पंढरपुरात का केला शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न

भारत नागणे 
Sunday, 26 January 2020

पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील शेतकरी रमेश लंगोटे यांनी प्रजासत्ताक दिनीच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक किरण अवचर आणि त्यांच्या पोलिस कर्मचार्यानी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.

पंढरपूर (सोलापूर) : राज्यात कर्जबाजारीपणामुळे  शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असताना आज पंढरपुरात ही एका शेतकर्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून कृषी कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण कर्ज माफी करावी आणि पंढरपुरातील शासकीय जमिनीच्या  परस्पर झालेल्या  विक्रीची चौकशी करावी या मागणीसाठी आज पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील शेतकरी रमेश लंगोटे यांनी प्रजासत्ताक दिनीच  आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान पोलिस निरीक्षक किरण अवचर आणि त्यांच्या पोलिस कर्मचार्यानी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. राज्यात नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांचे संपर्ण कर्ज माफ करावे आणि पंढरपूर येथील कृषी विभागाच्या जमिन खरेदी विक्री व्यवहाराची चौकशी करावी या मागणीसाठी अनवली (ता. पंढरपूर) येथील शेतकरी रमेश लंगोटे यांनी प्रजासत्ताकदिनाच्या दिवशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा दिला होता.  या संदर्भात श्री.लंगोटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि कृषीमंत्री दादा भुसे यांना लेखी निवेदन दिले होते. तरीही सरकारने अद्याप लक्ष दिले नाही.
येथील शेतकऱी रमेश लंगोटे यांनी 2014-15 या वर्षात शेडनेट उभारणीसाठी चळे येथील बॅंक आॅफ महाराष्ट्र शाखेतून कर्ज घेतले आहे. दरम्यान शेती मालाला भाव मिळत नसल्याने ते कर्जबाजारी झाले आहेत. त्यांच्याकडे बॅंक आॅफ महाराष्ट्र शाखेचे 10 लाख रुपये आणि धनश्री पतसंस्थेचे 2 लाख 50 हजार एकूम 12 लाख 50 हजार रुपयांचे कर्ज आहे. अपंग असलेले श्री. लंगोटे हे कर्जबाजारीपणामुळे अडचणीत आले आहेत. त्यांनी संपूर्ण कर्ज माफ करावे अशी मागणी केली आहे. कर्जबाजारीपणामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या श्री.लंगोटे यांनी आज हे टोकाचे पाऊल उचले आहे. पोलिसांनी शेतकरी लंगोटे याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why did the farmer attempt suicide in Pandharpur