कोल्हापूर ते शिनोली : रेल्वेचे 42 कर्मचारी कोरोना बाधित

शंकर भोसले
Friday, 18 September 2020

यामध्ये कोल्हापूर ते शिनोली दरम्यानच्या 12 स्थानकातील 1690 कर्मचा-यांपैकी एकूण 42 कर्मचारी बाधित आढळले आहेत.

मिरज (जि . सांगली) : देश भरात दोनशेहून अधिक विशेष रेल्वे धावू लागल्यानंतर रेल्वेच्या विविध विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची बाधा झाली आहे. कर्मचारी बाधितांची वाढ प्रवासी वाहतुक सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पसरू लागली आहे. मिरज स्थानकातून एक नियमित आणि एक साप्ताहीक गाडी सुरू आहे. मिरज-पुणे- बेळगाव-गोवा या मार्गावरील स्थानकांमध्ये प्रवाशांची चढ उतार होऊ लागली आहे. शिवाय राज्याबाहेरील आणि राज्याअंतर्गत गाड्यांना उत्तम प्रतिसाद मिळत असलातरी कर्मचा-यांमध्ये होणारा संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. 

यामध्ये कोल्हापूर ते शिनोली दरम्यानच्या 12 स्थानकातील 1690 कर्मचा-यांपैकी एकूण 42 कर्मचारी बाधित आढळले आहे. तिकीट विभाग, रेल्वे चालक कक्ष, तिकीट तपासणीस, पार्सल विभाग, रेल्वे सुरक्षाबल, रेल्वे पोलिस यासह अनेक विभागातील कर्मचारी कोरोना बाधित असल्याची माहिती रेल्वे रूगणालयातील डॉक्‍टरांनी दिली. यामधील काही कर्मचा-यांना संस्थाविलगीकरण करण्यात आले आहे. तर अति लक्षणे असणा-यांवर मिशन रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेल्वेतील बाधित कर्मचा-यांची संख्या लक्षात घेता सर्वच कर्मचा-यांची तपासणी शिबीर घेऊन चाचण्या करण्याची मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. रेल्वे मध्ये सर्वाधिक कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता तिकीट तपासणीस आणि रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस यांना आहे. मात्र रेल्वे प्रशासनाकडून लक्षणे दिसणा-याना रेल्वे रूग्णालयात आजाराची नोद करून पुढील तपासणीसाठी मिशन रूग्णालयाकडे पाठवले जात आहे. सध्या रेल्वेतील बाधितांची वाढती संख्या पहाता कर्मचा-यांची सरसकट तपासणी गरजेची बनली आहे. स्थानकात बाधित रूग्ण सापडलेल्या विभागाचे फक्त निर्जंतुकीकरण करण्या पलिकडे काहीच केले जात नाही. 

कोविड एक्‍सप्रेस कर्मचा-यांसाठी गरजेची 
सध्या पुणे स्थानकात कोविड एक्‍सप्रेस थांबून आहे. या गाडीचा वापर रेल्वेमधील कोरोना बाधित कर्मचा-यांच्या उपचारासाठी होऊ शकतो. कोविड एक्‍सप्रेस आल्यास रूग्णालयातील बरेच बेड गरजू रूग्णांनासाठी वापरता येईल.  

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 42 employees of the railway between Kolhapur and Shinoli stations were affected by the corona