देशातील सर्वांत उच्चशिक्षित तरुण खेडभाळवणीचा सरपंच ! आयआयटीत डॉक्‍टरेट केलीय प्रा. डॉ. संतोष साळुंखे यांनी

भारत नागणे 
Saturday, 27 February 2021

आयआयटी, मुंबईमध्ये एअरोस्पेस या विषयात डॉक्‍टरेट घेऊनही स्वतःच्या गावाची सेवा करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रा. डॉ. संतोष भारत साळुंखे यांना खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी सरपंचपदी तर पदवीधर असणाऱ्या अश्विनी अविनाश पाटील यांना उपसरपंचपदी बिनविरोध निवडून अनोखी परंपरा निर्माण केली आहे. देशातील सर्वांत उच्चशिक्षित सरपंच म्हणून प्रा. डॉ. संतोष साळुंखे त्यांची ओळख झाली आहे. 

पंढरपूर (सोलापूर) : खेड्याकडे चला, या महात्मा गांधींच्या संदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत आयआयटी, मुंबईमध्ये एअरोस्पेस या विषयात डॉक्‍टरेट घेऊनही स्वतःच्या गावाची सेवा करण्यासाठी धडपडणाऱ्या प्रा. डॉ. संतोष भारत साळुंखे यांना खेडभाळवणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामस्थांनी सरपंचपदी तर पदवीधर असणाऱ्या अश्विनी अविनाश पाटील यांना उपसरपंचपदी बिनविरोध निवडून अनोखी परंपरा निर्माण केली आहे. देशातील सर्वांत उच्चशिक्षित सरपंच म्हणून प्रा. डॉ. संतोष साळुंखे त्यांची ओळख झाली आहे. 

ग्रामपंचायत स्थापनेपासून गत 65 वर्षांत प्रथमच सत्तांतर घडवत खेडभाळवणीकरांनी तरुणांना संधी दिली. राजकारणाकडे उच्चशिक्षित तरुणांची पाहण्याची दृष्टी नकारात्मक असतानाच डॉ. संतोष साळुंखे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवला व ग्रामविकासाचे सेवाव्रत स्वीकारण्याचे ठरविले. त्यास जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. 

स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजला विद्यार्थीप्रिय प्राध्यापकाच्या नोकरीबरोबर डॉ. संतोष साळुंखे हे आधुनिक शेतीही करतात. भीमा नदीकाठी असणाऱ्या खेडभाळवणीस सुंदर पर्यटन स्थळात परावर्तित करून ग्रामविकासाबरोबरच तरुणांना ग्रामोद्योगाद्वारे गावातच विविध लघुउद्योगांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॅ. संतोष साळुंखे यांनी सांगितले. त्यासाठी गावातील सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन घेणार असल्याचे सांगून आदर्श ग्राम निर्मिती करणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. 

उपसरपंचपदी पदवीधर असणाऱ्या अश्विनी साळुंखे यांनीही ग्रामविकासाबरोबरच महिलांसाठी काम करणार असल्याचे सांगितले. 

अनोखी परंपरा निर्माण करणाऱ्या खेडभाळवणीच्या या सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके, स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी सत्कार केला. उच्चशिक्षित तरुणांच्या हाती सत्ता देण्यासाठी नानासाहेब घालमे गुरुजी, भारत साळुंखे, सुभाष पाटील, लक्ष्मण साळुंखे व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. आर. देशमुख, एन. जे. खांडेकर, बिंटू कौलगे यांनी काम पाहिले. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A young man with a doctorate in IIT became the Sarpanch of Khedbhalvani Gram Panchayat