esakal | नेत्रदात्यांमुळे 22 जणांना मिळाली दृष्टी 
sakal

बोलून बातमी शोधा

नेत्रदात्यांमुळे 22 जणांना मिळाली दृष्टी 

नेत्र मागणी हजारोंच्या संख्येत असल्याने नेत्रदान चळवळ वाढणे जरुरीचे.

नेत्रदात्यांमुळे 22 जणांना मिळाली दृष्टी 

sakal_logo
By
प्रवीण जाधव

सातारा : नेत्रदानाचा संकल्प केलेल्यांमुळे गेल्या वर्षभरात 74 नेत्रगोल आरोग्य विभागाला उपलब्ध झाले. त्याच्या वापरातून 22 अंधांना हे सुंदर जग पाहण्यासाठी दृष्टी मिळाली. तरीही नेत्रगोलाची मागणी मोठ्या प्रमाणावर असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प करण्यासाठी पुढे येणे आवश्‍यक आहे. 
जगातील एकूण अंधांपैकी एक चतुर्थांश अंध देशात आहेत. त्यापैकी सुमारे 22 लाख जण हे डोळ्यात फुल पडल्याने अंध झालेले आहेत. त्यामध्ये दरवर्षी 25 ते 30 हजार जणांची वाढ होत आहे. या अंधांना पुन्हा दृष्टी देण्यासाठी नेत्रबुबुळ प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय आहे. त्यासाठी मरणोत्तर नेत्रदान हाच पर्याय आहे. अंध होणाऱ्यांचे प्रमाण पाहता नेत्रदानाचे प्रमाण वाढणे आवश्‍यक आहे. 
गेल्या काही वर्षांपासून आरोग्य विभाग नेत्रदानापासून जागृती करत आहे. त्यामुळे लोकांचा कल नेत्रदानाकडे वाढत आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात मरणोत्तर नेत्रदान केलेले 74 बुबुळ नेत्रपेढींना मिळाले. त्याची योग्य तपासणी करून 22 जणांवर यशस्वी नेत्रबुबुळ रोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. त्यामुळे 22 जणांना पुन्हा दृष्टी मिळाली. परंतु, हजारोंच्या संख्येत असलेली मागणी विचारात घेता आणखी मोठ्या प्रमाणावर नेत्रदान चळवळ वाढणे आवश्‍यक आहे. 
लहान मुलापासून ते अतिवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही नेत्रदानाचा संकल्प करू शकते. डोळ्यांना चष्मा असणे, शस्त्रक्रिया झालेली असली, डोळा तिरळा असला तरीही नेत्रदानाचा संकल्प करता येवू शकतो. त्याचबरोबर रक्तदाब, हृदयरोग, संधिवात यासारखे विकार असलेल्या व्यक्तीही हा संकल्प करू शकतात. 

तातडीने नेत्रपेढीशी करावा संपर्क 
जिल्ह्यातील अनेकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. परंतु, अशा व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाईकांची जबाबदारी असते. मृत्यूनंतर चार ते सहा तासांच्या आतच नेत्रदान करावे लागते. त्यामुळे नेत्रपेढीशी संपर्क साधत नातेवाईकांनी मृत्यूची वेळ, घरचा पत्ता सांगणे आवश्‍यक आहे. मृत व्यक्तीचे डोळे बंद करून त्यावर कपड्याच्या पट्टया ठेवाव्यात. खोलीतील पंखे बंद करावे तसेच मृत व्यक्तीच्या डोक्‍याखाली उशी ठेवावी. त्यामुळे बुबुळ चांगले राहण्यास मदत होते. दोन चांगल्या बुबुळामुळे दोन व्यक्तींना दृष्टी मिळण्यास मदत होते. त्यासाठी नातेवाईकांनी जवळच्या नेत्रपेढीशी तातडीने संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालयातील नेत्ररोगतज्ज्ञ व जिल्हा अधंत्व नियंत्रण सोसायटीचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. चंद्रकांत काटकर यांनी केले आहे. 

loading image
go to top