
नैर्ऋत्य रेल्वेकडून ३२.६२ कोटी दंड वसूल
बेळगाव - रेल्वेला तिकीट दर कमी असूनही अनेक जण विनातिकीट प्रवास करतात. यातील काही जण आरामात रेल्वेस्टेशनच्या बाहेर पडतात. तर काही जण तिकीट तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला सापडतात. यासंबंधी प्रत्येक वर्षाची आकडेवारी नैर्ऋत्य रेल्वे जाहीर करते. २०२१-२२ या आर्थिक वर्षात नैर्ऋत्य रेल्वेने ३२.६२ कोटी रुपये दंडाची वसुली केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा दंड ३३७.२७ टक्के जास्त आहे.
नैर्ऋत्य रेल्वेच्या अंतर्गत हुबळी, बंगळूर व म्हैसूर विभाग येतो. प्रत्येक विभागात १०० हून अधिक रेल्वे स्टेशन आहेत. ज्यातील काही मुख्य स्टेशन असून हुबळी विभागात हुबळी, बेळगाव आदी प्रमुख स्टेशनचा समावेश आहे. स्थानकावर रेल्वे आल्यानंतर तिकीट तपासणी केली जाते. तिकीट तपासणी केल्यानंतर विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेने कोट्यवधीचा दंड वसूल केला आहे. बेळगाव रेल्वे स्थानकावरही नियमित तिकीट तपासणी केली जाते. गत आर्थिक वर्षी एकूण ५ लाख ६६ हजार जणांवर केस दाखल करण्यात आल्या आहेत. मागील वर्षापेक्षा हे प्रमाणही ३५२.८० टक्के जास्त आहे.
तिकीट तपासणी अधिकाऱ्याला प्लॅटफॉर्मबरोबर धावत्या रेल्वेमध्येही तपासणी करण्याचा अधिकार असतो. प्लटफॉर्मवर जाण्यापूर्वीच फ्लॅटफॉर्म तिकीट घेणे आवश्यक असते. मात्र, अनेक जण घाईगडबडीत ते तिकीट न घेताच जातात. यावेळी तिकीट तपासणी अधिकारी विचारणा करू शकतो. तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर रेल्वे प्रवेशद्वारावर ते अधिकारी थांबतात. अशांकडूनही ही दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली आहे.
Web Title: 3262 Crore Fine Collected From Southwestern Railway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..