तीन महिन्यांत सांगली जिल्ह्यात १० खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

भरदिवसा चोऱ्या, बंद घरफोड्या, चेन स्नॅचिंग, मारामारी, तीन पानी जुगार, मटका, बेकायदा सावकारी, नशेखोरी, खुनी हल्ले यापाठोपाठ अगदी सहजपणे कोणाचाही खून असे प्रकार घडू लागले आहेत.

तीन महिन्यांत सांगली जिल्ह्यात १० खून

सांगली - भरदिवसा चोऱ्या, बंद घरफोड्या, चेन स्नॅचिंग, मारामारी, तीन पानी जुगार, मटका, बेकायदा सावकारी, नशेखोरी, खुनी हल्ले यापाठोपाठ अगदी सहजपणे कोणाचाही खून (Murder) असे प्रकार घडू लागले आहेत. शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही गुन्हेगारी (Crime) फोफावली आहे. जिल्ह्यात तीन महिन्यांत १० खून झाले असून गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढल्याचे हे सिद्ध झाले आहे. बेसिक पोलिसिंगचा (Police) विसर पडल्याचा हा परिणाम दिसत आहे. वाढती गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

सांगलीत काही दिवसापूर्वी गुंड नवनाथ लवटे याचा खून झाला. हरिपूर येथे दोन दिवसांपूर्वी आरटीओ एजंट सुरेश नांद्रेकर यांचा चौघांनी खून केला. काल रोहन नाईक याचा रंग उडवण्याच्या कारणातून झालेल्या वादातून खून झाला. ग्रामीण भागातही खुनाचे प्रकार घडले. काही खून हे नशेखोरांकडून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक गुन्ह्यांचे मूळ नशाखोरीतच दडल्याचे स्पष्ट होत आहे. दारू, गांजा, औषध म्हणून गोळ्यांचा नशेसाठी वापर व अन्य अंमली पदार्थांचा वापर केला जातो. नशा करूनच गुन्हा करण्याचे धाडस केले जाते. नशेखोरांकडून पाठोपाठ गुन्ह्यांचे सत्र सुरू आहे.

सांगलीत भरदिवसा घरासमोरून दुचाकी लांबवल्या जात आहेत. घरात घुसून मोबाईल लंपास केले जातात. चालत जाणाऱ्या महिलांबरोबर आता मोपेडस्वार महिलांचे दागिने लांबवले जात आहेत. मारामारीचे प्रकार तर गल्लोगल्ली सुरूच आहेत. कोणाची भिती उरली नाही. तीन पानी जुगारांचे अड्डे सर्वच पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सुरू आहेत. मटक्याचे नेटवर्क पुन्हा जोडले गेलेय. बेकायदा सावकारीने तर कहर केला आहे. वर्चस्ववादातून गुंडगिरीचे जाळे पुन्हा विणले जात आहे. किरकोळ कारणातून गुंड एकमेकांची खुन्नस काढू लागलेत. त्यातूनच खुनी हल्ले, खून यासारखे प्रकार घडत आहेत.

एकीकडे गुन्ह्यांचे सत्र घडत असताना ते रोखण्यासाठी उपाय करताना पोलिस कोठेच दिसत नाहीत. गुन्हा घडल्यानंतर तपास करून आरोपींना अटक करण्यापुरतेच त्यांचे काम राहिलेय काय? अशी शंका येते. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस ठाणे स्तरावर सध्या कोणताच ‘ॲक्शन प्लॅन’ दिसून येत नाही. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच नव्याने गुन्हेगारी क्षेत्रात आलेले तरुण सहजपणे गुन्हे करू लागलेत. त्यामुळे भविष्यात किरकोळ कारणातून कोणाचाही खून होऊ शकतो? अशी भीती सामान्यांच्या मनात आहे.

गुन्हेगारांना सातत्याने कायद्याच्या कचाट्यात जखडून ठेवण्याची गरज आहे. तरच त्यांच्यावर कायद्याचा धाक राहू शकतो. पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी सावकारी सेल स्थापन करून सावकारांविरूद्ध जोरदार मोहिम उघडली आहे. तसेच तडीपारीची कारवाई देखील जोरात केली आहे. परंतू आता गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ राबवण्याची आदेश देण्याची गरज आहे.

खुनाच्या घटना...

गुंड नवनाथ लवटे, आरटीओ एजंट सुरेश नांद्रेकर, पेंटर रोहन नाईक या तिघांचे सांगली परिसरात नुकतेच खून झाले. जागा वादातून जयंतीलाल ठक्कर यांचा खून मिरजेत झाला. जतमध्ये दुहेरी खून झाला. जिल्ह्यात असे तीन महिन्यांत जवळपास दहा खून झाले आहेत. तसेच संकेश्‍वरजवळील खुनात सांगलीतील दोघे सहभागी होते. शिवणगी (जि. सोलापूर) येथील खुनात सांगलीतील संशयित आढळले आहेत.

गुन्हेगारीचे मूळ नशेखोरीत...

गांजा, ब्राऊन शुगर, मेडिकलमधील गोळ्यांचा नशेसाठी राजरोस वापर केला जात आहे. नशेच्या अंमलाखालीच गुन्ह्याचे धाडस केले जाते, असे पोलिस तपासात दिसून आले आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे मूळ नशेमध्येच असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे सहजपणे मिळणाऱ्या नशेच्या साधनावर पोलिस व संबंधित विभागांनी कारवाई करण्याची गरज आहे. तरच भविष्यात गुन्हेगारी कमी होईल.

Web Title: 10 Murders In Sangli In Three Months Crime

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sanglicrimemurder
go to top