esakal | पोलिस भरतीची वाट पाहणारी तरुणाई रोजंदारीकडे; शासनाच्या धोरणामुळे नैराश्‍येत वाढ

बोलून बातमी शोधा

preparation of army and police requirement youth working in market sangli

राज्य शासनाने तरुणाच्या मनाचा विचार करून भरतीची तारीख जाहीर करावी, अशी मागणी पोलिस भरती करणाऱ्या युवकांनी केली आहे. 

पोलिस भरतीची वाट पाहणारी तरुणाई रोजंदारीकडे; शासनाच्या धोरणामुळे नैराश्‍येत वाढ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कुरळप (सांगली) : राज्यात पोलिस भरतीची डोळ्यात तेल घालून वाट पाहणारे तरुण शासनाच्या तारीख पे तारीख धोरणामुळे पोटाचा खळगा भरण्यासाठी रोजंदारीकडे वळत आहेत. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ भरती न झाल्याने तरुणांच्यात नैराश्‍य वाढत आहे. कुटुंब जगवायचे की पोराला शिकवायचे या कात्रीत पालकांची मात्र फरपट होत आहे. राज्य शासनाने तरुणाच्या मनाचा विचार करून भरतीची तारीख जाहीर करावी, अशी मागणी पोलिस भरती करणाऱ्या युवकांनी केली आहे. 

लाखो तरुण मैदानीसह, लेखी परीक्षेची तयारी अनेक दिवसांपासून करत आहेत. आज ना उद्या भरती होईल या विचारांत रात्रीचा दिवस करून कष्ट करत आहेत. ग्रामीण भागात पोलिस भरतीकडे युवकांचा कल वाढला आहे. यातच स्पर्धा वाढल्याने तयारीही जोमाने करण्याशिवाय पर्याय नाही. रखडलेल्या भरतीमुळे तयारीत सातत्य ठेवणे जिकिरीचे बनत आहे. बहुतांश तरुणांनी 2019 मध्ये फॉर्म भरले आहेत. तेव्हापासूनच पायाला भिंगरी बांधून मैदानी चाचणीची तयारी करत आहेत. आता फॉर्म भरून दोन ते अडीच वर्षे होत आली तरीही भरतीच्या बाबतीत शासनाची भूमिका गुलदस्त्यात राहिल्याने दोन ते अडीच वर्षांची तयारी पाण्यात जात्या की काय असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

हेही वाचा - सांगली : शिराळात गोठ्यास आग; 5 जनावरांचा होरपळून मृत्यू

बहुतांश विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे. यातच नवीन परीक्षा देणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. यातच परीक्षा नेमकी कधी होणार, मग पहिल्यांदा लेखी होणार का शारीरिक चाचणी, आरक्षणचे काय होणार, किती जागांसाठी होईल, ऑनलाईन होणार की ऑफलाईन, पारदर्शक होणार का आदी प्रश्नांनी विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्या विद्यार्थ्यांनी तयारीसाठी खासगी शिकवणी, मार्गदर्शन घेतले मात्र वारंवार त्यावरच खर्च करून घरचे थकले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून राज्य शासन भरतीची प्रक्रिया सुरू आहे; पंधरा दिवसांत परीक्षा होईल असे सांगत आहे. मात्र काहीच न होता संभ्रम निर्माण झाला आहे. 

"दररोज काम केल्याशिवाय घर चालत नाही. पोलिस भरतीचा फॉर्म भरून दोन वर्षे झाली. सहा महिने संपूर्ण वेळ पोलिस भरतीच्या तयारीसाठी दिला. मी स्वतः राबलो नाही यामुळे कुटुंबीयांच्या वरती देणेकरांचा बोजा वाढला आहे. यामुळे रोजगार केल्याशिवाय पर्याय नाही." 

- शिवराज फाळके, कुरळप

हेही वाचा - सलग दुसऱ्या वर्षी जोतिबा चैत्र यात्रा रद्द; व्यापारी, दुकानदारांना आर्थिक फटका

"सध्या कोरोना काळात ज्या यंत्रणेवर जास्त ताण आहे त्या पोलिस विभागाचीच भरती रेंगाळली आहे. भरतीची वेळ पुढे जाईल तसे या भरतीवर अवलंबून असणाऱ्या विद्यार्थ्यांचे वयही वाढत आहे. यामुळे त्यांच्या करिअरचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. भरती वेळेत न होण्याने चांगल्या, अभ्यासू व होतकरू विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यांच्या या होणाऱ्या नुकसानास जबाबदार कोण? वेळेत भरती न झाल्यास दोन वर्षांहून अधिक काळापासून तयारी करणारी मुले दिशाहीन बनतील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर विभागाच्या परीक्षा सध्या होत आहेत, मग पोलिस भरती का लांबवली जात आहे. राज्य सरकारने राज्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून लवकरात लवकर भरतीची तारीख निश्‍चित करावी."

- रुद्र पाटील, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक