Women's day 2021 : "गिनीज'ने गौरवलेल्या सोलापूरच्या आयएएस रोहिणी भाजीभाकरे यांच्या कार्यकर्तृत्वाचा जगभरात डंका !

Rohini Bhajibhakare
Rohini Bhajibhakare

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : 

"मंजिल उन्ही को मिलती है 
जिनकी सपनों मे जान होती है 
हौसले से कुछ नही होता 
पंखों से उडान होती है...' 

ही शायरी कितीही प्रेरणादायी असली तरी, सत्यात उतरवणे तेवढेच अवघड आहे. पण उपळाई बुद्रूक येथील रोहिणी भाजीभाकरे- बिदरी यांनी ग्रामीण भागातून शिक्षण घेत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आयएएस पदाला गवसणी घालत ही शायरी सत्यात उतरवली. तर एवढ्यावरच न थांबता त्यांनी जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून कामाची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांच्या सर्व कामांची दखल खुद्द नॅशनल जिओग्राफी या चॅनेलने घेतली. तसेच 2018 साली एका मैदानावर एकाचवेळी 4 हजार 24 नागरिकांना एकत्र करत अनुभवी प्रशिक्षणार्थीकडून हात धुण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करून, नागरिकांकडून प्रभावीपणे अंमलबजावणी करून घेतली होती. याची नोंद जागतिक गिनीज बुकमध्ये करण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची निवडणूक प्रकिया कशा प्रकारे पार पडते हे जगाला सांगण्याची संधी देखील सोलापूरच्या या कन्येला मिळाली आहे. हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असून त्यांनी प्रशासकीय क्षेत्रात देशभर सोलापूरचे नाव झळकावले आहे. 

मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील उपळाई बुद्रूक या गावच्या असलेल्या रोहिणी भाजीभाकरे-बिदरी. घरची परिस्थिती बऱ्यापैकी होती. पण वडिलांची आपल्या मुलांनी उच्च पदावर विराजमान व्हावे अशी इच्छा असायची. त्यामुळे रोहिणी भाजीभाकरे व आणखी चार भावंडे यांना वडिलांनी अतिशय परिश्रमाने शिकवले. वडिलांची प्रेरणा घेऊन त्यांच्या एका भावाने सध्या स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. तर मोठा भाऊ संदीप भाजीभाकरे हे त्यांच्या अगोदरच स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालेले असून, सध्या पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. तर रोहिणी या 2008 साली पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आयएएस म्हणून उत्तीर्ण झाल्या. 

मसुरी येथे प्रशिक्षण घेत असताना सर्व स्थानिक कायद्यांपासून ते आपल्या अधिकारांपर्यंतचे प्रशिक्षण तेथे त्यांना मिळाले. याच कालावधीत रोहिणी यांची ओळख विजयंत बिदरी या आयपीएस अधिकाऱ्याशी झाली. विजयंत 2005 च्या बॅचचे अधिकारी. दोघे विवाहबद्ध झाले. 

आयएएस अधिकाऱ्यांपुढे सर्वात मोठा प्रश्‍न असतो, तेथील भाषा शिकण्याचा व ती आत्मसात करण्याचा. रोहिणी या जिल्हा ग्रामीण विकास अधिकारी असताना त्यांनी तमिळ भाषा शिकून त्या बोलण्यातही पारंगत झाल्या. त्यांची पहिली पोस्टिंग तमिळनाडू राज्यात झाली. तिथे त्या उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, सहायक जिल्हाधिकारी पदावर उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे तिथेच सेलमच्या जिल्हाधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. विशेष म्हणजे, सेलममध्ये आतापर्यंत 170 जिल्हाधिकारी झाले होते. पण, ते सर्व पुरुष होते. रोहिणी या 170 पुरुषांनंतर पहिली महिला जिल्हाधिकारी होण्याचा मान पटकावला. 

जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती येताच त्यांनी जनतेच्या समस्यांचे निराकरण, कायदा व सुव्यवस्था, तसेच "माझा जिल्हा, माझे वैभव', जिल्ह्याची मेक इन इंडिया योजनेखाली संरक्षण उद्योगासाठी निवड, मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी भर, व हागंदारीमुक्त जिल्हा बनवण्याचा विक्रम देखील त्यांनी केला. तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमांपैकी वैयक्तिक स्वच्छता, हात धुणे हा एक कार्यक्रम आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने दरवर्षी हा उपक्रम 15 ऑक्‍टोबर रोजी सर्वत्र राबविला जातो. परंतु प्रशासकीय स्तरावर या उपक्रमाची अंमलबजावणी केली जाते. इतर नागरिकांकडून या उपक्रमात पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही. ही बाब लक्षात घेऊन सेलमच्या तत्कालीन जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे- बिदरी यांनी प्रशासकीय स्तरावर या उपक्रमाचे दोन टप्प्यांत आयोजन करून, एका मैदानावर एकाच वेळी 4024 नागरिकांना एकत्र करीत अनुभवी प्रशिक्षणार्थी लोकांकडून हात धुण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले होते. बरेच आजार हे हात व्यवस्थित न धुतल्याने कसे होतात व आरोग्याच्या दृष्टीने हात धुणे किती महत्त्वाचे आहे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली होती. त्यामुळे एकाच वेळी एकाच मैदानावर चार हजारपेक्षा अधिक लोकांनी व त्याचवेळी संपूर्ण सेलम जिल्ह्यात बारा लाख लोकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला होता. यामध्ये गृहिणी, विद्यार्थी, वयस्कर व्यक्ती, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्वांचाच समावेश होता. त्यांच्या या कार्याची दखल जागतिक गिनीज बुकने घेतली आहे. 

सेलम जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक राष्ट्रपातळीवर देखील करण्यात आलं आहे. त्यामुळे पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून रोहिणी भाजीभाकरे यांनी 2019 ला पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलं. भारतात 545 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. कोट्यवधी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावत नवीन सरकार स्थापन केले. निवडणूक आयोगाने सरकारी कर्मचारी आणि देशातील सुरक्षा रक्षकांना सोबत घेऊन शांततेत आणि अतिशय सहजतेनं ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निश्‍चितच भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशातील निवडणूक प्रकिया ही जगभरातील लोकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. कारण आदिवासी बहुल भागांपासून ते दिल्लीच्या हाय प्रोफाईल लोकांपर्यंत सर्वच मतदारांनी त्यादिवशी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुरक्षा यंत्रणा, ईव्हीएम प्रणाली, व्हीव्हीपॅट प्रणाली, निवडणूक आयोगाची नियमावली, आचारसंहिता यांसह बारीकसारीक गोष्टींचे नियोजन या मतदान प्रक्रियेवेळी करावे लागते. त्यामुळेच, जगभरातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताची निवडणूक प्रकिया एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे ही प्रक्रिया कशी पार पडते हे जगाला माहीत व्हावे यासाठी नॅशनल जिओग्राफी या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने पुढाकार घेतला. संपुर्ण देशातील वेगवेगळ्या घडामोडींवर चित्रीकरण करून नेमकी सत्यघटना अथवा त्यामागील तथ्य जगासमोर प्रदर्शित करण्यात आले. वृत्तवाहिनीवर 15 ऑगस्ट 2019 रोजी भारतातील निवडणूक प्रक्रिया नेमकी कशी पार पडते, यावर माहितीपट प्रदर्शित केला व हा माहितपट सांगण्यासाठी संपूर्ण भारतातून दोन जिल्हाधिकाऱ्यांची निवड केली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसीचे जिल्हाधिकारी व दुसऱ्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे-बिदरी यांचा समावेश होता. 

सेलमच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी व त्यांनी तेथे केलेल्या कामांची दखल घेऊनच त्यांची यासाठी निवड केली. त्यामुळे सर्वांत मोठी राज्यघटना असलेल्या भारताची लोकशाही प्रक्रिया जगाला सांगण्याची संधी संपूर्ण देशातून सोलापूरच्या कन्येला मिळाली. त्यामुळे सोलापूरकरांसाठी अभिमानास्पद व नक्कीच मराठी पाऊल पडते पुढे, अशी वाटणारी गोष्ट आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com