतन जिल्हाध्यक्षांची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. नूतन अध्यक्षाच्या काळात सोलापूर जिल्हा परिषद व त्या अंतर्गत येणाऱ्या 11 तालुका पंचायत समित्या, सोलापूर जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता होणाऱ्या जिल्हाध्यक्षांच्या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. मोहिते-पाटील जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे असून त्याचा लाभ भाजप घेण्याची शक्‍यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Solapur's BJP leadership moving towards Mohite-Patil?