#SaathChal देवाजीच्या वारीत दंगले वैष्णव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 July 2018

सातारा - हरिनामाचा झेंडा खांद्यावर मिरवत देहभान विसरून चालणारे वारकरी, गळ्यात तुळशीची माळ अन्‌ डोईवर तुळशीचे पवित्र वृंदावन घेऊन लगबगीने जाणाऱ्या महिला. जिकडे पाहावे तिकडे माउलींचा गजर करणारे वारकरी आणि दिमाखात लहरणाऱ्या भगव्या पताका. सारे वातावरणच विठूमय. टाळ- मृदंगांच्या अव्याहत निनादात दंग होऊन गेलेल्या लाखो वारकऱ्यांनी आज लोणंद परिसर माउली... माउलींच्या घोषाने दुमदुमवून टाकला. 

सातारा - हरिनामाचा झेंडा खांद्यावर मिरवत देहभान विसरून चालणारे वारकरी, गळ्यात तुळशीची माळ अन्‌ डोईवर तुळशीचे पवित्र वृंदावन घेऊन लगबगीने जाणाऱ्या महिला. जिकडे पाहावे तिकडे माउलींचा गजर करणारे वारकरी आणि दिमाखात लहरणाऱ्या भगव्या पताका. सारे वातावरणच विठूमय. टाळ- मृदंगांच्या अव्याहत निनादात दंग होऊन गेलेल्या लाखो वारकऱ्यांनी आज लोणंद परिसर माउली... माउलींच्या घोषाने दुमदुमवून टाकला. 

आज दुपारी संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखीचे लोणंदमध्ये आगमन झाले. सकाळी निरेतील पालखी विसाव्याच्या ठिकाणी माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची तुडूंब गर्दी झाली होती. तळावर दर्शन चांगले मिळते, या अनुभवनाने सातारा, सांगली, कोल्हापूरपासून अगदी कर्नाटकातील भाविक सकाळपासूनच लोणंदमध्ये दाखल होत होते. निरा येथे पादुकांचे दर्शन घेत होते.

गर्दी एवढी होती, की रस्ता दिसत नव्हता. रस्त्यावरून फक्त माणसांचा पूर वाहत होता. अनेक वारकरी दर्शन घेऊन लोणंदमध्ये पालखी तळाकडे कुच करत होते. सोहळ्यात बालवृद्ध दंग झाले होते. हौसेने कपाळी गंधाचा टिळा लेवून छोटा झेंडा मिरवणारी काखेतील लहान मुलेही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

रस्त्यावर दिंडीतील वारकऱ्यांची वाहने आणि भाविकांची मोठी गर्दी होती; पण सारे काही शिस्तीत सुरू होते. फक्त एकमेकाला सहकाऱ्याचीच भावना आढळत होती. भाविक गर्दीतही एकमेकाला फक्त माउली म्हणूनच संबोधत होते. बघावे तिकडे भगव्या पताका लहरत होत्या. अनेक दमलेले भाविक झाडाच्या सावलीत थोडी विश्रांती घेत होते अन्‌ पुन्हा विठूरायाच्या ओढीने चालत होते. अनेक दानशूर वारकऱ्यांच्या सेवेसाठी त्याना लागणाऱ्या पाण्यापासून नाष्ट्यापर्यंतची सोय पुरवत होते. 

पालखी सोहळा दुपारी नीरा नदीच्या पुलावर आला तेव्हा तर पादुका रथाकडे डोळे लावून जागा मिळेल तेथे बसलेल्या भाविकांनी माउलींचा जोरदार गजर केला. मानकऱ्यांनी पादुका नदी पात्राकडे स्नानासाठी नेल्या तेव्हा पादुकांना स्पर्श करून दर्शन घेण्यासाठी उडालेल्या झुंबडीने पोलिसांसह सर्वांचीच भंबेरी उडाली. पादुकांना नदीपात्रात सचैल स्नान घालताच पुन्हा माउलींच्या घोषाने आसमंत दुमदुमून गेला.

पादुकांना स्नान अन्‌ मुसळधार पाऊस
काल पालखी सोहळ्याचा वाल्ह्यात मुक्काम होता. आकाश निरभ्र होते. पावासाचा तसा मागमूसही नव्हता. आज दुपारी माउलींच्या घोषात पालख्या लोणंदकडे निघाल्या. आकाशात थोड ढग होते. पादुकांचा रथ नीरा नदी ओलांडून सातारा जिल्ह्यात आला. पादुकांना नीरेत स्नान घातले आणि मुसळधार पावसास सुरवात झाली. पादुका आणि सोहळ्याचे जिल्ह्यात जलधारांनी जोरदार स्वागत केले. पडणाऱ्या पावसात चिंब भिजलेल्या वाकऱ्यांचे टाळ - मृदंग निनादत राहिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal wari palkhi sant dnyaneshwar maharaj