मदतीसाठी मुंबईला पाठवलेल्या 100 बसेस परत मागवल्या 

घनश्‍याम नवाथे 
Thursday, 29 October 2020

मुंबईत "बेस्ट' च्या मदतीसाठी पाठवलेल्या सांगली जिल्ह्यातील 112 एसटी कर्मचाऱ्यांना तेथून आल्यानंतर कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांतूनही याबद्दल संताप व्यक्त होत आहे.

सांगली : मुंबईत "बेस्ट' च्या मदतीसाठी पाठवलेल्या सांगली जिल्ह्यातील 112 एसटी कर्मचाऱ्यांना तेथून आल्यानंतर कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. कर्मचाऱ्यांतूनही याबद्दल संताप व्यक्त होत आहे. अखेर राज्य परिवहनच्या महाव्यवस्थापकांनी सांगली व कोल्हापूरातून पाठवलेल्या अनुक्रमे 100 व 75 बसेसची सेवा 31 ऑक्‍टोबरपासून स्थगित करण्यात आली. या बस एक नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने परत येतील. 

मुंबईतील लोकल रेल्वेसेवा कोरोनामुळे बंद असल्यामुळे महापालिकेच्या "बेस्ट' परिवहन सेवेवर ताण होता. त्यामुळे "बेस्ट' च्या मदतीसाठी एस.टी. धावून गेली. प्रति किलोमीटर भाडे मिळणार असल्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यातून एसटी गाड्या पाठवण्यात आल्या. सांगली जिल्ह्यातून दोनशे चालक व दोनशे वाहक आणि 25 कर्मचारी पाठवण्यात आले. दोन आठवड्यानंतर दोन दिवसांपूर्वी चारशे कर्मचारी परतले. त्यांची कोरोना चाचणी घेतल्यानंतर 112 जण बाधित असल्यामुळे खळबळ उडाली. कर्मचारी आणि कुटुंबियातून संताप व्यक्त करण्यात आला. कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. 

मुंबईत पाठवलेले कर्मचारी "कोरोना' घेऊन परतल्यानंतर राज्यभर खळबळ उडाली. एस.टी. प्रशासनावर जोरदार टीका होऊ लागली. त्यामुळेच आज राज्य परिवहनच्या महाव्यवस्थापकांनी परिपत्रक काढून सांगली व कोल्हापूरची मुंबईतील बससेवा 31 ऑक्‍टोबरपासून स्थगित करत असल्याचे जाहीर केले. त्याबदल्यात आता सिंधुदुर्ग व बीड विभागातून गाड्या व कर्मचारी पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे सांगलीतून गेलेल्या शंभर गाड्या आणि कोल्हापुरातून गेलेल्या 75 गाड्या एक नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने परत येतील. तेथे गेलेल्या चालक-वाहकांची जेवण व भोजनाची सोय देखील 31 ऑक्‍टोबरपर्यंतच केली जाणार आहे. 

एसटी कर्मचाऱ्यांना मुंबईत बेस्टच्या मदतीसाठी पाठवून त्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार घडला. जिल्ह्यात 112 कर्मचारी बाधित झाले. त्यांच्या कुटुंबियांना देखील त्रास झाला. एकीकडे पगार थकीत असताना कर्मचाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी खर्च करावा लागत आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला कारणीभूत असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या भूमिकेवर ठाम आहे. 
- अशोक खोत, विभागीय अध्यक्ष, एस. टी. कामगार संघटना 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 100 buses sent to Mumbai for help were recalled