निवडणूक पूर्वीची आणि आत्ताची; सांगतायेत 11 वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख

अभय जोशी
मंगळवार, 23 एप्रिल 2019

तब्बल अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख( वय 92) यांच्याशी साधलेला संवाद

पंढरपूर: पूर्वी भिंती रंगवून उमेदवारांना स्वतःचा प्रचार करावा लागायचा आता एका भागात सभा झाली की सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या सभेचा वृत्तांत अवघ्या काही मिनिटात जगभरात पोचतो. त्यामुळे प्रचार सोपा झाला आहे. परंतु, सभांमधून बोलताना काळजी घ्यावी लागत आहे. पूर्वी राजकीय पक्षांनी केलेल्या कामाविषयी तसेच त्यांच्या जाहीरनाम्याविषयी प्रचार सभातून चर्चा होत असे परंतु आता प्रचार सभातून व्यक्तिगत पातळीवरील टीकाटिपण्णी अधिक केली जात आहे असे मत तब्बल अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांनी आज सकाळशी बोलताना व्यक्त केले.

माढा लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या निमित्ताने सकाळ प्रतिनिधीने सोलापूर जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी संवाद साधला त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाले पूर्वी मतपत्रिकांचा माध्यमातून मतदान होत असे. त्यासाठी वेळ लागायचा मतदान केंद्रावर रांगा लागायच्या. मतमोजणीला उशीर होत असे.

आता मतमोजणीच्या सोयीसाठी ईव्हीएम मशिनच्या साह्याने मतदान घेतले जात आहे परंतु, अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या तक्रारी ऐकू येतात. आज सांगोला शहर आणि तालुक्यात अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या तक्रारी आलेल्या लोकांना त्यामुळे मतदानासाठी थांबावे लागले. या व्यवस्थेत सुधारणा झाली पाहिजे असेही देशमुख म्हणाले.

अनेक प्रकारचे आश्वासने देऊन मोदी सरकार देशात आणि राज्यात सत्तेवर आले परंतु या आश्‍वासनांची पूर्तता ते करू शकले नाहीत. सत्ताधारी भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यायला हवे होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे त्यांनी अधिक लक्ष द्यायला पाहिजे होते परंतु दुर्दैवाने या सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. आता दुष्काळी परिस्थिती असताना देखील या सरकारने जनावरांसाठी छावण्या देखील सुरू केले नाहीत असे सांगून देशमुख यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली.

शेतकऱ्यांमधून भाजपा-शिवसेना युतीच्या सरकार विषयी तीव्र नाराजी आहे त्याचा फटका भाजपा-शिवसेना युतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत बसणार आहे. यावेळी युतीच्या जागा निश्चित कमी होतील असे देशमुख यांनी नमूद केले.

भारतीय जनता पक्षात काही मंडळींनी प्रवेश केला आहे परंतु त्याचा फार मोठा लाभ या पक्षाला होईल असे वाटत नाही. माढा लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संजय शिंदे हे निश्चित निवडून येतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ganpatrao Deshmukh explains the transition of election