येथे एकाच ठिकाणी आहेत ‘अमर, अकबर आणि अँथोनी’....

चेतन लक्केबैलकर
शनिवार, 27 जून 2020

सिद्दी हा एकच समाज असला तरी त्यांच्यातील कुणी देव पुजतो, कुणी अल्लाहकडे दुवा मागतो तर कुणी मदर मॅरी- जिजसला आळवितो.

 

खानापूर (बेळगाव) : दिसायला अगदीच दक्षिण अफ्रीकेचे नागरीक असल्यासारखे. कित्येक वर्षांपासून खानापूर तालुक्याच्या जंगलभागात वास्तव्य करून राहतात. सिद्दी हा एकच समाज असला तरी त्यांच्यातील कुणी देव पुजतो, कुणी अल्लाहकडे दुवा मागतो तर कुणी मदर मॅरी- जिजसला आळवितो.सहसा एका धर्मात अनेक पंथ असतात, सिद्दी समाज मात्र त्याला अपवाद असून हा समाज विविध धर्मांचे अचरण करतो. आता तर या समाजाला अनुसूचीत जमाती म्हणून मान्यता मिळाली आहे. 

काळा वर्ण, कुरळे केस, धष्टपूष्ट शरिरयष्टी यामुळे पाहताक्षणी दक्षिण अफ्रीकन नागरीकांसारखे वाटणारे सिद्दी लोक खानापूर तालुक्यासह कारवार आणि धारवाड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विखुरले आहेत. त्यांच्याबद्दल माहिती देतांना हल्याळ येथील बस्त्याव देव नाईक सांगतात, ‘सिद्दी लोक मुळचे कुठले याबाबत आधारभूत माहिती नाही. भारतावर इंग्रजांची सत्ता असतांनाच्या काळात त्यांनी अफ्रीकनांना गुलाम म्हणून भारतात आणले. त्यातील कांही कुटूंबे भारतातील समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रदेशात स्थिरावली असावीत. वर्णामुळे भारतीयांनी त्यांना न स्विकारल्यामुळे हे लोक शक्यतो जंगलभागात राहिले. आजही त्यांच्या वस्त्या जंगलातच आहेत’

हेही वाचा- सिंधुदुर्गातील धबधबे, निसर्ग तुम्हाला खुणावतील़ पण तेथे जाता येणार नाही.....काय आहे कारण वाचा
 

खानापूर तालुक्यात तावरकट्टी, गणेबैल, गोधोळी, करजगी, भुरूणकी, बाळगुंद, बस्तवाड या गावांत सुमारे 300 कुटूंबे आहेत. त्यांची संख्या अंदाजे आठशेच्या जवळपास असल्याची माहिती मेहबुबसाब कासीमसाब सिद्दी यांनी दिली. या समाजातील लोक हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन या धर्मांचे आचारण करतात.तरीही त्यांचे एकमेकांशी रोटीबेटी व्यवहार होतात. एकंदर, हा समाज खऱ्या अर्थाने निधर्मी आहे. सर्व धर्मांचे अचरण करीत असतांना त्यांची म्हणून एक वेगळी संस्कृतीदेखील या समाजाने जपली आहे. 

सिद्दी समाजाची कथा; खानापूर तालुक्यात 300 कुटुंबे

धार्मिक अचरणाबाबत सावेर सिद्दी म्हणाले, हा समाज रुढार्थाने अस्पृश म्हणून ओळखला गेला. साहजिकच हे लोक ज्यांच्या आश्रयाला गेले. तो धर्म त्यांनी स्विकारला. पण, त्यांनी त्यांची संस्कृती कायम ठेवली. आजही हा समाज अस्पृश जिवन जगत आहे. कांही वर्षांपूर्वी कारवार जिल्ह्यातील सिद्दी समाजाचा समावेश अनुसूचीत जमातीत झाला. कालांतराने धारवाडमधील समाजाही समाविष्ट झाला. महिनाभरापूर्वी खानापूर तालुक्यातील सिद्दीही अनुसूचीत जमातीत समाविष्ट झाले आहेत. आता तरी या समाजाला शासकीय सुविधा मिळतील आणि त्यांची उन्नती होईल, अशी आपेक्षा आहे. इतर समाजांनी या समाजाला सामवून घेण्याची गरज आहे. 

हेही वाचा- कोरोनाचा कहर : जिल्ह्यात एका रात्रीत वाढले 35 कोरोनाबाधित,  कुठे ते वाचा....

जंगलात राहिल्यामुळे सिद्दी समाजाचा ठरावीक असा व्यवसाय नाही. ते वेगवेगळ्या व्यवसायात आहेत. कुणाचीही हक्काची जमिन नाही. आर्थिक हतबलतेमुळे हा समाज शिक्षणापासून दूर राहिला आहे. समाजातील पहिले शिक्षित व्यक्ती कैतान कामरेकर यांनी सिद्दींचे संघटन केले.ख्रिश्चन धर्मगुरू फा.डिसील्वा यांच्या साथीने त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न केले. सध्या सिद्दींची अखिल कर्नाटक सिद्दी विकास संघटना कार्यरत असून त्याद्वारे समाजाच्या विकासाचे काम चालले आहे. 

हेही वाचा-असे होते राजर्षींचे झीरो पेंडन्सी प्रशासन...... - ​

स्वातंत्र्यानंतरही गुलामगिरी
अफ्रिकेतून गुलाम म्हणून आलेले सध्याचे सिद्दी लोक स्वातंत्र्यानंतरही गुलाम म्हणूनच वागवले गेले. अत्यंत अल्पसंख्य असलेल्या सिद्दींना सुरक्षेसाठी प्रस्तापितांच्या आश्रयाला राहावे लागले. त्यांना वाईट वागणूक दिली जात होती. अलिकडेपर्यंत हीन प्रथा पाळल्या जात होत्या. या वंचीत समाजाला आता सरकारचा वरदहस्त लाभला आहे. आतातरी त्यांची गुलामगिरी संपेल, अशी आशा त्यांना आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 300 sidhhi family story in khanapur belguam