सांगली जिल्ह्यात तेरा दिवसांत 300 जणांना कोरोना 

अजित झळके
Tuesday, 14 July 2020

जिल्ह्यात 30 जून रोजी एकूण कोरोना बाधितांची संख्या 384 इतकी होती. ती 13 जुलैच्या रात्री 681 इतकी झाली. तब्बल 297 रुग्णांची भर पडली आणि मध्यरात्री आणखी रुग्णांची संख्या वाढून हा आखडा 300 पार गेला आहे.

सांगली ः पावसाळा सुरु झाला, मुंबई-पुण्यातून येणाऱ्यांची संख्या वाढली, अनलॉक सुरु झाल्यानंतर बाजारपेठांत गर्दी वाढली आणि या साऱ्याचा थेट परिणाम म्हणून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढली आहे. गेल्या 13 दिवसांत म्हणजे जुलै महिन्याच्या प्रारंभापासून तब्बल 300 नवे रुग्ण आढळून आले आहेत. सांगली, मिरज आणि कुपवाड या महापालिका क्षेत्रात 97 नवे रुग्ण सापडले आहेत. मुंबई, पुणे, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूरच्या तुलनेत हा वेग कमी आहे, मात्र जिल्ह्याच्या उरात धडकी भरवणाराच आहे. 

जिल्ह्यात 30 जून रोजी एकूण कोरोना बाधितांची संख्या 384 इतकी होती. ती 13 जुलैच्या रात्री 681 इतकी झाली. तब्बल 297 रुग्णांची भर पडली आणि मध्यरात्री आणखी रुग्णांची संख्या वाढून हा आखडा 300 पार गेला आहे. त्यात आटपाडी तालुक्‍यातील 59, जत तालुक्‍यातील 94, कडेगाव तालुक्‍यातील 31, कवठेमहांकाळ तालुक्‍यात 22, खानापुरातील 27, मिरज तालुक्‍यातील 42, पलूसमधील 55, शिराळा 139, तासगाव 25, वाळवा 69 तर महापालिका क्षेत्रात तब्बल 118 रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. शिराळा तालुक्‍यातील मणदूर हे पहिले मोठे हॉटस्पॉट म्हणून चर्चेत आले आणि त्यानंतर जत तालुक्‍यातील बिळूर या गावात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. पाठोपाठ पलूस तालुक्‍यातली दुधोंडी येथील रुग्णसंख्येत मोठी भर पडली. जिल्ह्यात कोरोना बळींची संख्या 19 आहे. ती 30 जून रोजी 12 होती. 13 दिवसांत सातजणांचा मृत्यू झाला. हे सर्व 50 वर्षाहून अधिक वयाचे रुग्ण आहेत. 

या स्थितीत पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करावा लागेल, असा सूचक इशारा दिला आहे. जिल्ह्यात कोरोना वाढण्यामागे मुंबई कनेक्‍शन मोठे आहे. काही ठिकाणी जेवनावळींनी घात केला आहे. बाजारपेठेत शिस्त दुरापास्त झाली आहे. येथे मास्क, सॅनिटायझरचा वापर करताना लोक दिसत नाहीत. त्याबाबत सक्तीचे धोरण राबवण्याची आणि दंडात्मक कारवाईची वेळ पोलिसांवर आली. आता त्यातून धडा घेतला तर ठीक, अन्यथा अन्य शहरांप्रमाणे सांगलीत कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढण्याची भिती आहे. 

सरासरी 22 रुग्ण 

जिल्ह्यात पहिला रुग्ण सापडला 23 मार्च रोजी. त्यानंतर 99 दिवसांत 384 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती. या वेगाची सरासरी दररोज 4 रुग्ण इतकी होती. 30 जूननंतर तीच सरासरी दिवसाला 22 इतकी आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 300 corona possitive in 13 days in sangli district