२४ दिवसांत रोखले २४ बालविवाह

जिल्ह्यातील आकडेवारी; बालविवाह नियंत्रण पथकाची कारवाई, वर्षभरात झाले १२४ बालविवाह
Child marriage
Child marriagesakal

बेळगाव : जिल्ह्यातील बालविवाह सध्या चिंतेचा विषय बनला आहे. खासकरुन कोरोना, लॉकडाउन उठविल्यानंतर बालविवाहाचा प्रकार वाढीस लागल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केवळ एप्रिल महिन्यांत (२४ एप्रिलपर्यंत) तब्बल २४ बालविवाह महिला आणि बालकल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांनी रोखले आहेत. त्यावरुन जिल्ह्यात बालविवाहाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे आधोरेखित होते. दरम्यान, चालू आर्थिक वर्षात १२४ बालविवाह झाल्याची नोंद आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव घटल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन महिन्यांपासून मोठ्या संख्येने विवाह सोहळे आयोजित केले जात आहेत. सामूहिक विवाह आणि सप्तपदी विवाहाचेही आयोजन केले जात आहेत. यात्रा, महोत्सव व कार्यक्रमाचे औचित्यसाधत सामूहिक विवाह सोहळे होत आहेत. यादरम्यान बालविवाह उरकण्याचा घाट उधळून लावला आहे. १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी मुलीचे लग्न उरकण्याचा प्रयत्न थांबविला आहे. महिला व बालकल्याण खात्याने गावस्तरावर जागृती समिती स्थापली असून सामाजिक सेवाभावी संस्थांतर्फे कार्यशाळा घेण्यात येत आहेत.

त्यामुळे बालविवाह होणार असल्याची माहिती मिळू लागली आहे. मात्र, याची व्याप्ती वाढविणे जरुरी आहे. सामूहिक विवाह सोहळ्यात बालविवाह होण्याची शक्यता गृहितधरून विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांची अगोदर माहिती घेतली जात आहे. या दरम्यान विवाह उरकण्याची तयारी करत असताना विवाह रोखण्यात येत आहे. त्यानुसार मागील १ ते २४ एप्रिल दरम्यान २४ बालविवाह रोखण्यास यश आले आहे. त्यात बैलहोंगल ३, गोकाक ३, मुडलगी ३, हुक्केरी ३, चिक्कोडी ३, सौंदत्ती ३, रायबाग २, आणि खानापूर, अथणी, रामदुर्ग व बेळगाव तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

बालविवाहाला सामान्यपणे अक्षरज्ञान नसणे, गरीबी आणि पालकांना मुलगी म्हणजे ओझे वाटणे आदी प्रमुख कारणे आहेत. त्यासाठी या स्वरुपाच्या विवाहाविरोधात १०९८ क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविता येऊ शकते. तसेच ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते किंवा संघटनांच्या प्रतिनिधींनी माहिती दिल्यास पथक पोलिसांच्या मदतीने कारवाई करते. दरम्यान, जिल्ह्यात २०२१-२२ दरम्यान १२४ बालविवाह झाले आहेत. यापैकी १६ बालविवाहांप्रकरणी महिला व बालकल्याण विभागाच्या बालविवाह विवाह नियंत्रण अधिकाऱ्यांनी वधू-वराविरोधात एफआयआर दाखल केली आहे.

अधिकाऱ्यांसमोर अडचणी काय?

पूर्वी विवाह सामान्यपणे मुलीच्या दारी व्हायचे. यामुळे गावात त्याची माहिती मिळायची. शिवाय या स्वरुपाचे विवाह छापा घालून रोखणे सोपे ठरायचे. मात्र, अलीकडे लांबच्या ठिकाणी किंवा परगावी विवाह आयोजिला जात आहे. काही लोक महाराष्ट्रातील देवस्थानात बालविवाह उरकत आहेत. त्यामुळे बालविवाह रोखण्यात अडचणी येत आहेत, अशी माहिती महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com