का संकटात सापडला सोलापुरचा डाळमील उद्योग ?

प्रकाश सनपूरकर
शुक्रवार, 29 मे 2020

सोलापूर हे एक कारखानदारीचे मुख्य केंद्र आहे. कर्नाटक व महाराष्ट्राची सीमा व त्यासोबत जोडलेले राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमुळे येथे डाळमिलचा व्यवसाय स्थिर झाला. उन्हाळी मूग, तूर, हरभरा आदी कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. शहरात आठ तर शहराबाहेर 25 डाळमिल आहेत. 

सोलापूरः शहर आणि परिसरातील डाळमिल उद्योगाला लॉकडाउनमध्ये हंगाम बंद पडल्याने करोडो रुपयांचा फटका बसला आहे. काम सोडून गेले मजूर, शेतमालाच्या वाहतुकीचे तीनतेरा आणि अडकलेले उत्पादन यामुळे डाळमिलचे अर्थकारण विस्कळित झाले आहे. 

हेही वाचाः महावितरणने ग्राहकासाठी हे करायलाच हवे... 

सोलापूर हे एक कारखानदारीचे मुख्य केंद्र आहे. कर्नाटक व महाराष्ट्राची सीमा व त्यासोबत जोडलेले राष्ट्रीय महामार्ग, रेल्वेमुळे येथे डाळमिलचा व्यवसाय स्थिर झाला. उन्हाळी मूग, तूर, हरभरा आदी कच्चा माल मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. शहरात आठ तर शहराबाहेर 25 डाळमिल आहेत. 
डिसेंबरच्या शेवटापासून डाळमिल हंगामाला सुरवात होते. जानेवारी व फेब्रुवारीत तूर व हरभऱ्याची आवक सुरू होते. त्यानंतर उन्हाळी मूग जून महिन्यात येऊ लागतो. याप्रमाणे हंगाम चालतो. हंगाम सुरू झाल्यानंतर कोरोना संकट गंभीर झाले. मालाची आवक विस्कळित झाली. वाहतूकदार माल आणण्यास तयार होत नव्हते. कारण त्यांना परतीचे भाडे मिळत नव्हते. शेतीमालाला सूट असली तरी प्रत्यक्षात कुणी माल घेऊन येत नव्हते. 

हेही वाचाः सोलापुरातील तुरुंगात घूसला कोरोना 

त्यातच या उद्योगात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मजूर काम करतात. आवक नाही हे पाहून ते देखील परतीच्या वाटेला लागले. हे अकुशल मजूर आहेत. त्यांची मोठी गरज या उद्योगाला लागते. डाळ वाळवण्यापासून ते पॅकिंग करेपर्यंत त्यांचे योगदान असते. कच्च्या मालाची आवक 70 टक्‍क्‍यांनी घसरली. त्यासोबत उत्पादित केलेल्या डाळीसाठी वाशीचे मार्केट बंद झाले. केवळ मजूर नसल्यानेच 10-12 डाळमिल बंद पडल्या. उर्वरित मिलला कच्चा मालाची आवक न मिळाल्याने त्यांची अडचण झाली. दररोज 500 टन डाळीच्या उत्पादन क्षमतेच्या या डाळमिल 50 टक्के देखील क्षमतेने चालू शकल्या नाहीत. आता जूनमध्ये उन्हाळी मुगाची आवक सुरू होते. पण तीही आवक झाली तर प्रक्रिया करण्याची अडचण झाली आहे. 

अडचणी उद्योगाच्या 
लॉकडाउनमुळे कच्च्या मालाची वाहतूक नाही 
काम करणारे परप्रांतीय मजूर गावी परतले 
पक्का माल विकण्याची सोय नाही 
वाशी मार्केट बंद झाल्याने मोठी अडचण 

उद्योगाला आर्थिक फटका
या वर्षी डाळमिलचा हंगाम पूर्णतः वाया गेला. कोरोना संकटाने कच्चा माल आला नाही. मजूर निघून गेल्याने प्रक्रिया विस्कळित झाली आहे. या उद्योगाला फार मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. 
- प्रवीण भुतडा, अध्यक्ष, डाळमिल उद्योजक संघटना 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Solapur's Pulses Industry in Crisis?