वायरमनला आता विजेच्या खांबावर चढणे झाले सोपे ! रोपळेच्या सुनील भोसले यांनी बनवले "पायाड' 

Payad
Payad

रोपळे बुद्रूक (सोलापूर) : रोपळे (ता. पंढरपूर) येथील वीज मंडळात बाह्यस्रोत कामगार म्हणून काम करणाऱ्या एका कामगाराने विजेच्या खांबावर चढण्या-उतरण्यासाठीचे पायाड बनवले आहे. त्यामुळे आता विजेच्या खांबावर चढून विजेच्या दुरुस्तीची कामे करणे अधिक सोपे झाले आहे. सुनील भोसले असे त्या कामगाराचे नाव असून, त्याने बनवलेल्या या जुगाडाचा देशभरातील वायरमन व इतर वीज कामगारांना फायदा होणार आहे. 

गरज ही शोधाची जननी म्हटले आहे; याचा प्रत्यय सुनील भोसले यांनी बनवलेले पायाड पाहून येते. या पायाडाचा उपयोग सबंध देशभरातील वायरमन व इतर वीज कामगारांना होणार आहे. सुनील भोसले हे माळकरी आहेत. त्यामुळे त्यांची गावात सुनील बुवा अशी वेगळी ओळख आहे. ते गेल्या दहा-पंधरा वर्षांपासून रोपळे व परिसरातील गावात वीज मंडळाच्या वायरमनसोबत वीज दुरुस्तीची कामे करतात. यात त्यांच्या वाटेला बहुदा विजेच्या खांबावर चढण्याचेच जास्त काम येते. यामध्ये विजेच्या खांबावर चढून तुटलेल्या तारा जोडणे, पंप जोडणे, वीजजोड देणे, सर्व्हिस वायर बदलणे आदी कामे त्यांना विजेच्या खांबावर चढूनच करावी लागते. अशा प्रकारची कष्टाची व धोकादायक कामे करताना त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. दिवसभरात अनेकवेळा विजेच्या खांबावर चढावे लागत असल्यामुळे त्यांच्या पायाचे गोळे वर चढत होते. पायाची पिंढरी, मांड्या व हातांवर प्रचंड ताण येत होता. 

दररोजचा हा विजेच्या खांबावर चढण्यासाठीचा त्रास कमी करण्यासाठी त्यांना एक नामी शक्कल सुचली. त्यासाठी त्यांनी अर्धा इंची स्क्वेअर पाइप व पावसाळी चप्पलचा उपयोग खुबीने केला. विजेच्या खांबावर चढण्यासाठी त्यांनी उजव्या व डाव्या पायासाठी खांबाच्या रुंदीत अडकणारा सांगाडा तयार केला. त्यावर चप्पल फिट केली. अशा पद्धतीच्या जुगाडाच्या सहाय्याने विजेच्या खांबावर चढणे व उतरण्याचे काम सोपे झाले आहे. या जुगाडामुळे त्यांच्या हाता-पायांवर येणारा ताण व त्यामुळे होणारा त्रास आता पूर्ण थांबला आहे. त्यामुळे सुनील बुवाने बनवलेले हे जुगाड तंत्र सर्वत्र गेले तर त्याचा देशभरातील वायरमन व इतरही वीज कामगारांना नक्कीच फायदा होणार आहे. 

आपल्या या जुगाडाबद्दल सुनील भोसले म्हणाले, विजेच्या खांबावर चढण्याचे काम मलाच जास्त करावे लागत होते. त्यामुळे त्याचा खूप त्रास होत होता. हा त्रास बंद करण्यासाठी मी पायाड बनवले. त्याचा मला आता चांगाला फायदा होत आहे. 

रोपळे बुद्रूक येथील बाह्यस्रोत कामगार दीपक निकम म्हणाले, सुनील भोसले यांनी बनवलेले पायाड आम्हालाही खूपच फायदेशीर ठरत आहे. त्यांनी बनवलेल्या या जुगाडामुळे विजेच्या खांबावर चढणे व उतरण्याची कामे अधिक सोपी झाली आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com