सांगलीत कोरोना उपचाराच्या ऑडिटसाठी 22 समित्या : डॉ. संजय साळुंखे

अजित झळके
Saturday, 26 September 2020

सांगलीत कोरोना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांचे काटेकोर परीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रात 12 आणि जिल्ह्यासाठी 10, अशा एकूण 22 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

सांगली : कोरोना रुग्णांवर सुरू असलेल्या उपचारांचे काटेकोर परीक्षण केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका क्षेत्रात 12 आणि जिल्ह्यासाठी 10, अशा एकूण 22 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. मृत्यू दरावर नियंत्रण आणण्यासाठी संपूर्ण व्यवस्थेचे काटेकोर ऑडिट केले जाईल, अशी माहिती कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. संजय साळुंखे यांनी दिली. 

पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्यातील मृत्यूचा वाढता दर लक्षात घेता तशी सूचना केली होती. रुग्णालयात दाखल झालेला रुग्ण दगावता कामा नये, अशी जाहीर सूचना जयंतरावांनी केली होती. त्याचवेळी डॉक्‍टरांच्या कामाच्या पद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली. त्या पार्श्‍वभूमीवर ही समिती गठीत करण्यात आली आहे. 

डॉ. साळुंखे म्हणाले, ""भारतीय आयुर्विज्ञान अनुसंसाधन परिषद (आयसीएमआर), केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार सुरू आहेत का, हे सर्वात आधी पाहिले जाईल. कोरोना रुग्णालयाने नेमलेले किंवा जाहीर केलेले तज्ज्ञ डॉक्‍टरच तेथे उपचारासाठी उपलब्ध आहेत का, याची तपासणी होईल. ते स्वतः रुग्णांना किती वेळा तपासतात, त्यांच्या चाचण्या घेतात, त्यांना औषधांच्या सूचना करतात, याबाबत काटेकोर तपासणी होईल. सेवा-सुश्रूषा व्यवस्था तपासली जाईल. महापालिका क्षेत्रातील एका समितीत दोन तज्ज्ञ डॉक्‍टरांचा समावेश असेल. अशा 24 डॉक्‍टरांच्या 12 समित्या काम करतील. ग्रामीण भागातील एका समितीत तीन डॉक्‍टरांचा समावेश असेल. अशा दहा समित्या तेथे काम करतील.'' 

दरम्यान, कोरोना उपचारात सध्या महत्त्वाची ठरणारी रेमडेसिव्हिर लस उपलब्ध करण्यात येत असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले. या लसीचा सरकारी रुग्णालयात तुटवडा नाही, मात्र पुरेशा प्रमाणात त्या मिळाव्यात, यासाठी कंपनीला ऑर्डर दिली आहे. त्या लवकरच मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्याचे दरही आता कमी झाले आहेत. ही लस अगदी अडीच हजार रुपये दरात उपलब्ध होत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

रेमडेसिव्हिर लसीची किंमत 3292 रुपये निश्‍चित

आधी रेमडेसिव्हिर या लसीची किंमत 3292 रुपये निश्‍चित करण्यात आली होती. त्याला शासनाची मान्यता होती. पुन्हा एका कंपनीने सातशे रुपयांनी दर कमी केले. ती 2592 रुपयांपर्यंत आली आणि आता दुसऱ्या एका कंपनीने त्यातही 100 रुपये कमी केले आहेत. त्यामुळे लसीच्या खरेदी किमतीपेक्षा केवळ 10 टक्के जादा रक्कम आकारण्याचा अधिकार मेडिकल किंवा डॉक्‍टरांना आहे. त्यापेक्षा जास्त किंमत आकारली तर तक्रार करावी. रुग्णालयातच ऑडिट समित्या आहेत.

- डॉ. संजय साळुंखे, नोडल ऑफिसर 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 22 Committees for Audit of Sangli Corona Treatment: Dr. Sanjay Salunkhe