मुसळधार पावसाने कडेगाव तालुक्‍यातील 30 मार्ग बंद

संतोष कणसे 
Friday, 16 October 2020

कडेगाव : तालुक्‍याला काल बुधवारी (ता.14) कोसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे तालुक्‍यातील येरळा, नांदनी नद्यासह तालुक्‍यातील सर्व ओढ्यांना पूर आला.

कडेगाव : तालुक्‍याला काल बुधवारी (ता.14) कोसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे तालुक्‍यातील येरळा, नांदनी नद्यासह तालुक्‍यातील सर्व ओढ्यांना पूर आला. तर कडेगाव शहरानजीक गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील हंगामी पूल कोतमाई ओढ्याला पूर आल्याने वाहून गेला. 

त्यामुळे गुहागर-विजापुर महामार्ग बंद करण्यात आला. यासह पुराचे पाणी आल्याने तालुक्‍यातील एकूण 30 मार्ग बंद करण्यात आले असून शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, कडेगाव तलाव भरून वाहू लागल्याने कोतमाई ओढ्याला पूर आला असून शहरात पुराचे पाणी शिरले आहे. तसेच येथील दत्त मंदिर, महादेव मंदिर व बालोद्यानात पाणी शिरले. 

चिंचणी तलावही ओसंडून वाहत असल्याने येथील सोनहीरा ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तालुक्‍यातील कडेगाव, शिवाजीनगर, चिंचणी, कोतिज, करांडेवाडी, हिंगणगाव बुद्रुक, शाळगाव आदी लघुपाटबंधारे तलाव भरून वाहू लागले आहेत. पुलावर पाणी आलेल्या ठिकाणी तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाइंगडे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी, संदीप साळुंखे यांनी भेट देऊन या मार्गावरील वाहतुक बंद केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक आज दिवसभर ठप्प होती. दरम्यान, आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तर पावसाच्या उघडीपीनंतरही सायंकाळपर्यंत तालुक्‍यातील पूरस्थिती "जैसे थे' होती.

संपादन : प्रफुल्ल सुतार 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 30 roads in Kadegaon taluka closed due to torrential rains