खोदाईपोटी ठेकेदाराकडून 7 नव्हे 16 कोटी भरपाई घ्या...

घनशाम नवाथे 
Friday, 15 January 2021

शहरात पाईपलाईनद्वारे सीएनजी गॅसचा पुरवठ्यासाठी होणाऱ्या रस्ते खोदाईपोटी ठेकेदाराकडून घेण्यात येणारी भरपाई सात कोटी नव्हे तर 16 कोटी घ्यावी, अशी मागणी करीत विरोधकांनी सभापती पाडुरंग कोरे यांच्यावर टक्केवारीचा आरोप केला. कोरे यांनी या विषयाला मंजुरी दिल्याने विरोधकांनी आरोप करीत सभात्याग केला. 

सांगली : शहरात पाईपलाईनद्वारे सीएनजी गॅसचा पुरवठ्यासाठी होणाऱ्या रस्ते खोदाईपोटी ठेकेदाराकडून घेण्यात येणारी भरपाई सात कोटी नव्हे तर 16 कोटी घ्यावी, अशी मागणी करीत विरोधकांनी सभापती पाडुरंग कोरे यांच्यावर टक्केवारीचा आरोप केला. कोरे यांनी या विषयाला मंजुरी दिल्याने विरोधकांनी आरोप करीत सभात्याग केला. 

ठेकेदाराकडून प्रभाग क्रमांक 8, 9, 10, 17 व 19 मध्ये पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी रस्त्यांच्या होणाऱ्या खोदाईपोटी भरपाई म्हणून 7 कोटी 4 लाख रुपये भरून घेण्याचा विषय पटलावर होता. या विषयावरूनही सभेत प्रचंड गोंधळ झाला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी याला विरोध केला. किमान 16 कोटी रुपये ठेकेदाराकडून भरून घ्यावेत, अशी मागणी केली. 

मात्र सभापती कोरे यांनी हा विषय मंजूर केला. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. याबाबत कॉंग्रेसचे प्रकाश मुळके, मंगेश चव्हाण, राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, दिग्विजय सूर्यवंशी यांनी सभापती पांडुरंग कोरे यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला. भाजप आणि सभापती यांनी टक्केवारीसाठी या विषयाला मंजुरी दिली असा आरोप त्यांनी केला. हाच काय भाजपचा पारदर्शी कारभार असा सवाल केला. सभापती कोरे यांनी आघाडीच्या सदस्यांचे आरोप फेटाळून लावत 7 कोटी नुकसान भरपाईचा निर्णय प्रशासनाने रस्त्यांचे मोजमाप करून घेतला आहे. त्यावर सभेत बसून बोलणे योग्य नाही. या निधीतून खराब झालेले रस्ते पुन्हा दुरुस्त केले जातील. त्यावरच खर्च केला जाईल असे स्पष्ट केले. 

तत्पूर्वी सभेच्या सुरवातीलाच कॉंग्रेसचे नगरसेवक मंगेश चव्हाण, प्रकाश मुळके यांनी अपुऱ्या पाणी पुरवठ्यावरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. पाणी कमी दाबाने आणि अपुरे का येते असा सवाल उपस्थित केला. प्रत्येक सभेत पाणी प्रश्नावर चर्चा होते. सभापती पाणी पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देतात. अधिकारी मात्र सभापतींच्या सूचनांचे पालन करत नाहीत. मग सभाच कशाला घेता, सभापतींना काही अधिकार आहेत, अशा प्रश्‍नांची सरबत्ती त्यांनी केली. हा पाणी प्रश्न निकालात निघत नाही तोपर्यंत सभा तहकूब करा, असा आग्रह त्यांनी धरला. त्यावर उपायुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन मार्ग काढला जाईल, असे आश्‍वासन दिले. 

नव्या शववाहिका... 
मध्यंतरी मिरज-कुपवाडमेध्य शवाहिकांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यावेळी दोन शववाहिका खरेदीच्या निर्णयानुसार लवकरच त्या पालिकेला मिळतील. त्यांचे पासिंगही झाले आहे. दोन दिवसात त्या कार्यान्वित होतील, असे सभापती कोरे यांनी सांगितले. मिरज आणि कुपवाड शहरासाठी या शववाहिका देण्यात येणार आहेत. 

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: खोदाईपोटी ठेकेदाराकडून 7 नव्हे 16 कोटी भरपाई घ्या...