
चैतन्यदायी दीपोत्सावास मोठ्या उत्साहाने प्रारंभ झाला आहे. या उत्सावातील धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाच्यानिमित्ताने लक्ष्मीसंदर्भात चिंतनपर लेख.
- डॉ. नरेंद्र सदाशिव कुंटे
आसरा सोसायटी, होटगी रस्ता, सोलापूूर
संत शांतिब्रह्म एकनाथ महाराज हे प्रापंचिक असूनही परमार्थी होते. त्यामुळे त्यांचे जीवन कौटुंबिक-सामाजिक-धार्मिक अशा तीनही स्तरावर पाहण्यास मिळते. त्यात सर्वत्र त्यांचे जीवन कार्य अत्यंत आदर्श स्वरूपाचे होते. हे वेगळे सांगायला नको. भागवताच्या एकादश स्कंधावर त्यांनी 18000 ओव्यांचा नाथ भागवत हा मराठीतून ग्रंथ लिहून त्यातून श्रीकृष्ण उद्धव संवाद लिहून भक्ती निरूपण केले आहे. त्यांनी भारुडे, गवळणी तसेच अभंगही लिहिले आहेत. समाजाला त्यांनी सोप्या भाषेतून उपदेश केला असून व्यवहारचातुर्य ही शिकवले आहे.
धनवेंच व्यवहार
नाथ भागवतातील अनेक महत्त्वपूर्ण विषयांपैकी त्यांनी मांडलेला "धनवेंच व्यवहार' हा अतिशय मोलाचा असून प्रपंचासह परमार्थ करणाऱ्याला तो मार्गदर्शक आहे. संत कोणतीही गोष्ट आत्मकल्याण आणि जनकल्याण हाच हेतू ठेवून विशद करतात. एरवी मांडले गेलेले व्यावहारिक स्तरावरील अर्थसंकल्प कधी तुटीचे तर कधी शिलकीचे मांडले जातात. अलीकडे तर तुटीचेच अर्थसंकल्प मांडले गेल्याचे पाहायला मिळते. पण पूर्वी शिलकी अर्थसंकल्प मांडून आपली आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे दाखविले जात असे. अगदी प्रापंचिक स्तरावर देखील पूर्वी घरी (कौटुंबिक) जमा खर्च दिला जात असे. त्यात खाली खर्च वजा जाता काही रक्कम श्री शिल्लक म्हणून दाखविली जात होती. नाथांच्या धनवेंच व्यवहारात तर लक्ष्मी घरीच राहते, नांदते आणि स्थिरावतेही.
नैतिकतेचे अधिष्ठान
सर्वच संतांनी भक्ती मार्गावरील साधकांना एक "पथ्य' पाळावयास सांगितले आहे. ते कोणते म्हणाल तर परस्त्री व परधनापासून पासून दूर राहावे. कारण तसे करणे नैतिकतेशी निगडीत आहे. परस्त्री- परधनाचा संग हा अधःपतित करणार असून त्यांने आपल्या जीवनात अंतिमतः दुःखाचीच प्राप्ती होते. उद्धवानेच भगवंताला यासंदर्भात मार्गदर्शन करण्यास सांगितले होते तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की, स्वकष्टार्जित धन व धर्मपत्नी यांचा सांभाळ करताना त्यांच्याशिवाय अन्य धन व स्त्री यांचा लोभ धरू नये. उलट स्वकष्टार्जित धनाचा विनियोग प्रपंच याबरोबरच स्वधर्मकार्यार्थ करावा. त्यायोगे सुख, आनंद व समाधान प्राप्त होते. अलीकडील संतांपैकी श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर तर रुपयातील आठ आणे प्रपंचासाठी व आठ आणे परमार्थासाठी खर्च करावे, असे सांगतात. पुढे तर श्री गुरुदेवांनी 100 रुपयातला 1 रुपये तरी परमार्थासाठी खर्च करावा. कित्येक साधक आजही पगारातला एक शतांश हिस्सा देव कार्यासाठी (भक्ती कार्यासाठी) खर्च करतात.
सज्ञान धनवंत व्हा!
स्वकष्टार्जित धनातून परमार्थासाठी खर्च करणारा जर साधक असेल, तर नाथांनी त्याला सज्ञान धनवंत असे म्हटले आहे. धनाचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे मोक्ष धन व दुसरे म्हणजे यक्षधन होय. कष्टार्जित धन म्हणजे पुण्यधन होय. त्यायोगे लक्ष्मी घरी स्थिरावते. अन्य मार्गाने मिळविलेले धन त्याक्षणी घरी आले तरी ते हे मागील दाराने (अधर्म रीतीने) येते. लक्ष्मी चंचल आहे. ती मागील दारानेच निघून जाते. कष्टाविना मिळालेल्या द्रव्याचा अभिमान धरता येत नाही. अशा द्रव्यसंचयाने माणसाची झोपही उडते. त्याऐवजी स्वकष्टार्जित धनाची श्रीमंती हीच खरी श्रीमंती होय. कन्यादानात स्वेच्छेने दिलेले धन हे धर्ममान्य आहे. पण छळ- कपट -त्रास देऊन मागितलेले धन पाप स्वरूप आहे. ते लाभतही नाही.
दानधर्म पुण्यप्रद होय!
समाज दानशूर असणे आणि त्यांनी दानधर्म करणे या दोन्ही गोष्टी धनवंतास भूषणावह आहेत. कष्टार्जित धनाच्या दानाने दानशुराला पुण्य लाभते. हे दान देताना ते दिल्याची हळहळ करता कामा नये. तळतळाटाच्या पोटी दिलेले दान घेणाऱ्यांनाही हे घेणाऱ्याला लाभत नाही. कर्ज काढून वा मागून घेऊन दिलेले दानही अधर्म स्वरूप आहे. येथे महाभारतातला एक प्रसंग सांगण्याजोगा आहे. कौरव-पांडवांचे युद्ध संपले व पांडव विजयी झाले. धृतराष्ट्र हा राज्य पदावरून खाली उतरला. त्याला वाटू लागले की आपण दानधर्म करून पुण्य मिळवावे म्हणजे घडलेली पापकृत्ये धुवून जातील. पण दान द्यायला त्याच्या तिजोरीत धनही नव्हते. तेव्हा तो धर्मराजाकडे आला आणि म्हणाला हे राजा मला दानधर्म करावयाचा आहे, त्यासाठी तुझ्या तिजोरीतून धन दे. तेव्हा धर्मराजाने त्याला धन दिले. शेजारी उभा असलेल्या भीम म्हणाला, असे मागून घेतलेल्या धनाचे दान पुण्यप्रद कधी ठरत नाही, तेव्हा कर्ज काढून वा मागून आणून दान केले तर "धर्मदान' ठरत नाही.
परोपकाराने पुण्य-प्राप्ती
नाथ महाराज सांगतात की, परोपकाराची जाणीव करुन न देता मोठ्या मनाने परोपकार करावा. पण मी परोपकारी असे स्वतः तर म्हणू नये. पण देवाने मला कष्टार्जित धन दिले, म्हणून मी धन देत आहे, असे म्हणावे. ते मोक्ष (पुण्यस्वरुप) धन होय. लुबाडून आणलेले धन हे यक्षधन (पापस्वरुप) होय. धन मिळवावे, पण सत्कार्यार्थ खर्च करावे, इतकेच...
संपादन : अरविंद मोटे