"108' रुग्णवाहिका बनली 900 बालकांचे जन्मस्थळ

शिवाजीराव चौगुले
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

गेल्या सहा वर्षांत सांगली जिल्ह्यात 108 रुग्णवाहिकेने एकूण एक लाख 18 हजार 837 रुग्णांना औषध उपचाराची सेवा देऊन रुग्णांनाचा "ऑक्‍सिजन' बनण्याचे काम केले आहे. या तत्काळ मिळणाऱ्या सेवेमुळे मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. 904 पेक्षा जास्त मातांनी 108 रुग्णवाहिकेतच बाळांना जन्म दिला आहे. त्यामुळे या बालकांचे जन्म ठिकाण हे 108 बनले आहे. 

शिराळा, ता. 9 : गेल्या सहा वर्षांत सांगली जिल्ह्यात 108 रुग्णवाहिकेने एकूण एक लाख 18 हजार 837 रुग्णांना औषध उपचाराची सेवा देऊन रुग्णांनाचा "ऑक्‍सिजन' बनण्याचे काम केले आहे. या तत्काळ मिळणाऱ्या सेवेमुळे मृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. 904 पेक्षा जास्त मातांनी 108 रुग्णवाहिकेतच बाळांना जन्म दिला आहे. त्यामुळे या बालकांचे जन्म ठिकाण हे 108 बनले आहे.

हृदयविकारसह गंभीर आजारपण, सर्पदंश, प्रसूती, अथवा रस्ते अपघातात तत्काळ उपचार मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत व भारत विकास ग्रुपच्या माध्यमातून जानेवारी 2014 पासून महाराष्ट्रामध्ये 937 अत्याधुनिक रुग्णवाहिका, अत्याधुनिक जीवन रक्षण प्रणाली 23 रुग्णवाहिका आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यात नागरिकांना याचा फायदा होत आहे. 

या प्रत्येक रुग्णवाहिकेवर तीन तज्ज्ञ डॉक्‍टर व दोन प्रशिक्षित चालक 24 तास सेवा बजावत असतात. 108 रुग्णवाहिका सुरू झाल्यापासून गेल्या सहा वर्षांत सांगली जिल्ह्यामध्ये एकूण 1 लाख 18 हजार 837 रुग्णांनी या सेवेचा लाभ घेता आला. विशेष करून रुग्णवाहिकेतून प्रसूतीसाठी नेत असताना 904 पेक्षा जास्त मातांनी 108 रुग्णवाहिकेतच बाळांना जन्म दिला आहे. 

या रुग्णवाहिकेचा शिराळा सारख्या डोंगराळ भागात ज्या ठिकाणी दळणवळणाच्या सुविधा कमी आहेत अशा ठिकाणी या सेवेचा खूप चांगला उपयोग होत आहे. रुग्णवाहिकेची सेवा देण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा व्यवस्थापक डॉ. परशुराम हरणे, सहाय्यक जिल्हा व्यवस्थापक विशाल शिंदे , पर्यवेक्षक संतोष गायकवाड, शरद पवार, हे या रुग्णवाहिकावरती 24 तास लक्ष ठेवून असतात. 

सहा वर्षांतील रुग्णसेवा... 

  • रस्ते अपघात- 14090 
  • भाजलेले -502 
  • हृदयरोग - 188 
  • उंचावरून पडलेले - 3610 
  • विषबाधा - 4620 
  • गरोदर स्त्रिया -29843 
  • गंभीर आजार -65984 

शिराळ्याला फायदा

जिल्ह्यात एकूण 24 रुग्णवाहिका असून, शिराळा तालुका हा डोंगरी व दुर्गम असल्याने येथे वाडीवस्तीवर दळणवळणाच्या अपुऱ्या सुविधा व जत तालुक्‍यात हॉस्पिटलच्या सुविधा अपुऱ्या असल्याने 108 रुग्णवाहिकांचा या जिल्ह्यात या दोन तुक्‍याला जास्त फायदा झाला आहे. वेळेत रुग्णवाहिका मिळून वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांचे प्राण वाचण्यास मदत मिळाली आहे. 

- डॉ. परशुराम हरणे, जिल्हा व्यवस्थापक, 108 रुग्णवहिका सेवा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 108 ambulance becomes the birthplace of 900 children