esakal | कुडचीत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई; 30 दुचाकी जप्त

बोलून बातमी शोधा

कुडचीत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई; 30 दुचाकी जप्त
कुडचीत विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई; 30 दुचाकी जप्त
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रायबाग : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यानुसार सकाळी १० नंतर घराबाहेर पडण्यावर निर्बंध आहेत. मात्र कुडची (ता. रायबाग) येथे विनाकारण रस्त्यावरून फिरणाऱ्यांवर कारवाई करून ३० वाहने जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून दंड आकारणी करूच लॉकडाऊन संपल्यावरच संबंधितांना वाहने परत करण्यात येणार आहेत.

कुडची येथे गतवर्षी कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाल्याने अद्याप आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. आता कोरोनाची दुसरी लाट असल्याने शासनाने विविध नियम लागू केले आहेत. त्यांची अमंलबजावणी प्रशासन, आरोग्य आणि पोलिस खात्यामार्फत सुरू आहे. आता पुन्हा लॉकडाऊन सुरू असल्याने निर्बंध आले आहेत. पण काही नागरिक विनाकारण दुचाकीवरून रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव वाढण्याची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून कुडची पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार तीस दुचाकीस्वारांवर कारवाई केली आहे.

हेही वाचा: लॉकडाउनमध्ये शोधली बाजारपेठ; कडू कारल्याने शेतक-याचे आयुष्य झाले गोड

संबधितांची वाहने जप्त केली असून लॉकडाऊन नंतरच ती परत मिळणार आहेत. शिवाय त्यांना दंडही भरावा लागणार आहे. या कारवाईची माहिती मिळताच विनाकारण फिरणाऱ्यांनी धास्ती घेतली आहे. शिवाय त्यांचे प्रमाणही रस्त्यावर कमी झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठीच शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे नियमांचे पालन करून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलिस उपनिरीक्षक शिवराज दरीगौड यांनी केले आहे.

कुडची येथील बाजार रद्द

कुडची येथील शुक्रवारचा आठवडी बाजार रद्द करण्यात आला आहे. मात्र शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सकाळी १० पर्यंत दुकाने सुरू होती. त्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवा देण्यात येत आहे. लॉकडाउनमुळे शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसत होता.