मालवाहतुकीतून एसटीला 25 लाख उत्पन्न; या जिल्यातील कामगिरी

शामराव गावडे
Friday, 18 September 2020

एसटीच्या सांगली विभागाला मालवाहतूकीमधून तब्बल 25 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. विभागाने 540 फेऱ्यांद्वारे गेल्या तीन महिन्यात हे उत्पन्न मिळविले आहे. 

नवेखेड (जि. सांगली) : एसटीच्या सांगली विभागाला मालवाहतूकीमधून तब्बल 25 लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. विभागाने 540 फेऱ्यांद्वारे गेल्या तीन महिन्यात हे उत्पन्न मिळविले आहे. 

23 मार्च पासूनपासून जिल्ह्यात कोरोनामुळे प्रवासी वाहतूक बंद झाली. त्यामुळे एसटी चे उत्पन्न थांबले. मागील दोन महिन्यात काही मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू आहे. त्याला तशी प्रवासी गर्दी कमी आहे. महामंडळाने इतर बाबीमधूनउत्पन्न मिळावे यासाठी मालवाहतूक गाड्यांची सोय केली. कंडिशनमधील गाड्यांची बाकडी काढून त्या मालवाहतूक बस गाड्या बनविल्या. या वाहतुकीचे प्रतिटन दर मर्यादित ठेवल्याने मोठ्या प्रमाणात या वाहतुकीसाठी प्रतिसाद मिळाला. 

या गाड्यांचा मालवाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणात केला. सांगली विभागाने अकोला, परभणी, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, मुंबई, पुणे या विभागांमध्ये 20 मालवाहतूक बस गाड्यांमधू 540 फेऱ्या करीत जवळपास 25 लाखांचे उत्पन्न मिळवले. लांब पल्ल्याची मालवाहतूक असेल तर त्याठिकाणी दोन चालकांची सोय करून कामगिरी निभावली. पहिल्यांदा सुरू केलेल्या एसटी बस मालवाहतूकिला व्यापारी दुकानदार यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीनंतर तर जनजीवन सुरळीत होईल त्यावेळी आणखी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल. मालवाहतूक गाड्यांवर कामगिरी करणाऱ्या चालकांना जेवण भत्ता मिळावा, अशी त्यांची मागणी आहे. 

व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

एसटी महामंडळाने सुरू केलेल्या मालवाहतूक केला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. इच्छित स्थळी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा माल सुरक्षितपणे आम्ही पोच केला. 
- विक्रम हांडे, वाहतूक अधीक्षक, सांगली 

मालवाहतूक बसचा फायदा

एसटी महामंडळाच्या मालवाहतूक बसचा आम्हाला चांगला फायदा झाला. आमची खते शेतकऱ्यांच्या बांधा पर्यंत पोहोचू शकली. 
- सतीश पाटील, अशोका ऍग्रो, पोखर्णी. 

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 25 lakh revenue to ST from goods transport; Performance in Sangali district