esakal | शैक्षणिक जिल्ह्यातील 3 लाख विद्यार्थी परीक्षेविना पास

बोलून बातमी शोधा

शैक्षणिक जिल्ह्यातील  तब्बल 3 लाख  विद्यार्थी परीक्षेविना पास
शैक्षणिक जिल्ह्यातील तब्बल 3 लाख विद्यार्थी परीक्षेविना पास
sakal_logo
By
मिलिंद देसाई

बेळगाव : सलग दुसऱ्या वर्षी पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्याची वेळ शिक्षण खात्यावर आली आहे. त्यानुसार बेळगाव शिक्षण जिल्ह्यातील तीन लाख 51 हजार विद्यार्थी परीक्षा न देताच पास होणार आहेत. मात्र परीक्षा न घेता तपास करण्याच्या भूमिकेमुळे शिक्षणाचा दर्जा पूर्णपणे घसरण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

गेल्यावर्षी ऐन परीक्षेच्या वेळी देशात कोरोनाच्या संकटाने डोके वर काढले त्यामुळे परीक्षा काही दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र संकट लवकर कमी होण्याचे लक्षण दिसत नसल्याने काही दिवसात पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करण्याचा निर्णय घेण्यात आला तर दहावीच्या विद्यार्थ्यांची जून महिन्यात परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर जून महिन्यात शाळा पूर्ववत सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र वर्षभर कोरोनाचे संकट कमी न झाल्याने जून महिन्यात शैक्षणिक वर्षारंभ सुरू होऊ शकले नाही. त्यांनंतर जानेवारी महिन्यात 6 ते 10 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या परंतु शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसातच पुन्हा कोरोना वाढला. त्यामुळे मार्च महिन्यात 6 ते 9 च्या विद्यार्थ्यांची पुन्हा शाळा बंद करण्यात आली होती.

तर दहावीचे वर्ग सुरू ठेवण्यात आले होते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून 10 ते 12 वी पर्यंतच्या शाळाही बंद ठेवण्याचा निर्णय घेत नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक पास होऊन पुढील वर्गात जाणार आहेत. मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. असे मत शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी शिक्षण खात्याने परीक्षा न घेताच विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होण्याची भीती आहे

ए बी पुंडलिक, जिल्हा शिक्षणाधिकारी

Edited By- Archana Banage