शंभर टक्के लॉकडाउन करणारे येरवडा देशातील पहिले कारागृह ! अधीक्षक पवार यांच्या नियोजनामुळे वाचला अनेकांचा जीव 

U. T. Pawar_Yerwada
U. T. Pawar_Yerwada

उपळाई बुद्रूक (सोलापूर) : वर्ष 2020 उजाडले काही नवीन आशा, उमेद घेऊन पण; ही आस काही फार काळ टिकली नाही. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दर 100 वर्षांनी निसर्ग आपले रौद्ररूप दाखवतो म्हणतात ते खरेच आहे. मार्च 2020 च्या अखेरीस अचानक कोरोना नावाच्या विषाणूने जगभरात थैमान घातले आणि हा-हा म्हणत या विषाणूने महामारीचे रूप कधी धारण केले समजलेच नाही. प्रत्येक देशासाठी ही नवीन आकस्मिक आपत्ती होती. अचानक काळाने घाला घालावा आणि आपण पूर्णतः बेसावध असावे, असेच काही तरी घडले. या महामारीच्या काळात पोलिस व आरोग्य प्रशासनाने सर्वतोपरीने प्रयत्न केले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसलीही कसर पडू दिली नाही. मिळेल त्या परिस्थितीला सामोरे जात त्यांनी या परिस्थितीचा सामना केला. इतरांच्या आरोग्याची रात्रंदिवस खबरदारी घेणाऱ्या अधिकाऱ्यांनाच कोरोनाने जेव्हा पछाडले तेव्हा... यातीलच एक म्हणजे पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार. त्यांनी "ई-सकाळ'शी बोलताना, लॉकडाउनच्या काळातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातील त्यांचे अनुभव सांगितले आहेत. 

सोलापूरचे सुपुत्र असलेले यू. टी. पवार गेल्या काही वर्षांपासून पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. कारागॄह विभागातील अत्यंत जबाबदारीच्या आणि संवेदनशील पदावर कार्यरत असताना अचानकच कोरोना या महामारीने राज्यासह संपूर्ण जगात थैमान घातले. अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे अधीक्षकांना काय करावे अन्‌ कोणती उपाययोजना करावी आणि या महामारीतून आपले कर्मचारी, कैदी आणि स्वतःसह आपले कुटुंब कसे तग धरू? हाच विचार रात्रंदिवस अस्वस्थ करीत होता. मग अशा संकटाच्यावेळी त्यांनी काही धाडसी निर्णय स्वतःच्या विविध कल्पनांचा वापर करून, तर काही शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घेतले. कोरोनाच्या काळात त्यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहात केलेल्या काटेकोरपणे अंमलबजावणीचे कार्य नक्कीच नोंद घेण्यासारखे झाले आहे. 

येरवडा कारागॄह हे राज्यातील सर्वांत मोठे, व्यापक आणि अतिसंवेदनशील कारागृह म्हणून ओळखले जाते. येथील बंदींची संख्या आणि त्यांचे गुन्ह्यानुसार वर्गवारीची विविधता ही खूप मोठी बाब आहे. परंतु, एखाद्या संस्थेचा प्रशासक हा प्रशासकासोबतच तेथील वास्तव्यास असणाऱ्यांचा पालकही असतो, हीच भावना ठेवून येरवडा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांनी काही निर्णय त्वरित घेतले. 

आज ते गर्वाने सांगतात, की "या कोरोना महामारीपासून कारागृहाला सुरक्षित ठेवण्यात मी यशस्वी झालो.' त्यापैकी सर्वप्रथम काही कठोर निर्णयांची अंमलबजावणी त्यांनी सुरू केली. सर्वप्रथम संपूर्ण कारागृह 100 टक्के लॉकडाउन करणारे येरवडा हे भारतातील पहिले कारागृह ठरले आहे. तसेच सर्वांत उशिरा लॉकडाउन संपविण्याचा मान देखील याच कारागृहाचा आहे. लॉकडाउनच्या काळात ड्यूटीचे नियोजन करताना यात अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दोन गट तयार केले. प्रत्येक गट दिलेल्या दिवसापासून 21 दिवसांसाठी कैद्यांच्या समवेत कारागृहात 24 तास राहून दैनंदिन कामकाज व सुरक्षा पाळत आपले कर्तव्य बजावत होता. यात स्वतः अधीक्षक यू. टी पवार यांचा देखील समावेश होता. 

कैद्यांच्या कुटुंबीयांसोबतच्या अधिकृत भेटी, मुलाखती त्यांनी तत्काळ बंद केल्या; जेणेकरून विषाणूचा संसर्ग थोपविता येईल. या निर्णयाने सुरवातीला नाराज असणारे आणि विरोध करणाऱ्यांना आता हा निर्णय किती योग्य होता याची प्रचिती येऊ लागली. दैनंदिन रोटेशन पद्धतीने सरकारी रुग्णालयाच्या मदतीने कर्मचारी व कैद्यांचे स्वॅब टेस्टिंग त्यांनी सुरू केले व बाधितांना त्वरित विलगीकरणात ठेवले. बाहेरून नव्याने प्रवेशित होणाऱ्या कैद्यांना सक्तीने 14 दिवस विलगीकरणासाठी शासकीय स्वतंत्र जागेत वसतिगृह उपलब्ध करून घेतले. व नियमित आतील कैद्यांपासून त्यांना वेगळे ठेवले. 14 दिवसांनंतरच त्यांना मुख्य कारागृहात प्रवेशित केले. 

कारागृहात जागोजागी हात धुण्यासाठी स्वतंत्र पाणी व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली. कर्तव्यावर येणाऱ्या आणि आत - बाहेर कराव्या लागणाऱ्या लोकांसाठी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था केली. सर्व कैद्यांना रोज रात्री हळदीचे गरम दूध व "क' जीवनसत्त्वाच्या गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला. सॅनिटायझर, ऑक्‍सिमीटर आणि काही होमिओपॅथीच्या गोळ्या अशा गोष्टींची मदत काही स्वयंसेवी संस्थांकडून मिळविली व त्यांनी देखील मोलाचे सहकार्य केले. कागद, फाईल यांची देवाण-घेवाण करताना विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी कारागृहाबाहेर मंडप घालून छावणी कार्यालय सुरू केले व सर्व पत्रव्यवहार कागद हाताळणी येथूनच केली गेली. त्यासाठी स्वतंत्र अधिकारी- कर्मचारी यांचा चमू तयार केला होता; जेणेकरून आतील लोकांना संसर्ग होऊ नये. या लॉकडाउन काळात कर्तव्यावर स्वतःला लॉकडाउन करीत कैद्यांसमवेत त्यांना मिळणारे अन्न, नाश्‍ता, राहण्याच्या पद्धती, अंघोळीपासून ते असणारे आतील मर्यादित सुविधेसह सर्व जीवन अधीक्षक यू. टी. पवार यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी स्वतः अनुभवले. या काळात प्रशासन व कैदी यांच्यात सलोख्याचे संबंध निर्माण झाले व प्रशासनाविषयी कैद्यांच्या मनात अधिक आदरभाव निर्माण झाला. 

कारागृहातील कैद्यांना मनोरंजनासाठी असलेल्या रेडिओच्या माध्यमातून सतत कोव्हिडविषयी जनजागृती करण्यात येत होती. तसेच तज्ज्ञांमार्फत त्यांचे समुपदेशन करण्यात येत होते. कैद्यांना नातेवाइकांसोबतच्या भेटी बंद झाल्याने त्यांची मानसिक अस्वस्थता सांभाळणे खूप जिकिरीचे काम होते. ती आमच्या कारागृहातील सर्व प्रशासनाने व्यवस्थितरीत्या सांभाळले. सर्व अधिकारी- कर्मचारी, वैद्यकीय सेवक यांचे अमूल्य योगदान व अधीक्षक यू. टी. पवार यांच्या नेतॄत्व, साहस आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची शैली यामुळे या महामारीपासून कारागृहाला वाचविण्यासाठी उपयुक्त ठरली. विशेष बाब म्हणजे महिलांसाठी असणाऱ्या स्वतंत्र कारागृहात आजअखेर एकही महिला कैदी कोरोना बाधित झाली नाही, हे फार मोठे प्रशासनाचे यश म्हणता येईल. 

येरवडा मध्यवर्ती कारागृह आतील प्रशासन व कायद्यांच्या आरोग्याच्या बाबतीत सर्व प्रतिबंधात्मक खबरदारी घेणारे अधीक्षक यू. टी. पवार यांनाच शेवटी कोरोनाची लागण झाली. 14 दिवसांचे विलगीकरण व औषधोपचार घेऊन ते तत्काळ पुन्हा सेवेत रुजू झाले. या काळात त्यांना एडीजी सुनील रामानंद व डीआयजी देसाई यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती त्यांनी "ई-सकाळ'शी बोलताना दिली. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com