esakal | शिवसेनेचा गटनेता कोण ? बंडखोरीनंतरही नगरसेवकांवर कारवाई नाहीच; महेश कोठे विभागीय आयुक्‍तांच्या भेटीला
sakal

बोलून बातमी शोधा

14shivsena_bjp_ (1) - Copy.jpg

शिवसेनेला पडणार निवडणुकीपूर्वी खिंडार
विषय समित्यांच्या सभापती निवडीत शिवसेनेला संख्याबळानुसार दोन सभापती मिळत असतानाही विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी एकच समिती घेतली. त्यात अनिता मगर व भारतसिंग बडूरवाले यांना संधी मिळण्याची शक्‍यता होती. मात्र, विरोधी पक्षनेत्यांच्या ताठर भूमिकेमुळे शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिता मगर यांनी भाजपला साथ दिली. दुसरीकडे नगरसेविका ज्योती खटके या मतदानावेळी गैरहजर राहिल्या. दरम्यान, महापालिकेत सोयीचे राजकारण करीत आपल्याच माणसांना वारंवार संधी देण्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेला वैतागून शिवसेनेचे विद्यमान तीन ते चार नगरसेवक महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप व कॉंग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा सुरु आहे.

शिवसेनेचा गटनेता कोण ? बंडखोरीनंतरही नगरसेवकांवर कारवाई नाहीच; महेश कोठे विभागीय आयुक्‍तांच्या भेटीला

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : महापालिकेच्या सात विषय समित्यांपैकी भाजपने चार समित्या मिळविल्या. संख्याबळ पुरेसे असतानाही महाविकास आघाडीला विषय समित्या निवडीत अपयश आल्याचा ठपका आता शिवसेनेच्या बंडखोर नगरसेवकांवर ठेवला जात आहे. मात्र, बंडखोरी केलेल्या नगरसेवकांवर पक्षाकडून (गटनेत्यांकडून) काहीच कारवाई झालेली नाही. महेश कोठे हे पक्षाचे अधिकृत गटनेते नसून ते काहीच कारवाई करु शकत नाही, असा ठाम विश्‍वास बंडखोर नगरसेवकांनी व्यक्‍त केला आहे.

शिवसेनेला पडणार निवडणुकीपूर्वी खिंडार
विषय समित्यांच्या सभापती निवडीत शिवसेनेला संख्याबळानुसार दोन सभापती मिळत असतानाही विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी एकच समिती घेतली. त्यात अनिता मगर व भारतसिंग बडूरवाले यांना संधी मिळण्याची शक्‍यता होती. मात्र, विरोधी पक्षनेत्यांच्या ताठर भूमिकेमुळे शिवसेनेचे नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिता मगर यांनी भाजपला साथ दिली. दुसरीकडे नगरसेविका ज्योती खटके या मतदानावेळी गैरहजर राहिल्या. दरम्यान, महापालिकेत सोयीचे राजकारण करीत आपल्याच माणसांना वारंवार संधी देण्याच्या विरोधी पक्षनेत्यांच्या भूमिकेला वैतागून शिवसेनेचे विद्यमान तीन ते चार नगरसेवक महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप व कॉंग्रेसमध्ये जातील, अशी चर्चा सुरु आहे.

विषय समित्या निवडीपूर्वी शिवसेनेने त्यांच्या मतदार नगरसेवकांना व्हिप बजावला असतानाही दोन नगरसेवकांनी बंडखोरी केली तर एक नगरसेवक गैरहजर राहिला. त्यामुळे महापालिकेत संख्याबळात शिवसेना दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष असतानाही तोंडघशी पडला. त्यानंतर नियमानुसार पक्षाविरोधात भूमिका घेणाऱ्या बंडखोर नगरसेवकांवर गटनेत्यांकडून कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी महेश कोठे यांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी विभागीय आयुक्‍तांकडे केली होती. त्यावर अद्याप निर्णय झालेला नसल्याने महापालिकेत शिवसेनेचा गटनेता कोण, असा पेच कायम असल्याने बंडखोर नगरसेवकांवर अद्याप कारवाई होऊ शकलेली नाही, अशी चर्चा आहे. दरम्यान, स्वतंत्र गटासाठी एकूण संख्याबळाच्या दोन तृतियांश (21 पैकी 17) नगरसेवक असावे लागतात. विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर महेश कोठे हे पुन्हा शिवसेनेतच दाखल झाले. दरम्यान, अडीच वर्षांनंतर महापालिकेचा महापौर बदलला, परंतु विरोधी पक्षनेता बदललेला नाही. गट स्थापनेसंबंधीचा निर्णय विभागीय आयुक्‍तांकडे प्रलंबित असल्याने विरोधी पक्षनेता महेश कोठे हे शुक्रवारी (ता. 1) विभागीय आयुक्‍तांच्या भेटीला गेल्याचे वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले. दुसरीकडे महापालिका निवडणुकीस वर्षाचा अवधी असतानाच अमोल शिंदे यांना विरोधी पक्षनेतेपदाच्या गाडीची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

बंडखोर नगरसेवकांचा अहवाल शिवसेनेच्या सचिवांना पाठविणार
विषय समित्यांच्या निवडीवेळी शिवसेनेचे सचिव अनिल देसाई व विनायक राऊत यांनी फोन केला होता. त्यावेळी बंडखोर नगरसेवकांबद्दल व विषय समित्यांच्या निवडीची माहिती दिली. आता महापालिकेचे गटनेते तथा विरोधी पक्षनेते महेश कोठे, शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांना सोबत घेऊन बंडखोर नगरसेवकांचा अहवाल पक्षाला पाठविला जाईल. त्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई होईल.
- पुरुषोत्तम बरडे, जिल्हाप्रमुख, शिवसेना


सत्ताधाऱ्यांचे बजेट फेटाळण्यासाठी 'महाविकास'ची मोट
महापालिकेतील सत्ताधारी भाजपची पार्टी मिटिंग विलंबाने झाल्याने 2017- 18 मध्ये तीन महिने विलंबाने बजेट मांडले. त्यानंतर दुसरे बजेटही सहा महिन्यांच्या विलंबानेच मांडण्यात आले. मात्र, नगरसेवकांना भांडवली निधी मिळालाच नाही. आता 14 महिन्यानंतर महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या कार्यकाळातील पहिले बजेट 11 जानेवारीला मांडले जाणार आहे. हे बजेट अवघ्या दोन महिन्यांपुरतेच असणार आहे. अद्याप नगरसेवकांना ठरल्याप्रमाणे वॉर्डवाईज व भांडवली निधीही मिळाला नाही. या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडीसह अन्य विरोधी पक्षातील नगरसेवक सत्ताधाऱ्यांचे बजेट फेटाळून लावण्याच्या तयारीत आहेत. मात्र, विषय समित्या निवडणुकीत विश्‍वासघात झालेला एमआयएम काय भूमिका घेणार, सत्ताधारी तथा महापौर श्रीकांचना यन्नम यांचा बजेट मांडताना पराभव होऊ नये म्हणून शिवसेनेकडून पुन्हा सोयीचे राजकारण होणार का, याची उत्सुकता लागली आहे.