म्हैसाळ योजनेतून दुष्काळी भागातील 32 तलाव फुल्ल 

विष्णू मोहिते
Friday, 11 September 2020

महापूराच्या काळात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन 17 ऑगस्टपासून सुरू झाल्यापासून दुष्काळी भागातील 32 तलाव भरुन घेण्यात आले आहेत.

सांगली : महापूराच्या काळात म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन 17 ऑगस्टपासून सुरू झाल्यापासून दुष्काळी भागातील 32 तलाव भरुन घेण्यात आले आहेत. त्यात मिरज तालुक्‍यातील 6, कवठेमहांकाळमधील 9 तर जतमधील 20 तलाव आहेत. या योजनेतून आत्तापर्यंत योजनेतून सुमारे 975.82 दशलक्ष घनफूट पाणी उचलले आहे. 

योजनेच्या लाभक्षेत्रातील जिल्ह्यातील मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, आणि सांगोला तालुक्‍यांतील शिवाराचा समावेश आहे. योजनेतून सध्या जत, सांगोला, मंगळवेढा तालुक्‍यात पाणी पोहोचले आहे. बेडग, आरग, खटाव, लिंगनूर, कदमवाडी, गुंडेवाडी, डोंगरवाडी, धुळगांव तलाव भरले आहेत. सध्या शिपूर, कळंबी तलावात योजनेचे पाणी सोडले आहे. तासगाव तालुक्‍यातील गव्हाण आणि विस्तारित गव्हाण या कालव्यातून चार तलाव भरून घेतले जाणार आहेत. सध्या योजनेचे पंप अग्रणी नदीतील वाहणाऱ्या पाण्यावर सुरू आहेत. 

गेली चोवीस दिवस योजना पूर्ण क्षमतेने सुरू आहे. या लाभ क्षेत्रातील जे तलाव भरून झाले नाहीत. ते तलाव भरून घेण्याचे नियोजन पाटबंधारे विभाग करु लागला आहे. म्हैसाळ योजना सुरु झाल्यानंतर सर्व दुष्काळी जत तालुक्‍यातील तलाव भरून घेण्यासाठी प्राधान्य दिले आहे. त्यानुसार 20 तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत आणि सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि सांगोला या तालुक्‍यातील उर्वरित तलाव पूर्ण क्षमतेने भरले जात नाहीत, तोपर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. 

दुष्काळी भागाला आधार 
पालकमंत्री जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागाचा पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यात झालेल्या सत्कार कार्यक्रमात दुष्काळी भागासाठी पाणी आणि या भागासाठी एखादी स्वतंत्र योजनेचा संकल्प केला होता. पावसाळ्यात कृष्णा नदीचा येणाऱ्या पुराच्या वेळी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. त्याच वेळी हे पाणी उचलून दुष्काळी भागातील तलाव भरुन घेण्याची मागणी गेली अनेक वर्षे होत होती. यंदा महापूराच्या भीती निर्माण झाली होती. त्याचवेळी पूर्व भागाला पाणी देण्याचा निर्णय घेतला. यामुळे या भागातील लोकांना दिलासा मिळाला आहे. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 32 lakes in drought prone areas full from Mhaisal scheme