esakal | सांगली-पेठ रस्त्याने घेतले 24 बळी; पाच वर्षे ठरलाय घात रस्ता
sakal

बोलून बातमी शोधा

24 killed on Sangli-Peth road; The road has been paved for five years

सांगली ते पेठ रस्त्याने गेल्या पाच वर्षांत तब्बल 24 बळी घेतले आहेत. अत्यंत वाईट अशा या रस्त्यामुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे, तर शंभरहून अधिकजण गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत.

सांगली-पेठ रस्त्याने घेतले 24 बळी; पाच वर्षे ठरलाय घात रस्ता

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली ते पेठ रस्त्याने गेल्या पाच वर्षांत तब्बल 24 बळी घेतले आहेत. अत्यंत वाईट अशा या रस्त्यामुळे लोकांना जीव गमवावा लागला आहे, तर शंभरहून अधिकजण गंभीर आणि किरकोळ जखमी झाले आहेत. आता हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग झाला आहे. तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग होण्याची प्रक्रिया नाहक लांबली. काही भाग अजून बाकी आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा त्याच्याशी तसा संबंध राहिलेला नाही. अर्थात जेव्हा संबंध होता, तेव्हाही काही झाले नाहीच. 

सांगली ते पेठ रस्त्यावर आता खड्ड्यांत रस्ता शोधण्याची वेळ आली आहे आणि अपघात जीवघेणे ठरत असताना त्याची जबाबदारी घ्यायला कुणी तयार नाही. इस्लामपूर हे जिल्ह्यातील प्रमुख सत्ताकेंद्र आहे. या शहराशी रस्ता जोडला जातोय, तरीही तो प्रश्‍न सोडवण्यात नेत्यांना अपयश का येते आहे? राजकीय अनास्थेचे हे बळी आहेत. सांगली ते पेठ रस्त्याचे दुखणे जुने आहे. या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्यांनी जीव मुठीत घेऊनच जायचे.

जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील नियमित या रस्त्याने येतात-जातात. या आधी भाजप-शिवसेना युतीच्या सत्तेत सदाभाऊ खोत मंत्री होते. तरीही या काळात आणि त्या आधीही या रस्त्याचे दुखणे काही संपले नाही. युती शासनाच्या काळात रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू झाली. ती आता कुठे अंतिम टप्प्यात आली; पण या काळात फक्त आणि फक्त रस्त्याची अवस्था वाईट असल्याने लोकांना जीव गमवावा लागला. वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, शेकडो लोक जायबंदी झाले. 

सहा कोटी पाण्यात 
हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असताना आमदार सुधीर गाडगीळ यांनी प्रयत्न करून तत्कालिन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून सहा कोटींहून अधिक निधी मंजूर करून आणला. कोल्हापूर येथील ठेकेदार कंपनीने दुरुस्तीचे काम घेतले. ते सहा कोटी रुपये पाण्यातच गेल्याची संतप्त भावना गाडगीळ यांनी सातत्याने बोलून दाखवली. कारण त्या निधीतून काम वेळेत झाले नाहीच, शिवाय अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले. महापुरात रस्ता खराब झाल्याने दुरुस्तीसाठी साडेतीन कोटी आले. त्याची अवस्था तशीच. प्रत्येक ठेकेदाराने दहा ते 20 टक्के कमी दराने ठेका घ्यायचा, निकृष्ट काम करायचे, पाने पुसायची एवढाच धंदा केला. आता इस्लामपूर ते आष्टा दुरुस्तीसाठी 17 कोटी मंजूर आहेत. तो ठेका 20 टक्के कमीने घेतला आहे. त्याची अवस्था काय होणार, हे वेगळे सांगायला नको. 

तरीही जाग नाही आली... 
सांगली-पेठ रस्त्यासाठी इस्लामपूर शहर परिसरातील मातब्बर नागरिकांनी एक कृती समितीची स्थापना केली. त्यावर बैठका घेतल्या, निवेदने दिली, इशारे दिले. 2017 साली दुःखाची दिवाळी या रस्त्यावर केली. खड्ड्यांत दिवे लावले, त्याभोवती रांगोळ्या काढल्या. प्रत्येक वेळी फक्त आदेश निघाले. त्याची फाईलच या समितीकडे आहे; मात्र काम काही झाले नाही. 

राष्ट्रीय महामार्ग झाला; पण... 
सांगली-पेठ हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. त्यावेळी या रस्त्यासाठी निधी मिळाला; मात्र रस्ता केला की, सहा महिन्यांत त्यांची वाट लागलीच. हे चक्र काही थांबले नाही. अखेर हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे. पेठ नाका ते तुंग हस्तांतरण झाले आहे. बाकी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तो आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166-एच झाला आहे. तो रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात येणार आहे. त्याचा आराखडा करून प्रत्यक्ष काम सुरू व्हायला किती वर्षे लागतील, याचा अंदाज नाही. 

गुन्हा दाखल करा 
खड्ड्यांमुळे अपघात झाला तर त्याचा दोषी कोण? सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार देत येथील नागरिक विकास मंचने या अपघातांना आणि मृत्यूला खड्डा जबाबदार असल्याचा गुन्हा दाखल करताना उल्लेख करावा, अशी मोहीम हाती घेतली आहे. तसे झाल्यास अपघातग्रस्त कुटुंबाला किमान भरपाई मिळेल आणि खड्ड्यांचे प्रकरण न्यायालयापर्यंत चर्चेला येईल, अशी अपेक्षा आहे. 

अलीकडचे अपघात 

  • 17 मे 2019 ः तुंगमध्ये दुभाजकाला धडकून कंटेनर पलटला. एक गंभीर जखमी. 
  • 27 मे 2019 ः तुंगमध्ये दुभाजकाला धडकून ट्रक उलटला. एक गंभीर जखमी. 
  • 11 एप्रिल 2019 ः इस्लामपुरात सायकलला टेम्पो धडकला. एक गंभीर. 
  • 10 मे 2020 ः कसबे डिग्रजमध्ये आयशर-रुग्णवाहिका धडक. एकाचा मृत्यू. 
  • 25 नोव्हेंबर 2020 ः मिरजवाडीजवळ ट्रॅकच्या धडकेत दोघांचा मृत्यू 
  • 27 नोव्हेंबर 2020 ः आष्ट्यात खड्डा चुकवताना एकाचा मृत्यू. 
  • 30 नोव्हेंबर 2020 ः तुंगजवळ चारचाकी-ट्रॅक्‍टर धडक. 

संपादन : युवराज यादव