सांगलीतून झाली इतके टन झाली द्राक्ष निर्यात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

गेल्या वर्षीचा दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पावसाच्या संकटावर मात करत यंदा जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी द्राक्षाचे चांगले उत्पादन घेतले.

सांगली : गेल्या वर्षीचा दुष्काळ, महापूर आणि अवकाळी पावसाच्या संकटावर मात करत यंदा जिल्ह्याच्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी द्राक्षाचे चांगले उत्पादन घेतले. यंदाच्या हंगामात गेल्या महिनाभरात जिल्ह्यातून 179 कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली. युरोपात सर्वाधिक 151 टन, तर इतर देशांत 157 टन अशी दोन हजार 320 टन द्राक्षाची निर्यात झाली.

जिल्ह्यात उसाबरोबर गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष, डाळिंब पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. द्राक्ष, डाळिंबाच्या निर्यातीतून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आता ऊसापेक्षाही द्राक्षाची गोडी शेतकऱ्यांसाठी वाढली आहे. यंदाच्या हंगामात सुरुवातीला दुष्काळ पडला. या दुष्काळात खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, मिरज परिसरात अक्षरशः टॅंकरने पाणी देऊन बागा जगवल्या. त्यानंतर ऐन फुलकळी अवस्थेत अवकाळी पाऊस आला.

ऑगस्ट महिन्यात दुष्काळी भागात अतिवृष्टी होऊन पावसाने द्राक्ष बागांना तडाखा दिला. अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. अशा तिहेरी संकटाच्या दाढेतून काही शेतकऱ्यांनी द्राक्षे बागा वाचवल्या. त्यातही पुन्हा निर्यातक्षम गुणवत्ता टिकवणे अवघड असताना ते शिवधनुष्यही शेतकऱ्यांनी लिलया पेलले. यंदाच्या हंगामात निर्यातक्षम द्राक्षांना खूपच महत्त्व आहे. 

गतवर्षी, सन 2019 च्या हंगामात जिल्ह्यातून 7 हजार 484 टन द्राक्षांची युरोप तर इतर देशांत 6 हजार 590 टन निर्यात झाली. यंदा एका महिन्यात 2 हजार 326 टन निर्यात झाली. यापुढील काळातही उत्पादन कमी असल्यामुळे द्राक्षांना चांगला भाव आणि मागणी असेल, अशी अपेक्षा आहे. 

या देशांत होतेय निर्यात 

लिथुनिया, नेदरलॅंड, नॉर्वे, युनायटेड किंगडम, लेक्‍सींबर्ग, जर्मनी, चेक, डेंमार्क, फिन्लॅड, इटली, लॅथवा, आर्यलॅंड, स्पेन, ऑर्स्टेलिया, बेलजियम, स्वर्त्झलॅंड, बॅरेन, कॅनडा, चीन, हॉंगकॉंग, कुवेत, मलेशिया, ओमान, कतार, रोमानिया, रशिया, सौदी आरेबिया, श्रीलंका, तैवान, थायलंड, युक्रेन, युएई 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 2250 tons of grapes exported from Sangli