esakal | ढेबेवाडीत आठवडाभरात 43 घरांची पडझड
sakal

बोलून बातमी शोधा

 ढेबेवाडीत आठवडाभरात 43 घरांची पडझड

ढेबेवाडी परिसरात दगड मातीत बांधलेल्या घरांची संख्या मोठी आहे. पावसामुळे कुमकुवत झालेल्या घरांची पडझड होण्याचे प्रमाण मोठे आहे.

ढेबेवाडीत आठवडाभरात 43 घरांची पडझड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ढेबेवाडी  : सतत बसणारे भूकंपाचे धक्के, वादळ, पावसामुळे कुमकुवत झालेल्या घरांची पावसाळ्यात पडझड होण्याचे प्रमाण या परिसरात मोठे आहे. आठवडाभरात परिसरातील 43 घरांची पडझड झाल्याची माहिती महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दिली. 
परिसरात दगड मातीत बांधलेल्या घरांची संख्या मोठी आहे. डोंगर परिसरातील गावांमध्ये हे प्रमाण तुलनेत अधिक आहे. यातील काही घरांच्या भिंतींना बाहेरून वाळू व सिमेंटने प्लास्टर केलेले असले, तरी आतील बांधकाम मातीचे असल्याने अशी घरे वरून मजबूत दिसत असली, तरीही आतून कमकुवतच आहेत. सततचे भूकंपाचे धक्के, वादळ, पाऊस यामुळे कमकुवत झालेले हे धोकादायक निवारे पावसाळ्यात कोसळण्याच्या घटना सतत घडतात. आठवड्यापासून परिसरात पावसाची संततधार कायम असल्याने घरांच्या बाहेरील बाजूच्या भिंती पाण्याने फुगून कोसळण्याच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. आठवड्यात विभागातील 43 घरांची पडझड झाली. यातील पडझडीच्या अनेक घटना रात्री घरात लोक झोपेमध्ये असतानाही घडल्या आहेत. भिंती बाहेरील बाजूला कोसळल्याने सुदैवाने जीवित हानी टळल्याचे सांगण्यात येत आहे. ढेबेवाडी आणि कुठरे मंडलातील महिंद, बाचोली, उधवणे, बनपुरी, सळवे, जिंती, मंद्रुळकोळे, मंद्रुळकोळे खुर्द, जानुगडेवाडी, शितपवाडी, गुढे, कुठरे, आचरेवाडी, काळगाव, धामणी आणि तळमावले मंडलातील बागलवाडी, शिद्रुकवाडी, साईकडे, शेंडेवाडी, कुंभारगाव, सुतारवाडी या परिसरातील 43 घरांची पडझड झाल्याची माहिती मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, श्री. सपकाळ व तलाठ्यांनी दिली. पडझडीचे पंचनामे करून तहसील कार्यालयाकडे पाठविल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले. भर पावसात घराच्या भिंती कोसळल्याने अनेक कुटुंबांसमोर बिकट प्रश्न उभा राहिला आहे. पैशाची जुळणी करून पावसात दुरुस्ती करणे शक्‍य नसल्याने प्लॅस्टिक कागद, पत्रे आडवे लावून त्याच घरांमध्ये त्यांचे वास्तव्य आहे. 

"मराठवाडी'वरही पडझडीची मालिका... 

मराठवाडी धरणांतर्गत मेंढ, उमरकांचन, घोटील येथे वास्तव्याला असलेल्या अनेक धरणग्रस्तांची घरे दगड मातीत बांधकाम केलेली कमकुवत आहेत. 22 वर्षांपूर्वी धरणाच्या बांधकामाला सुरवात झाल्यानंतर कधीतरी उठून जावे लागणार म्हणून धरणग्रस्तांनी घरांच्या दुरुस्तीकडे केलेले दुर्लक्ष आता त्यांच्या जीवावर बेतण्याची भीती आहे. उमरकांचन येथील खालच्या आवाडातील अनेक घरांना पाण्याचा वेढा पडला असून, तेथील कुटुंबे निवाराशेडमध्ये स्थलांतरित झाली आहेत. पाण्यात बुडालेली त्यांची मोकळी घरे सध्या धडाधड कोसळत आहेत. 

loading image