यंदा वारकरी मानसिकदृष्ट्या वारीत होणार सहभागी 

प्रशांत देशपांडे 
सोमवार, 1 जून 2020

यावर्षी आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. याविषयी वारकरी म्हणाले, वारीत जो आनंद मिळतो, तो आनंद जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही. मात्र, यंदा शासनाने परवानगी दिली, तर गावातील एका मंदिरात संध्याकाळी जाऊन भजन, कीर्तन, हरिपाठ करण्याचा मानस आहे. तसेच घरात बसून देवाचे नामस्मरण करण्यात येणार आहे. 

सोलापूर : आषाढी वारीला लाखो भाविक माउलींचे नामस्मरण करत हजारो किलोमीटरचा प्रवास करत पंढरपुरात येत असतात. मात्र, वाढता कोरोना प्रार्दुभावाने यंदाची वारी रद्द करण्यात आली. त्यामुळे यंदा वारकरी प्रत्यक्ष वारीत सहभागी होणार नसले तरी मानसिकदृष्ट्या वारीत सहभागी होऊन विठ्ठलाचे नामस्मरण करणार असल्याची माहिती काही वारकऱ्यांनी "सकाळ'ला दिली. 

हेही वाचा : लॉकडाऊनच्या बेरोजगारीत अनेक रोजगार शोधणारा अवलिया 

"ज्ञानेश्‍वर माउली....ज्ञानराज माउली तुकाराम' नामाचा जषयघोष करीत आषाढी वारीला लाखो वारकरी पंढरपूरला चालत येत असतात. आषाढी एकादाशीला पंढपूरला कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात तसेच महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून मानाच्या सात पालख्यांसह 700 ते 800 पालख्या येत असतात. त्यांच्यासमवेत हजारो दिंड्या आणि वारकरी वारीत सहभागी होत असतात. भक्तिभावाची शिदोरी घेऊन वारकरी पुढच्या वर्षी वारीत सहभागी होण्याची आस घेऊन परत फिरतात. परंतु, यावर्षी आषाढी वारी रद्द करण्यात आली आहे. याविषयी वारकरी म्हणाले, वारीत जो आनंद मिळतो, तो आनंद जगाच्या पाठीवर कुठेही मिळत नाही. मात्र, यंदा शासनाने परवानगी दिली, तर गावातील एका मंदिरात संध्याकाळी जाऊन भजन, कीर्तन, हरिपाठ करण्याचा मानस आहे. तसेच घरात बसून देवाचे नामस्मरण करण्यात येणार आहे. 

हेही वाचा : भुकेच्या प्रवासातील थांबा म्हणजे ""प्रार्थना फाउंडेशन"" 

मानसिकदृष्ट्या आळंदी ते पंढरपूर वारी करणार 
यंदा वारकरी शारीरिकदृष्ट्या आळंदी ते पंढरपूर वारी करू शकत नसले तरी ते मानसिकदृष्ट्या आळंदी ते पंढरपूर वारी करणार आहेत. घरात बसूनच वारीचा अनुभव घेणार आहेत. घरात बसून पोथी वाचन, कीर्तन, पांडुरंगाचे नामस्मरण करणार आहोत. 
- भागवत महाराज चवरे, 
आंबेकर ऊर्फ अजरेकर महाराज फडाचे प्रमुख 

घरात बसूनच साधना करणार आहोत. 
आमच्या घरात चार पिढ्यांपासून वारीची पंरपरा आहे. मी मागील चार वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर वारी करतो. मात्र, यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर वारी होणार नाही. त्यामुळे आम्ही घरात बसूनच वारीचा अनुभव घेणार आहोत. घरात बसूनच साधना करणार आहोत. 
- स्वप्नील साळुंखे, 
कर्जत, जिल्हा नगर 


घरच पंढरपूर समजून घरातच नामसाधना करणार 
मी मागील 11 वर्षांपासून वारी करत आहे. मात्र, यंदा वारीत सहभागी होता येणार नाही याची खंत आहे. वारीत सहभागी झाल्यानंतर वर्षभराचा आनंद मिळतो. यंदा आपले गाव आणि घरच पंढरपूर समजून घरातच सकाळी काकडा आणि संध्याकाळी हरिपाठ करणार आहोत. 
अतुल पवार, 
शहाड, जिल्हा कल्याण 

 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year Warkari will be mentally participating in Wari