उमेदवाराचा स्टेटस का ठेवला म्हणून तरुणास हातपाय तोडण्याची धमकी ; गुन्हा दाखल 

प्रशांत काळे
Sunday, 17 January 2021

अक्षय चंद्रकांत सावंत, गणेश सुखदेव चिकणे, तुकाराम सुनील चिकणे, नागेश मधुकर शिंदे, श्रीकांत शरद चिकणे, इंद्रजीत सुखदेव चिकणे(सर्व रा.गुळपोळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुभम दुसंगे(वय 22)याने फिर्याद दाखल केली. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली.रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल झाला. 

बार्शी (सोलापूर) ः गुळपोळी (ता.बार्शी) येथे तरुणाने मोबाईलवर उमेदवाराचा स्टेट्‌स ठेवला म्हणून दूध संकलन केंद्रात बोलावून घेऊन त्याच्या कानशिलात देण्यात आल्या तर यापुढे स्टेट्‌स ठेवला तर हात- पाय मोडून जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
अक्षय चंद्रकांत सावंत, गणेश सुखदेव चिकणे, तुकाराम सुनील चिकणे, नागेश मधुकर शिंदे, श्रीकांत शरद चिकणे, इंद्रजीत सुखदेव चिकणे(सर्व रा.गुळपोळी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शुभम दुसंगे(वय 22)याने फिर्याद दाखल केली. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजता घडली.रात्री अडीच वाजता गुन्हा दाखल झाला. 
गुळपोळी येथील बसस्थानकावर शुभम दुसंगे मित्रांसमवेत थांबला असताना अक्षय सावंत याने त्यास तुझ्याकडे काम आहे तू दूध संकलन केंद्रात ये असा फोन करुन बोलावून घेतले तेथे हे सर्वजण होते. 
तेथे जाताच त्याला खाली बसवण्यात आले. व्हाट्‌सऍपवर उमेदवार निरंजन चिकणे यांचे स्टेट्‌स का ठेवतो असे विचारले. यापुढे स्टेट्‌स ठेवला तर तुझे हात-पाय मोडेन, असे म्हणत दोनदा कानशिलात मारण्यात आल्या. तेथून बाहेर येत असताना इंद्रजीत चिकणे यांनी शिवीगाळ केली तर नागेश शिंदे याने कानशिलात मारली. परत स्टेट्‌स ठेवला तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली.पोलिसांनी अद्याप कोणासही ताब्यात घेतले नसून तपास हवालदार रियाज शेख करीत आहेत.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man threatens to amputate limbs for keeping candidate status; Filed a crime