साताऱ्यात 400 दूरध्वनी बंद ; ग्राहकांचा खोळंबा

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 12 September 2019

सातारा पालिकेचे "बीएसएनएल'ला सहकार्य मिळत नसल्याने दूरध्वनी यंत्रणा सुरळीत हाेण्यास अडचण निर्माण झाली आहे.

सातारा ः सातारा पालिकेने एक महिन्यापासून रस्ता खोदण्याची परवानगी न दिल्याने भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) शहरातील विशेषतः राजपथावरील सुमारे 400 दूरध्वनी बंद आहेत. परिणामी दूरध्वनी, ब्रॉडबॅंड सेवा बंद पडल्यामुळे घरगुती ग्राहकांबरोबरच शाळा, महाविद्यालये, रुग्णालये तसेच व्यापाऱ्यांच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. 

जुलै-ऑगस्ट महिन्यांत सातारा शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे विविध पेठांमधील सार्वजनिक तसेच खासगी विद्युत यंत्रणेसह दूरध्वनी यंत्रणा ठप्प झाली. विद्युत यंत्रणा टप्प्या-टप्प्याने सुरळीत झाली आहे. परंतु, दूरध्वनी यंत्रणा सुरळीत होऊ शकली नाही. भारत संचार निगम लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांनी दूरध्वनी यंत्रणा सुरळीत करण्यासाठी एक आठवडा रस्त्यांवर विविध ठिकाणी केबलची तपासणी केली.

या तपासणीत आनंदवाडी दत्त मंदिर परिसर तसेच समोरील (कै.) अभयसिंहराजे भोसले स्मृती उद्यानानजीक केबलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळले. या केबलच्या दुरुस्तीसाठी बीएसएनएलने ऑगस्ट महिन्यात पालिकेस रस्ता खोदण्याची परवानगी मागितली आहे. त्याबाबतचा पत्रव्यवहारदेखील झाला आहे. परंतु, पालिका प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नसल्यामुळे बीएसएनएलला दूरध्वनी यंत्रणा सुरळीत करण्यासाठी कोणत्याच हालचाली करता येत नाहीत.

गेल्या ऑगस्ट महिन्यापासून शहरातील सुमारे 400 दूरध्वनी बंद पडले आहेत. त्यामध्ये घरगुतीसह शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, विधीज्ञ, व्यापाऱ्यांच्या कामकाजात अडथळा निर्माण झाला आहे. दररोज सुमारे दहा ते 15 ग्राहक बीएसएनएलच्या कार्यालयात दूरध्वनी यंत्रणा बंद पडल्याच्या तक्रारी घेऊन येत आहेत. त्या नोंदविल्या जात आहेत. पुन्हा आठवड्यानंतर तेच ग्राहक यंत्रणा सुरू व्हावी म्हणून बीएसएनएलच्या कार्यालयात तक्रार नोंदविण्यासाठी येत आहेत. 

पालिकेचे "बीएसएनएल'ला सहकार्य नाही 

सातारा पालिका ही शहराची मातृसंस्था समजली जाते. खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पालिकेत सत्ता आहे. खासदार भोसले हे "बीएसएनएल'चे देखील सदस्य आहेत. तरीही पालिका "बीएसएनएल'ला सहकार्य करीत नाही, याचे आश्‍चर्य आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 400 telephones closed in Satara