esakal | महापुरामुळे सांगलीतील ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील उसाचे नुकसान
sakal

बोलून बातमी शोधा

महापुरामुळे सांगलीतील ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील उसाचे नुकसान

सांगली - महापुरामुळे जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्रापैकी ३० टक्क्यांहून अधिक हेक्‍टर क्षेत्रात ऊस पिकाला फटका बसला आहे. मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा या प्रमुख ऊसपट्ट्यातील ऊस पाण्याखाली गेला आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यांपुढे उसाचा प्रश्‍न असल्यामुळे गळीत हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान असेल. कमी साखर उताऱ्याचा प्रश्‍न निर्माण होईल.

महापुरामुळे सांगलीतील ३० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील उसाचे नुकसान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली - महापुरामुळे जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्रापैकी ३० टक्क्यांहून अधिक हेक्‍टर क्षेत्रात ऊस पिकाला फटका बसला आहे. मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा या प्रमुख ऊसपट्ट्यातील ऊस पाण्याखाली गेला आहे. शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. साखर कारखान्यांपुढे उसाचा प्रश्‍न असल्यामुळे गळीत हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान असेल. कमी साखर उताऱ्याचा प्रश्‍न निर्माण होईल. बॅंकांवरही याचा परिणाम होईल. महापुरामुळे ऊस उत्पादक शेतकरी, साखर कारखाने आणि बॅंकांना चांगलाच फटका बसला आहे.

२००५ मध्ये आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. ऊस उत्पादकांना त्याचा मोठा फटका बसला होता. २००५ पेक्षा यंदाचा महापूर महाभयानक असल्यामुळे मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा तालुक्‍यात नदीकाठची शेती पाण्याखाली गेली. या चार तालुक्‍यांतील उसावर परिसरातील साखर कारखानदारी अधिक अवलंबून आहे.

तेथील नदीकाठचा ऊस पाला-शेंड्यासह पूर्ण बुडाला. त्यामुळे खराब झाला असून साखर कारखान्यांना गाळपासाठी नेता येणार नाही. जो ऊस कांड्यापर्यंत बुडाला आहे, तो माती चिकटल्यामुळे खराब होण्याच्या मार्गावर आहे. त्याला कोंब फुटल्यामुळे नुकसान होईल व कमी उतारा मिळेल. खोडवा पीकाची उंची कमी असल्यामुळे त्याचेही नुकसान जास्त आहे. ज्या भागात ओल हटली नसेल तिथे मूळ कुजण्याचा धोका अधिक आहे. मळीकाठच्या ऊसाचा दर्जा चांगला असतो, परंतू पुराच्या पाण्यानंतरही तो गाळपास नेण्यायोग्य राहिला तरी नुकसान ठरलेलेच आहे. 

सांगली जिल्ह्यातील ऊस लागवड क्षेत्र ९५ हजार हेक्‍टर आहे. त्यापैकी महापुराचा फटका बसलेल्या मिरज, वाळवा, पलूस आणि शिराळा तालुक्‍यात ते सर्वाधिक आहे. प्राथमिक अंदाजानुसार ३० टक्केहून अधिक हेक्‍टरवरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. पंचनाम्यानंतर नुकसानग्रस्त क्षेत्र स्पष्ट होईल. कारखान्यांचा हंगाम सुरू होण्यास अद्याप दोन महिने बाकी आहे. त्यामुळे महापुरातून शिल्लक राहिलेला ऊस गाळपास सर्व प्रथम नेण्याचे संकट शेतकऱ्यांसमोर आहे. कारखान्यांपुढे हंगाम पूर्ण करण्यासाठी ऊसाचा प्रश्‍न असेल. तसेच कारखान्यांना कर्जपुरवठा करणाऱ्या बॅंकांसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

साखर कारखान्यांचे ऊस तोडणी-वाहतूक करार पूर्ण झाले आहेत. अद्याप हंगाम सुरू होण्यास दोन महिने बाकी आहेत; परंतु महापुरातून वाचलेला ऊस लवकर गाळपास नेणे आवश्‍यक आहे. तरच संभाव्य नुकसान टाळले जाईल. त्यामुळे कारखाने यंदा लवकर सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा.
- संजय कोले
(शेतकरी संघटना)

कोट्यवधी रुपयांचे नुकसान
गतवर्षीच्या हंगामात ८२ लाख २७ हजार टन उसाचे गाळप करण्यात आले होते. तर एक कोटी क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. यंदा ३० टक्केहून अधिक ऊस लागवड क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामुळे साखर उत्पादनाचा नीचांक गाठला जाईल. त्यामुळे शेतकरी, साखर कारखाने यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल.

कारखाने, बॅंका तरतील असा अंदाज
साखर कारखान्याकडे गतहंगामातील शिल्लक साखर मोठ्या प्रमाणात आहे. यंदा महापुराचा फटका बसून साखर उत्पादन कमी झाले तरी शिल्लक साखरेला चांगला भाव मिळेल. तसेच बॅंकांनाही सरकारकडून मदत मिळेल. त्यामुळे कारखाने आणि बॅंका थोड्या फार नुकसानीतून तरतील असा अंदाज आहे. अंतिम नुकसानीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

loading image
go to top