esakal | बेळगाव : निपाणीत शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या ठरल्या उपेक्षित; अद्याप न्यायाची प्रतीक्षा

बोलून बातमी शोधा

40 years complete for pretest of nipani farmers of tobacco in belgaum

सनदशीर व लोकशाही मार्गाने झालेले ते आंदोलन बेछुटपणे कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री आर. गुंडूराव सरकारने चिरडले. 

बेळगाव : निपाणीत शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या ठरल्या उपेक्षित; अद्याप न्यायाची प्रतीक्षा
sakal_logo
By
अशोक परीट

निपाणी (बेळगाव) : तंबाखू उत्पादनाबाबत लौकिक असलेल्या निपाणीचे नाव ऐंशीच्या दशकात देशात चर्चिले गेले. त्याला कारण होते येथील महामार्ग रोखून झालेले पन्नास हजार तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचे चोवीस दिवसांचे अभूतपूर्व आंदोलन आणि त्यातील गोळीबारात हुतात्मा झालेले बारा आंदोलक शेतकरी. उत्पादन खर्चावर आधारित तंबाखूला रास्त दर मिळावा, यासाठी ते आंदोलन होते. सनदशीर व लोकशाही मार्गाने झालेले ते आंदोलन बेछुटपणे कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री आर. गुंडूराव सरकारने चिरडले. 

गोठवणाऱ्या थंडीत, अश्रूधूर, पाण्याच्या फवाऱ्याचा मारा सहन करत आज दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाची रक्तरंजित धग चाळीस वर्षांपूर्वीच्या निपाणीतील तंबाखू शेतकरी आंदोलनाला होती, हे मात्र निश्‍चित. चाळीस वर्षात तंबाखू उत्पादन, दर, शासकीय निर्बंध, आंदोलक नेते आदींनी अनेक वळणे घेतली. मात्र तंबाखू दराबाबत योग्य भावाचे स्वप्न उद्‌ध्वस्त होऊन येथील शेतकऱ्यांच्या तीन पिढ्या उपेक्षित ठरल्या आहेत. आता काळानुरूप तिसऱ्या पिढीतील शेतकरीच पर्यायी पिकाकडे वळल्याने त्यांनी तंबाखूलाच उपेक्षित ठरवले आहे. उत्पादनात कमालीची घट झाल्याने तंबाखू मिळवण्यासाठी व्यापाऱ्याला यातायात करावी लागत आहे. 

हेही वाचा - पोलिस भरतीची वाट पाहणारी तरुणाई रोजंदारीकडे; शासनाच्या धोरणामुळे नैराश्‍येत वाढ

तंबाखूचे एकमेव उत्पादन घेणारा शेतकरी व्यापाऱ्यांच्या जाचक अटीत अडकून हवालदील झाला होता. त्यातून न्यायासाठी तो संघटित झाला. प्रा. सुभाष जोशी, दत्ता पांगम, गोपीनाथ धारिया, एस. टी. चौगुले, साताप्पा शेटके, आय. एन. बेग, जकाप्पा जाधव आदींनी जागृती निर्माण करत शेतकऱ्यांना संघटित केले. प्रा. सुभाष जोशी यांनी त्यावेळी तंबाखू उत्पादक आणि कामगार महिलांना लढण्याचे मोठे बळ दिले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली 14 मार्च ते 6 एप्रिल 1981 अखेर निपाणी बाहेरचा पुणे-बंगळूर महामार्ग रोखून आंदोलन झाले. मुख्यमंत्री गुंडूराव यांनी वाटाघाटीचे फसवे नाटक करत सहा एप्रिलला आंदोलन चिरडले. प्रथम शरद जोशींसह जबाबदार कार्यकर्त्यांना अटक केली. नंतर आंदोलक शेतकऱ्यांवर लाठीमार व गोळीबार झाला. त्यात बारा जण हुतात्मा झाले, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. 

दोनशे कोटींची आर्थिक उलाढाल 

चाळीस वर्षानंतर आभासी वाढ असली तरी उत्पादन खर्चावर आधारित तंबाखूला योग्य भाव मिळत नाही. मात्र त्याच्या खास वैशिष्ट्यामुळे तो देशभरातील विडी उद्योगाला पुरविला जातो. दोनशे कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल घडविणाऱ्या तंबाखू उत्पादकांची तिसरी पिढीही दराबाबत उपेक्षितच आहे. व्यापाऱ्यांच्या हातात एकवटलेल्या व्यवहारामुळे अडवणूक होणाऱ्या तंबाखू उत्पादकाला नेहमीच तापदायक अनुभव येतात. परिणामी साठ हजार हेक्‍टरपैकी आता जेमतेम दहा हजार हेक्‍टर क्षेत्रातच तंबाखू उत्पादन शिल्लक आहे. तंबाखूची जागा आता ऊस, सोयाबीन, भुईमूग, केळी, शाळू, भाजीपाला, फूल, फळे, दूग्ध उत्पादनाने घेतली आहे.