भुकेच्या प्रवासातील थांबा म्हणजे "प्रार्थना फाउंडेशन' 

 Foundation
Foundation

सोलापूर : सध्या संपूर्ण देश कोरोनासोबत लढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउनची स्थिती आहे. प्रशासन, पोलिस, डॉक्‍टर, अत्यावश्‍यक सेवा पुरवणारे तसेच काही सामाजिक संस्था या लढ्यात सहभागी आहेत. कोरोनाच्या या लढ्यात कोणाची उपासमार होणार नाही, यासाठी सोलापुरातील प्रार्थना फाउंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. 
22 मार्च रोजी जनता कर्फ्यू लागू झाल्यापासून ते आजतागायत रोज प्रार्थना फाउंडेशनच्या वतीने जवळपास तीनशेच्यावर लोकांना जेवण दिले जाते. 

संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 22 हजार लोकांना अन्नदान केले आहे. तर एक हजार कुटुंबांना अन्नधान्याचे किट, किराणा, काही कुटुंबांना भाजीपाला तसेच जीवनावश्‍यक वस्तू देण्यात आल्या आहेत. जवळपास रोज चार ते पाच हजार रुपयांचे जेवण, किराणा, भाजीपाला, चहा, नाष्टा, बिस्कीट, पाणी व जीवनावश्‍यक वस्तू प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत पोचविल्या जातात. 
जे लोक भिक्षा मागून जगतात, ज्यांचे हातावरचे पोट आहे, मजूर आहेत, परराज्यातून कामासाठी आलेले कुटुंब, स्थलांतर करून पोट भरण्यासाठी आलेले लोक, विद्यार्थी, समाजातील तृतीयपंथी तसेच सेक्‍स वर्कर महिला, घरकाम करणाऱ्या महिला, झोपडपट्टी भागात राहणारे कुटुंबे अशा सर्व गरजूंना प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. लॉकडाउनची परिस्थिती संपेपर्यंत ही मदत सुरूच राहणार असल्याचे संस्थेच्या सचिव अनू मोहिते यांनी सांगितले. 

प्रार्थना फाउंडेशन ही संस्था आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, निराधार, बेघर, वंचित, उपेक्षित मुलांसाठी व अनाथ, बेघर आजी-आजोबांसाठी काम करते. या संस्थेच्या माध्यमातून आश्रम उभारणीसाठी जमा केलेले पैसे कोरोनाच्या संकटात कोणाचाही भूकबळी पडू नये म्हणून वापरण्यात आला. आश्रम उभारणीसाठी जमा केलेले पैसे व समाजातून मदत म्हणून आलेली रक्कम तसेच पुरस्कारातून मिळालेली रक्कम अशी एकूण सर्व रक्कम कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशाच्या सेवेसाठी देण्यात आल्याचे मत संस्थेचे प्रमुख प्रसाद मोहिते यांनी व्यक्त केले. रोजचे जेवण बनवणे व वाटणे या कामामध्ये गोविंद तिरणगारी, मुकेश जमादार, रोहित कोळेकर, सिद्रय्या पाटील, प्रसाद बिराजदार, कोमल वडवराव, रोहिणी लेंढवे यांचे सहकार्य मिळते. 

भुकेल्याची भाकर होण्याचा आपला छोटासा प्रयत्न

भुकेचा प्रवास हा कधीच न संपणार आहे. कित्येक मजूर कुटुंबांचा भाकरीसाठी सुरू झालेला प्रवास भाकरी मिळविण्यातच संपला. रेल्वेच्या ट्रॅकवर त्या भाकरीवर सांडलेलं मजुरांचं रक्त आणि त्या रक्तरंजित भाकरी अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. कुणाच्या आयुष्याची भाकरी होता येणार नाही; पण भुकेल्याची भूक भागविण्याइतपत तरी मदत आपण नक्कीच करू शकतो. सध्याच्या काळात भुकेल्याची भाकर होण्याचा आपला छोटासा प्रयत्न सुरू आहे. 
- प्रसाद मोहिते, 
प्रमुख, प्रार्थना फाउंडेशन, सोलापूर 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com