esakal | एमआयएमचा "पतंग' उडणार की गटबाजीत अडकणार?, तौफिक शेख बाहेर आल्याने "एमआयएम' चर्चेत 
sakal

बोलून बातमी शोधा

mim logo

सोलापुरातील एमआयएममध्ये गटबाजी होण्याचा प्रश्‍नच नाही. पक्ष ज्याच्यावर जी जबाबदारी देईल ती जबाबदारी त्याने प्रामाणिकपणे पार पाडावी. तौफिक शेख यांच्या माध्यमातून सोलापूर शहरात एमआयएम वाढण्यास मदतच होईल असा मला विश्‍वास आहे. 
- फारुख शाब्दी, शहराध्यक्ष 

एमआयएमचा "पतंग' उडणार की गटबाजीत अडकणार?, तौफिक शेख बाहेर आल्याने "एमआयएम' चर्चेत 

sakal_logo
By
प्रमोद बोडके

सोलापूर : फारसा चर्चेत नसलेला परंतु निवडणुकीतून आपली ताकद दाखवून देणाऱ्या एमआयएमचे राजकारण सध्या रंजक वळणावर आले आहे. तत्कालिन शहराध्यक्ष तौफिक शेख तुरुंगात गेले म्हणून शहर व जिल्ह्यातील एमआयएमची धुरा मनसेतून राष्ट्रवादीमार्गे एमआयएममध्ये आलेल्या फारुख शाब्दी यांच्यावर सोपविण्यात आली. एक वर्षाच्या आत तौफिक शेख तुरुंगातून बाहेर आल्याने येत्या काळात एमआयएमचा पतंग उडणार की गटबाजीत अडकणार? या चर्चेला आता तोंड फुटू लागले आहे. 

2014 च्या विधानसभा निवडणूकीत तौफिक शेख यांची आमदारकी थोडक्‍यात हुकली अन्‌ कार्यकर्त्यांना ही रुखरुख पाच वर्षे सलत राहिली. ऐन निवडणूकीच्या तोंडावर घडलेल्या त्या प्रकारामुळे तौफिक शेख या 2019 च्या विधानसभा निवडणूकीपासून लांब राहिले. "अब की बार...पैलवान आमदार' अशा घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांचा हिरमोस झाला.

शाब्दी यांच्या माध्यमातून एमआयएमला सर्वार्थाने तगडा उमेदवार मिळाल्याने 2019 च्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना एमआयएमने जोरदार टक्कर दिली. शाब्दी यांच्याकडे पक्षाची धुरा आल्यानंतर एमआयएमच्या काही नेत्यांनी कडाडून विरोध केला, वेळप्रसंगी हैदराबाद गाठण्याचाही इशारा दिला पण गटबाजीचे हे सर्व प्रकरण नंतर आपोआप शांत झाले. तौफिक शेख आता बाहेर आल्याने येत्या काळात हे वादळ शांत होणार की उफाळून येणार? याबद्दल दबक्‍या आवाजात चर्चा सुरु झाली आहे. 
 
ताकद एमआयएमची 
इतर पक्ष आगोदर येतात, शाखा काढतात, कार्यकर्ते तयार करतात आणि पक्षाचा विस्तार होतो अशीच काहीशी वाटचाल राजकिय पक्षांची असते. एमआयएमच्या बाबतीत मात्र सोलापुरात वेगळा अनुभव आला. 2014 च्या लोकसभा निवडणूकीपासून एमआयएमचे कधी गुपीत तर कधी उघड वारे सुरु झाले. 2014 च्या विधानसभा निवडणूकीत तौफिक शेख यांच्या माध्यमातून एमआयएमची ताकद प्रत्यक्षात मतदानातून दिसली. पुन्हा तसाच अनुभव 2017 च्या महापालिका निवडणूकीत आला. 2019 च्या विधानसभा निवडणूकीत एमआयएमने फारुख शाब्दी यांच्या रुपाने नवखा उमेदवार दिला तरीही मतांची आकडेवारी कायम राहिली आहे, किंबहुना त्यामध्ये वाढच झाली आहे. एमआयएमचा उमेदवार कोणीही असला तरीही मतदार थेट पक्षाला बांधिल असल्याने एमआयएमची ही जमेची बाजू मानली जात आहे. पक्षाला मानणारा मतदार जसा शिवसेना, भाजपने तयार केला आहे तसाच मतदार सोलापुरात एमआयएमनेही तयार केला आहे. 

  • आकडे बोलतात... 
  • 2014 मध्ये तौफिक शेख यांना मिळालेली मते : 37 हजार 138 
  • 2019 मध्ये फारुक शाब्दी यांना मिळालेली मते : 38 हजार 721 
  • महापालिका निवडणूकीत विजयी झालेले उमेदवार : 9